सोसायटीच्या टेरेसवर New Year सेलिब्रेशनची तयारी करताय? होऊ शकते कारवाई…

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यात सध्या सावधानता बाळगली जात आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबईत ३१ डिसेंबरपर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. याचसोबत रहिवासी सोसायट्यांमध्येही ख्रिसमस आणि नवीन वर्षाचं सेलिब्रेशनवर निर्बंध घालून देण्यात आलेले आहेत. ज्यात टेरेसवर पार्टी आयोजित करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

‘मुंबई Tak’ने यासंदर्भात पालकमंत्री अस्लम शेख यांच्याशी संवाद साधला. यावेळी बोलत असताना अस्लम शेख यांनी सरकारी नियम मोडणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचा इशारा दिला आहे. “या काळात तुम्हाला कोणाच्या घरी जाऊन जर त्यांना शुभेच्छा द्यायच्या असतील तर काहीच समस्या नाही. परंतू या परिस्थितीत सोसायट्यांनी पार्टीचं आयोजन करणं टाळावं, कारण सध्याचं वातावरण पार्टी आयोजित करण्यासाठीचं नाहीये. नियमांचा भंग झाला तर सरकार कारवाई करेल.”

याचसोबत मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर ख्रिसमस आणि पार्टीचं आयोजन करण्यासाठीही बंदी घालण्यात आली आहे. सध्या मुंबईत कलम १४४ लागू असल्यामुळे मी नागरिकांनी मोकळ्या जागेत येऊन सेलिब्रेशन करणं टाळावं अशी विनंती अस्लम शेख यांनी केली आहे. मरीन ड्राईव्ह आणि इतर समुद्रकिनाऱ्यांवरही पार्टी करण्यास मनाई असल्याचं शेख यांनी स्पष्ट केलं. ओमिक्रॉन मुळे निर्माण झालेली परिस्थिती नागरिकांनी गंभीरतेने घ्यावी अशी विनंती यादरम्यान अस्लम शेख यांनी केली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कॅबिनेटमध्ये झालेल्या बैठकीत सध्याच्या परिस्थितीवर चर्चा झाली असून आगामी काळात ओमिक्रॉनचे रुग्ण वाढू शकतात. राज्यातील आरोग्य यंत्रणांनी परिस्थितीचा अंदाज घेऊन आधीच तयारी करुन ठेवली आहे. दुसऱ्या लाटेदरम्यान राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासत होता आणि आपल्याला बाहेरुन ऑक्सिजन मागवावा लागला होता. परंतू यंदा ऑक्सिजनचा पुरेसा साठा असल्यामुळे अशी वेळ येणार नाही असंही अस्लम शेख म्हणाले.

आरोग्य यंत्रणांनी सर्व तयारी करुन ठेवलेली असली तरीही आपल्याला पुन्हा एकदा तशी वेळ येऊ द्यायची नाहीये. सणासुदीच्या काळात मुंबईत मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे राज्य सरकार आणि पालिका प्रशासनाने अधिक सावधानता बाळगण्याचं ठरवलं असल्याचं शेख म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT