
- मिथिलेश गुप्ता, उल्हासनगर
बहिणीचा फोटो WhatsAppच्या स्टेटसवर ठेवल्याच्या रागातून मित्रानेच मित्राच्या पोटात चाकू भोसकल्याची अत्यंत धक्कादायक घटना कल्याणनजीकच्या उल्हासनगरमध्ये घडली आहे. उल्हासनगरमधील हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. आता याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
जखमी रोहित कांजानी याने त्याचाच मित्र विजय रूपानी याच्या बहिणीचा फोटो काही दिवसांपूर्वीच स्टेटसवर ठेवला होता. त्यावरुन त्या दोघांमध्ये जोरदार वादही झाला होता. त्याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपी विजय रूपानी आणि पंकज कुकरेजा यांनी संगनमत करून रोहित कांजानी याच्यावर प्राणघातक हल्ला केला.
थेट रोहितच्या पोटात चाकू भोसकून त्याच्या हत्येचा प्रयत्न विजय रुपानीकडून करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, रोहितची कांजनी यांची प्रकृती चिंताजनक आहे. दुसरीकडे या हल्ल्यानंतर दोन्ही आरोपी पसार झाले होते. मात्र, हिललाईन पोलिसांनी सुरूवातीला 326 प्रमाणे गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. मात्र वैद्यकीय रिपोर्ट आल्यानंतर पोलिसांनी यात 307 प्रमाणे गुन्हा दाखल केला.
यातील आरोपी विजय आणि पंकज हे दोघे नेताजी चौक परिसरात येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांच्या डीबी टीममधील अधिकारी बाबू जाधव आणि सुभाष घाडगे यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे त्यांनी नेताजी चौकातून दोन्ही आरोपींना अटक केली. यावेळी त्यांच्याकडून गुन्ह्यातील चाकू आणि मोटारसायकल देखील जप्त करण्यात आली आहे.
सध्या या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत ठाकरे करत आहे. असे हिललाईन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण सारिपुत्र यांनी सांगितले.
बहिणीचा फोटो स्टेट्सला ठेवल्याच्या वादातून हा चाकू हल्ला करण्यात आला की, या हल्ल्यामागचं कारण काही वेगळंच आहे याचा आता पोलीस शोध घेत आहेत. याशिवाय या हल्ल्यात दोन आरोपींशिवाय आणखी कोणाचा सहभाग होता का? याचा देखील पोलीस तपास करत आहेत.
उल्हासनगर पोलिसांचा 'मुळशी पॅटर्न', नामचीन गुंडांविरोधात थेट कारवाई
सध्या उल्हासनगर परिसरात गुन्हेगारीचं प्रमाण हे सातत्याने वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसात उल्हासनगरमध्ये हत्या आणि मारहाणीच्या घटना या सातत्याने घडत असल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे नुकतीच शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या चार गुंडांवर उल्हासनगर पोलिसांनी एमपीएडी अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. यात कुख्यात गुंड जग्गु सरदार उर्फ जगदीश तिरथसिंग लबाना, प्रेमचंद पंजाबी उर्फ ढकणी, स्वप्नील कानडे आणि अनिल उर्फ बाळू धिवरे यांचा समावेश होता.
सन 2021 मध्ये परिमंडळ-4, उल्हासनगर हद्दीतील पोलीस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, खंडणी, मारहाण यासारख्या गंभीर गुन्हयातील एकूण 38 गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आलेले असून टोळी बनवून गुन्हे करणाऱ्या दोन टोळयांमधील एकूण 9 गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आलेले आहे.
अशा प्रकारे सन 2021 मध्ये परिमंडळ-4 मधील एकुण 48 गुन्हेगारांना हद्दपार करणेत आले आहे. त्याचप्रमाणे 40 गुन्हेगारांवर हद्दपार करण्याची कारवाई सुरु असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे यांनी दिली आहे. या कारवाईमुळे उल्हासनगरमध्ये गुन्हेगारीला आळा बसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.