कडबा कटिंग मशीनमध्ये केस अडकून नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू

unfortunate death newlywed hair stuck in machine ambegaon pune
unfortunate death newlywed hair stuck in machine ambegaon pune(फाइल फोटो)

स्मिता शिंदे, आंबेगाव पुणे

लग्नाला अवघे सहा महिने झालेले असताना जनावरांचे खाद्य कापण्याच्या कडबा कुट्टी मशीन मध्ये चारा कापण्याचे काम करताना केस अडकून एका 21 वर्षीय नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आंबेगाव तालुक्यातील लाखनगाव येथे घडली आहे. सोनाली अजय दौंड असं मृत नवविवाहितेचे नाव आहे.

जनावरांना चारा कटींग करून घालण्याच्या कुट्टी मशीनमध्ये सोनालीच्या गळ्यातील स्कार्फ आणि केस गुंतल्याने सोनालीला अचानक गळफास लागल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोनालीचे नुकतेच सहा महिन्यापूर्वी लग्न झाले होते. त्यामुळे या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सोनालीचे सासरे सुभाष सोपान दौंड (वय 42 वर्षे, व्यवसाय - शेती, रा. लाखणगांव गव्हाळीमळा, ता. आंबेगांव, जि. पुणे) यांनी ही खबर नोंद केली आहे.

मंगळवारी ही घटना घडली असून सोनालीचा उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय मंचर इथे उपचारासाठी दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी 9.45 वाजेच्या सुमारास सुभाष दौंड हे त्यांच्या शेतात मेथीच्या भाजीला तणनाशक फवारण्यासाठी गेले होते. त्यावेळी रस्त्याने नवनाथ लक्ष्मण रोडे व वैभव रामदास पडवळ असे दोघे मोटार सायकलवरुन जात असताना सुभाष यांनी त्यांना काय झाले? असे विचारले त्यावेळी त्यांनी अजयच्या पत्नीचे केस कडबा कुटी मशीनमध्ये गुंतले आहेत असं सांगितलं आणि पुढे निघून गेले. त्यामुळे सुभाष दौंड यांनी देखील तात्काळ शेतातून घराच्या दिशेने धाव घेतली.

unfortunate death newlywed hair stuck in machine ambegaon pune
धक्कादायक घटना, मळणी मशीनमध्ये अडकून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

त्यावेळी त्यांचा लहान भाऊ सुनिल सोपान दौंड याने सोनालीला कडबा कुटी मशीनपासून घराच्या ओटयावर आणले होते. सोनाली यावेळी काहीही बोलू शकत नव्हती. त्यामुळे सुनिल सोपान दौंड व नवनाथ लक्ष्मण रोडे यांनी सोनालीला तात्काळ पारगांव नेले. त्यानंतर त्यांनी पुढे रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रूग्णालय मंचर येथे आणले. मात्र, तेथील डॉक्टरांनी सोनालीला मृत घोषित केलं.

दरम्यान, या संपूर्ण घटनेने दौंड कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. तसंच सोनालीच्या माहेरच्या लोकांवर या घटनेने दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in