‘शिवसंग्राम’चे विनायक मेटे यांचं अपघाती निधन; मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कारचा अपघात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचं भीषण कार अपघातात निधन झालं. विनायक मेटे यांची कार मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर पहाटे साडेपाच वाजता दुर्घटनाग्रस्त झाली. यात विनायक मेटे यांच्यासह दोघे जखमी झाले होते. एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार विनायक मेटे हे मराठा आरक्षणासंदर्भात आयोजित बैठकीसाठी मुंबईच्या दिशेने येत होते. पुणे-मुंबई एक्स्प्रेसवरून कारमधून मुंबईच्या दिशेनं येत असतानाच पहाटे साडे पाच वाजता विनायक मेटे यांच्या कारचा माडप बोगद्यात भीषण अपघात झाला.

विनायक मेटे यांच्या कारला अज्ञात वाहनाने धडक दिली. या भीषण दुर्घटनेत विनायक मेटे हे गंभीर जखमी झाले. त्याचबरोबर त्यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा रक्षकालाही जबर मार लागला. अपघातानंतर विनायक मेटे यांना तातडीने कामोठे (पनवेल) येथील एमजीएम (महात्मा गांधी मिशन) रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

विनायक मेटे यांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं. कार अपघातात विनायक मेटे यांच्या डोक्याला, मानेला आणि पायाला जबर मार लागला होता. उपचार सुरू असतानाच विनायक मेटे यांनी अखेरचा श्वास घेतला.

“विनायक मेटेंना तासभर मदतच मिळाली नाही”

अपघात झाल्यानंतर विनायक मेटे यांना तासभर मदतच मिळाली नसल्याची माहिती समोर आलीये. विनायक मेटे यांच्या कारच्या चालकाने ही माहिती दिलीये. कारचा अपघात झाल्यानंतर मदतीसाठी गाड्या थांबवण्याचे प्रयत्न केले, पण कुणीही गाडी थांबवली नाही. एका छोट्या टेम्पो चालकाने आम्हाला मदत केली, असं चालक एकनाथ कदम यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीसाठी येत होते मुंबईला

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे मराठा आरक्षण आणि सुविधा या विषयावर बैठक होणार होती. दुपारी १२ वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह इतरही नेते उपस्थित राहणार होते. विनायक मेटेही बीडहून पुणे मार्गे मुंबईला येत होते. मात्र, पहाटे ५.३० वाजता त्यांच्या कारचा अपघात झाला.

ADVERTISEMENT

उपमुख्यमंत्री फडणवीस रुग्णालयात

विनायक मेटे यांच्या निधनाचं वृत्त धडकताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात पोहोचले. देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरही रुग्णालयात पोहोचले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंही रुग्णालयात जाणार असल्याची माहिती आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT