शरद पवार जेव्हा म्हणतात की आरोप गंभीर आहेत तेव्हा नेमकं काय होतं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे प्रसिद्ध आहेत ते त्यांच्या बेरजेच्या राजकारणासाठी. चांगल्या लोकांची, विविध पक्षांची मोट कशी बांधायची याचं कसब त्यांच्या अंगी आहेच. महाविकास आघाडीचे निर्माते म्हणून ज्या दोन माणसांची नावं घेतली जातात त्यातलं पहिलं नाव आहे ते म्हणजे शरद पवार तर दुसरं नाव आहे ते म्हणजे संजय राऊत. मात्र महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासूनच भाजपने या सरकारवर टीकेचे बाण चालवण्यास सुरुवात केली आहे. मग महाविकास आघाडी सरकारमधल्या मंत्र्यांवर आरोप करण्यात आले नसते तरच नवल. राष्ट्रवादीच्या दोन मंत्र्यांबाबत भाजपने आरोपांच्या फैरी झाडल्या. त्यावेळी आरोप गंभीर आहेत असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं. मात्र पुढे काय घडलं का? तेच आपण जाणून घेणार आहोत.

जानेवारीत झाले धनंजय मुंडेंवर आरोप

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

रेणू शर्मा नावाच्या एका महिलेने धनंजय मुंडेंनी आपल्यावर लैंगिक अत्याचार केले आहेत. त्यांनी बलात्कार केल्याचाही आरोप केला होता. धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने अशा प्रकारे आरोप केल्यानंतर भाजपही शांत बसलं नाही. भाजपने या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसला आणि पर्यायाने महाविकास आघाडीला घेरण्यास सुरुवात केली.

राठोडांप्रमाणे धनंजय मुंडेंनीही राजीनामा द्यायला हवा – पंकजा मुंडे

ADVERTISEMENT

याबाबत शरद पवार काही का बोलत नाहीत असाही प्रश्न भाजपने विचारला. आरोप इतके गंभीर होते की धनंजय मुंडे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून करूणा शर्मांसोबत असलेले विवाहबाह्य संबंध मान्य केले. त्यांच्यापासून दोन मुलं असल्याचंही मान्य केलं. शरद पवार यांनी सुरूवातीला याबाबत काही भाष्य केलं नव्हतं मात्र दोन ते तीन दिवसांनी त्यांनी या प्रकरणी भाष्य केलं.

ADVERTISEMENT

आरोप फारच गंभीर आहेत असं म्हणत शरद पवार यांनी एक प्रकारे धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणार असल्याचे संकेत दिले होते. मात्र शरद पवार यांनी दुसऱ्याच दिवशी कालचं चित्र वेगळं आहे आणि आजचं चित्र वेगळं आहे असंही सांगून टाकलं. १४ जानेवारीला जेव्हा ते म्हणाले होते की आरोप गंभीर आहेत तेव्हा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. पुढे रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेतली आणि त्यानंतर काही दिवसांनी करूणा शर्मा यांनीही तक्रार केली होती. मात्र त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही.

मात्र १४ ते १५ जानेवारी या चोवीस तासात रेणू शर्मा यांच्यावरही आरोप करणाऱ्या तक्रारी दाखल झाल्या. त्यामुळे धनंजय मुंडे यांना अभय मिळालं. प्रकरण गंभीर आहे हे पवार म्हणाले त्याने फक्त एक दिवस धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची चर्चा रंगली इतकंच.

दोन दिवसांपूर्वी झाले अनिल देशमुख यांच्यावर आरोप

शनिवारी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं या पत्रात करण्यात आलेला एक आरोप हा अत्यंत गंभीर होता. तो आरोप होता की अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना महिन्याला १०० कोटी रूपये गोळा करण्याचं टार्गेट दिलं होतं असं म्हटलं होतं. अँटेलिया या मुकेश अंबानींच्या घराबाहेर २५ फेब्रुवारीला एक स्कॉर्पिओ आढळून आली होती. या स्कॉर्पिओमध्ये जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचं पत्र होतं.

‘परमबीर सिंग यांना माफीचा साक्षीदार करायचं ठरवलंय, ‘त्या’ पत्रामागे खूप मोठं कारस्थान’

या सगळ्या प्रकरणात संशयाची सुई वळली ती सचिन वाझेंकडे. कारण देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लावून धरला. या प्रकरणाने पुढे अनेक वळणं घेतली. मनसुख हिरेन यांचा मृत्यू, त्यांची हत्या झाल्याचा त्यांच्या पत्नी विमला हिरेन यांचा संशय त्यानंतर मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी असलेले परमबीर सिंग यांची बदली. अनिल देशमुखांना विधानसभेत ठोस उत्तरं न देता येणं अशा अनेक गोष्टी या प्रकरणात घडल्या. मात्र परमबीर सिंग यांची बदली झाल्यानंतर तीन ते चार दिवसांमध्येच त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आणि अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले.

सचिन वाझे ठाकरे सरकारचे वसुली अधिकारी- देवेंद्र फडणवीस

अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना शंभर कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं हा लेटर बॉम्ब परमबीर सिंग यांनी टाकल्यानंतर भाजपने आक्रमक होत अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली. शनिवारपासून ही मागणी होत होती. रविवारी या संदर्भात दिल्लीत शरद पवार यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतही अनिल देशमुखांवर झालेले आरोप गंभीर आहेत असं वक्तव्य केलं. त्यामुळे रविवारचा पूर्ण दिवस राजकीय वर्तुळात हीच चर्चा रंगली होती की अनिल देशमुख यांचा राजीनामा होणार. अनिल देशमुख यांचा राजीनामा झाल्यानंतर त्यांचं पद दिलीप वळसे पाटील यांना दिलं जाईल इथपर्यंत चर्चा रंगल्या. मात्र रविवारी रात्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला जाणार नाही हे शरद पवारांसोबत झालेल्या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी जाहीर केलं.

अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही-जयंत पाटील

सोमवारी या सगळ्या प्रकरणाचे पडसाद हे संसदेतही उमटले. भाजपच्या खासदारांनी गदारोळ करत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी केली. त्यानंतर शरद पवार यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत परमबीर सिंग यांच्या आरोपांमध्ये कसं तथ्य नाही हे सांगितलं. परमबीर सिंग यांनी ज्या तारखांचा उल्लेख केला आहे त्या तारखांना आणि त्या कालावधीत अनिल देशमुख कोरोना पॉझिटिव्ह होते आणि आधी हॉस्पिटलमध्ये दाखल होते तर नंतर होम क्वारंटाईन होते त्यामुळे परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांना अर्थ उरत नाही असं म्हणत त्यांनी अनिल देशमुख यांची पाठराखण केली. तसंच अँटेलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरण यावरून लक्ष विचलित करण्यासाठी या गोष्टी केल्या जात आहेत असाही आरोप केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन मंत्री धनंजय मुंडे आणि अनिल देशमुख यांच्यावर झालेले आरोप हे गंभीर आहेत हे जेव्हा शरद पवार यांनी म्हटलं होतं तेव्हा फक्त रंगल्या त्या राजीनाम्याच्या चर्चा. धनंजय मुंडे यांना अभय मिळालं आहे, अनिल देशमुख प्रकरण ताजं आहे त्या प्रकरणात आणखी काय वळणं येणार ? आणि शरद पवार हे त्याला कसं आणि काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT