याकूब मेमनची कबर चर्चेत! पण लादेन, अजमल कसाब आणि अफझल गुरू या दहशतवाद्यांच्या मृतदेहांचं काय झालं?

अमेरिकेने ओसामा बिन लादेनला ठार केलं, कसाब आणि अफझल गुरूला फाशी देण्यात आली
What happened to the dead bodies of terrorists Osama Bin Laden, Ajmal Kasab and Afzal Guru?
What happened to the dead bodies of terrorists Osama Bin Laden, Ajmal Kasab and Afzal Guru?

मुंबईत सध्या दहशतवादी याकूब मेमन याच्या कबरीच्या सजावटीवरून वाद निर्माण झाला आहे. या कबरीला मजारीचं स्वरूप आल्याचा आरोप भाजपने केला आहे. एवढंच नाही तर यावर आता राजकारणही तापताना दिसतं आहे. याकूब मेमनला पाच वर्षांपूर्वी फाशी देण्यात आली. त्याचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या विनंतीवरून अंत्यसंस्कारांसाठी ताब्यात दिला होता असं समजतं आहे. आपण जाणून घेऊ की कुख्यात दहशतवादी असलेल्या तीन दहशतवाद्यांच्या मृतदेहांचं नंतर काय झालं?

Twin Towers Attacked By Laden 9/11
Twin Towers Attacked By Laden 9/11

अमेरिकेतले ट्विन टॉवर उडवणारा ओसामा बिन लादेन

ओसामा बिन लादेनने ११ सप्टेंबर २००१ ला अमेरिकेच्या प्रसिद्ध ट्विन टॉवर्समध्ये विमान घुसवलं. या हल्ल्यात अनेक लोक मारले गेले. महासत्ता म्हणवल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या तोंडावर ओसामा बिन लादेनने या हल्ल्याच्या रूपात एक चपराकच लगावली होती. त्या दिवसापासूनच अमेरिकेचा नंबर एकचा शत्रू झाला तो ओसामा बिन लादेन. त्याला शोधण्यासाठी अमेरिकेने जंग जंग पछाडलं. मात्र अमेरिकेला दीर्घ काळ चकमा देण्यात तो यशस्वी झाला. अमेरिकेची क्षेपणास्त्रही त्याचा वेध घेऊ शकत नव्हती. अनेकदा लादेन ठार झाल्याच्या बातम्या येत असत त्यानंतर त्याचा व्हीडिओ येत असे ज्यात मी जिवंत आहे हे लादेन सांगत असे. लादेनने असे जवळपास ३० व्हीडिओ मेसेज पाठवले होते.

२०१० मध्ये काय घडलं?

सुमारे ९ वर्षे अमेरिकेला चकमा दिल्यानंतर पाकिस्तानच्या अबोटाबादमध्ये लादेन लपला आहे अशी माहिती अमेरिकेला मिळाली. इस्लामाबादपासून ६५ किमी अंतरावर असलेल्या अबोटाबादमध्ये लादेन लपून बसला आहे ही गुप्त माहिती मिळताच या ठिकाणी CIA सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीने त्या ठिकाणावर नजर ठेवण्यास सुरूवात केली. अमेरिकेचं लक्ष एका हवेलीवर होतं जिथे इंटरनेट आणि दूरध्वनी सेवा नव्हती. हवेलीतून कुणीही बाहेर जात नव्हतं आणि आतही जात नव्हतं. याच ठिकाणी लादेन लपला आहे हा संशय बळावला. त्यानंतर त्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असलेल्या बराक ओबामा यांच्याकडे लादेनला ठार करण्याची संमती मागण्यात आली. २९ एप्रिल २०११ ला लादेनला ठार करण्याची संमती ओबामांनी दिली. १ मे २०११ च्या मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास अमेरिकेच्या नेव्ही सील कमांडोनी त्या घरात घुसून लादेनला घेरलं. गोळ्यांनी त्याच्या मस्तकाचा वेध घेतला. एका कमांडोने त्याच स्थितीत असलेला फोटोही पाठवला. तो ओसामा बिन लादेनच होता.

Osama Bin Laden
Osama Bin Laden

ओसामा बिन लादेनच्या मृतदेहाचं काय झालं?

लादेनला ठार केल्यानंतर त्याचा मृतदेह सर्वात आधी अफगाणिस्तानमध्ये नेण्यात आला. त्याचा मृतदेह स्वीकारण्यासाठी सौदी सरकारशी संपर्क साधण्यात आला होता. मात्र सौदी सरकारने नकार दिला. त्यानंतर लादेनचा मृतदेह कार्ल विन्सन या अमेरिन नेव्हीच्या जहाजावर नेण्यात आला. तिथे एका पेटीत त्याचा मृतदेह ठेवण्यात आला. ती पेटी समुद्रात बुडवण्यात आली. लादेनचा मृतदेह कुठे बुडवण्यात आला ते ठिकाण मात्र अमेरिकेने सांगितलं नाही.

अफझल गुरूला फाशी देण्यात आली, मृतदेहाचं काय झालं?

४ जून २००२ ला संसदेवर हल्ला केल्या प्रकरणी अफझल गुरू, गिलानी, शौकत हुसैन गुरू,अफसान गुरू या दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. १८ डिसेंबर २००२ अफसान गुरू वगळता इतर सगळ्यांना फाशी सुनावण्यात आली. २९ ऑक्टोबर २००३ गिलानीला आरोपी मानलं गेलं पण त्यानंतर त्याला सोडण्यात आलं. ४ ऑगस्ट २००५ ला हुसैन गुरूला जी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती ती १० वर्षांच्या शिक्षेत बदलण्यात आली. अफझल गुरूची फाशी कायम ठेवण्यात आली.

यानंतर अफझल गुरूतर्फे राष्ट्रपतींकडे दया याचिका करण्यात आली होती. तर १२ जानेवारी २००७ ला सुप्रीम कोर्टाने अफझल गुरूची फाशीवरची दया याचिका फेटाळली. ३ फेब्रुवारी २०१३ ला राष्ट्रपती असलेल्या प्रणव मुखर्जींनी अफझल गुरूची दया याचिका फेटाळली. यानंतर ९ फेब्रुवारी २०१३ ला सकाळी ८ वाजता तिहार तुरुंगात अफझल गुरूला फाशी देण्यात आली.

अफझल गुरूच्या मृतदेहाचं काय झालं?

अफझल गुरूला ज्या दिवशी फाशी देण्यात आली त्याच्या आदल्या दिवशी तिहार तुरुंगातच त्याची कबर खोदण्यात आली होती. अफझल गुरूचा फाशी दिल्यानंतर मृत्यू झाला तेव्हा इस्लाम धर्माप्रमाणेच त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याचा मृतदेह तुरूंगात जो खड्डा खणला होता त्यात पुरण्यात आला.

Afzal Guru
Afzal Guru

मुंबईवर भयंकर हल्ला करणारा अजमल आमीर कसाब

२६ नोव्हेंबर २००८ ला मुंबईवर पुन्हा एकदा हल्ला झाला. १० दहशतवाद्यांच्या हल्ल्याने मुंबई पुन्हा एकदा हादरली. अजमल आमीर कसाब हा दहशतवादी जिवंत पकडला गेला होता. २६/११ चा जो हल्ला झाला त्यात १६० हून जास्त लोकांचा मृत्यू झाला. ३ दिवस दहशतवाद्यांना अटक करण्यासाठी मोहीम सुरू होती. एनएसजी कमांडोंना पाचारण करण्यात आलं होतं. १० दहशतवाद्यांपैकी ९ मारले गेले आणि कसाबला जिवंत पकडण्यात पोलिसांना यश आलं. मात्र कसाबला जिवंत पकडत असताना कॉन्स्टेबल तुकाराम ओंबाळे शहीद झाले.

२००९ मध्ये स्पेशल कोर्टात या प्रकरणी सुनावणी सुरू झाली होती. २५ फेब्रुवारी २००९ मध्ये ११ हजार पानांचा चार्जशीट दाखल करण्यात आली. मार्च २०१० मध्ये या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली. कसाबला दोषी ठरवण्यात आलं आणि त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. २०११ मध्ये हे प्रकरण विशेष न्यायालयाकडून बॉम्बे हायकोर्टाकडे आलं. हायकोर्टाने विशेष न्यायालयाच्या फैसला कायम ठेवला. यानंतर सुप्रीम कोर्टातही हे प्रकरण गेलं. सुप्रीम कोर्टानेही कसाबला दिलासा दिला नाही. कसाबने त्यावेळी भारताचे राष्ट्रपती असलेल्या प्रणव मुखर्जींकडेही दया अर्ज केला होता. मात्र तोदेखील फेटाळण्यात आला. २१ नोव्हेंबर २०१२ ला सकाळी ७ च्या सुमारास कसाबला फाशी देण्यात आली.

Ajmal Amir Kasab
Ajmal Amir Kasab

कसाबच्या मृतदेहाचं नेमकं काय झालं?

कसाबला फाशी देण्यात आल्यानंतर भारताने त्याचा मृतदेह पाकिस्तानला सोपवण्याची तयारी दर्शवली होती. मात्र पाकिस्तानने कसाबचा मृतदेह घेण्यास नकार दिला. ज्यानंतर पुण्यातल्या येरवडा कारागृहातच कसाबचा मृतदेह पुरण्यात आला.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in