प्रिया रमाणी यांनी 2018 मध्ये एक ट्विट केलं आणि तिथून सुरू झाला तो एम जे अकबर या केंद्रीय मंत्र्याच्या पतनाचा अध्याय. 17 फेब्रुवारी 2018 ला त्यावेळी केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या एमजे अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले. MeToo ची मोहीम त्यावेळी सुरू झाली होती. एमजे अकबर यांच्यावर जेव्हा हे आरोप झाले तेव्हा त्यांनी प्रिया रमाणींविरोधात अब्रू नुकसानीचा दावा केला. मात्र या प्रकरणातून कोर्टाने प्रिया रमाणी यांना निर्दोष मुक्त केलं आहे. अब्रनुकसानीच्या या दाव्याची सुनावणी दोन वर्षे सुरू होती.
कोर्टाने आपल्या निर्णयात काय म्हटलं आहे?
निर्णय देताना कोर्टाने प्रिया रमाणी यांनी केलेला खुलासा हा महिलांवर कार्यालयात होणारे लैंगिक अत्याचारांना वाचा फोडणारा ठरल्याचं म्हटलं आहे. कोर्टाने हे देखील मान्य केलं आहे की 1993-94 या वर्षामध्ये महिलांना कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषणाला सामोरं जाण्याची वेळ येऊ नये म्हणून तरतूद कऱण्यात आलेल्य विशाखा गाईडलाईन्स नव्हत्या. अशा प्रकारचे आरोप करणाऱ्या महिलेला समाजातून अनेकदा घृणास्पद वागणूक मिळते, समाजाने हेही लक्षात घेतलं पाहिजे की ज्या महिला लैंगिक शोषण सहन करत असतात किंवा सहन केलेलं असतं त्यांच्यावर असे आरोप झाले तर त्यांना आणखी किती सहन करावं लागतं. एवढंच नाही तर कोर्टाने हे निरीक्षणही नोंदवलं आहे की चांगल्या घरातला माणूस, उच्चभ्रू व्यक्ती यादेखील ‘सेक्शुअल अब्युजर’ असू शकतात.
कोर्टाच्या निकालानंतर प्रिया रमाणी काय म्हणाल्या?
“मला खूप चांगलं वाटतं आहे, कोर्टाच्या निर्णयावर मी खरंच खूप समाधानी आहे. आज मला असं वाटतं आहे की फक्त मीच नाही तर ती प्रत्येक महिला यशस्वी ठरली आहे जिने लैंगिक शोषण, अत्याचार यांना वाचा फोडली आहे. गजाला वहाब आणि नीलोफर वेंकटरमण यांचीही मी आभारी आहे कारण त्यांनी या प्रकरणात माझ्यासाठी साक्ष दिली.”
काय होतं प्रकरण?
2017 मध्ये हॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते हार्वी वाइनस्टीन यांच्यावर अनेक मुलींनी आणि महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले. यामध्ये अनेक अभिनेत्रींचाही समावेश होता. MeToo ची सुरूवात झाली ती इथूनच.
याच दरम्यान पत्रकार प्रिया रमाणी यांनीही या प्रकरणावर एक लेख लिहिला. To the Harvey Weinsteins of the world’ या नावाने त्यांनी हा लेख लिहिला. 12 ऑक्टोबर 2017 ला हा लेख प्रकाशित झाला. यामध्ये प्रिया रमाणी यांनी त्यांच्या करिअरच्या सुरूवातीला त्यांच्या आयुष्यात आलेल्या पहिल्या पुरूष बॉसबद्दल लिहिलं. त्याच्यासोबत झालेल्या पहिल्या मिटिंगचा उल्लेख या लेखात होता.
काय म्हटलं होतं प्रिया रमाणी यांनी?
डिअर मेल बॉस, तुम्ही मला कामाच्या ठिकाणी कसं वागायचं ते शिकवलं. मी तेव्हा 23 वर्षांची होते आणि तुम्ही 43 वर्षांचे. मी तुम्हाला माझा आदर्श मानत होते आणि तुमच्याप्रमाणेच आपणही आपली कारकीर्द घडवायची असा निश्चय मी तेव्हा केला होता. त्यावेळी तुमच्याबद्दल एक चर्चा होती की तुम्ही भारतीय पत्रकारितेचे मापदंड बदलले. त्यामुळेच मला तुमच्यासोबत काम करायचं होतं. त्यासाठी आपण एक वेळ ठरवली होती, दक्षिण मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये त्यावेळी तुमचं कायम वास्तव्य असे. तिथे मला तुम्ही मुलाखतीसाठी बोलावलं, संध्याकाळी सात वाजताची वेळ दिली. मात्र मला यात तेव्हा काहीही अडचण वाटली नाही कारण मला माहित होतं की तुम्ही त्यावेळचे सर्वात बिझी एडिटर होतात. मी तुम्हाला हॉटेलमध्ये पोहचून फोन केला त्यावेळी तुम्ही म्हणालात की वरती ये, मला तेव्हा हे माहित नव्हतं की प्रसिद्धी पावलेले संपादक नव्या लोकांचा नेमका कसा इंटरव्ह्यू घेतात. तसंच त्यावेळी माझ्यात हे म्हणण्याचंही धैर्य नव्हतं की मी रुममध्येही येणार नाही मला तुम्ही लॉबीतच भेटा. मी तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी भेटायला आले तेव्हा तो मला इंटरव्ह्यू नाही तर एक ‘डेट’च जास्त वाटली. सगळ्यात आधी तुम्ही मला सॉफ्ट ड्रिंक ऑफर केलंत, मी ते नाकारलं. त्यानंतर तुम्ही व्होडका प्यायला. त्यानंतर मला गाण्याची, संगीताची आवड आहे का? हे तुम्ही मला विचारलंत. त्यावेळी मला काही जुनी हिंदी गाणीही म्हणून दाखवलीत. त्यानंतर तुम्ही मला तुमच्या जवळ येऊन बसायला सांगितलंत मात्र मी म्हणाले की नाही मी इथेच ठीक आहे. त्या रात्री मी वाचले, तुम्ही मला नोकरी दिलीत. मात्र त्यानंतर मी मनाशी निश्चिय केला की तुम्हाला कधीही कुठल्या रुममध्ये एकटं भेटायचं नाही.
लोकांनी प्रिया रमाणी यांचा हा लेख वाचला, मात्र 2017 मध्ये या लेखावरून भारतात फारसं काहीही घडलं नाही कारण या लेखात प्रिया रमाणी यांनी कुणाचंही नाव घेतलं नव्हतं. 2018 च्या डिसेंबर महिन्यापासून आपल्या देशात MeToo मोहीम मोठ्या प्रमाणावर पसरली. अनेक मुलींनी, अभिनेत्रींनी, प्रतिष्ठित स्त्रियांनी त्यांच्या आयुष्यात आणि नोकरीच्या ठिकाणी झालेलं लैंगिक शोषण आणि अत्याचार यांना वाचा फोडली.
6 ऑक्टोबर 2018 ला पत्रकार गजाला वहाब यांनी एक ट्विट केलं आणि त्यात उल्लेख केला की ‘एमजे अकबर यांचं सत्य कधी उघडकीस कधी येईल कुणास ठाऊक?’ त्यानंतर प्रिया रमाणी यांनी 2017 मधल्या लेखाचा उल्लेख करत माझे पहिले बॉस ज्यांच्याबद्दल लिहिलं होतं ते एमजे अकबरच होते हे स्पष्ट केलं आणि स्वतःचा तो लेख पुन्हा ट्विट केला.
इथूनच एमजे अकबर यांच्या पतनाचा अध्याय सुरू झाला कारण या ट्विटनंतर एमजे अकबर यांच्याविरोधात महिला पत्रकारांनी बोलण्यास आणि ट्विटरवर व्यक्त होण्यास सुरूवात केली. इंडियन एक्स्प्रेस या वर्तमान पत्रात काम कऱणाऱ्या शुमा राहा यांनी प्रिया रमाणींच्या पोस्टला सहमती दर्शवली होती. एमजे अकबर यांनी मुलाखतीसाठी मला कोलकाता येथील हॉटेलमध्ये बोलावलं होतं, जेव्हा मी तिथे पोहचले तेव्हा त्यांनी मला बेडवर बसण्यास सांगितलं होतं, ही बाब मला खटकली होती. त्यानंतर मला नोकरी मिळाली पण मी तिथे रूजू झालेच नाही असंही शुमा राहा यांनी म्हटलं आहे.
पत्रकार गजाला वहाब यांनीही एका मुलाखतीत एमजे अकबर यांनी माझं लैंगिक शोषण केलं होतं असा आरोप केला. तसंच त्यांनी माझा मानसिक छळही केला होता ज्यामुळे मी राजीनामा दिला असंही त्यांनी म्हटलं होतं.
एमजे अकबर यांच्यावर जेव्हा हे सगळे आरोप झाले तेव्हा ते खासदार आणि परराष्ट्र राज्यमंत्रीही होते. या सगळ्या आरोपांनंतर अकबर यांना सगळी पदांवर पाणी सोडावं लागलं. अशा रितीने प्रिय रमाणी यांनी एक ट्विट केलं आणि एमजे अकबर यांच्या पतनाचा अध्याय लिहिला गेला.