शिवसेनेत प्रवेश करताच उद्धव ठाकरेंकडून ‘प्रमोशन’; कोण आहेत सुषमा अंधारे?
प्राध्यापक सुषमा अंधारे हे आंबेडकरी चळवळीतलं राज्यभर ओळख असलेलं नाव! आंबेडकरी विचारांची धडाडती तोफ म्हणूनही त्यांची ओळख करून दिली जाते. राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारक राहिलेल्या, शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर अत्यंत तिखट शब्दात टीका करणाऱ्या आणि आता हिंदुत्त्ववादी पक्ष असलेल्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरेंचा उल्लेख ‘भाऊ’ असा करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सुषमा अंधारे नक्की कोण आहेत? राष्ट्रवादीचा […]
ADVERTISEMENT

प्राध्यापक सुषमा अंधारे हे आंबेडकरी चळवळीतलं राज्यभर ओळख असलेलं नाव! आंबेडकरी विचारांची धडाडती तोफ म्हणूनही त्यांची ओळख करून दिली जाते. राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारक राहिलेल्या, शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर अत्यंत तिखट शब्दात टीका करणाऱ्या आणि आता हिंदुत्त्ववादी पक्ष असलेल्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरेंचा उल्लेख ‘भाऊ’ असा करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सुषमा अंधारे नक्की कोण आहेत? राष्ट्रवादीचा हात सोडून सुषमा अंधारे शिवसेनेत का आल्या? हेच समजून घेऊयात…
सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश करताना काय म्हटलं?
“लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण मी त्यापैकी नाही. ठाकरेंवर संकटाची वेळ आलेली असताना भावाच्या खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी आज शिवसेनेत प्रवेश करतेय. शिवसेनेतले पीठा-मिठाचे डब्बे माहित नाहीत मला सांभाळून घ्या,” असं आवाहन शिवसैनिकांना करत सुषमा अंधारेंनी हाती शिवबंधन बांधलं.
शिवसेना उपनेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हेंना आई मानणाऱ्या सुषमा अंधारेंचा जन्म आहे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यातल्या पाडोळीतला. सुषमा अंधारे यांच्या आई कोल्हाटी समाजातल्या. सुषमा आपल्या नावात वडिलांऐवजी आजोबांचं नाव लावतात.
सुषमा अंधारे यांच्या वडील आणि आईमध्ये त्यांच्या जन्मानंतर मुलगी झाल्यामुळे खटके उडू लागले. तेव्हा आईच्या वडिलांनी म्हणजे दगडूराव अंधारे यांनी सुषमा यांना आपल्याकडे ठेवून घेतलं आणि शाळेत प्रवेशावेळी पालक म्हणून त्यांचंच नाव लावलं. कागदोपत्री आलेलं सुषमा दगडूराव अंधारे हे नावच सुषमा यांनी पुढे कायम ठेवलं आणि त्यांच्या नावात त्यांच्या आजोबांचं नाव जोडलं गेलं.
सुषमा अंधारे एम.ए., बीएड पदवी धारक आहेत. त्यांनी वकिलीचंही शिक्षण घेतलंय. राज्यशास्त्र, समाजशास्त्र विषयाच्या व्याख्यात्या, पुरोगामी, स्त्रीवादी अभ्यासक, भटक्या, विमुक्त आणि आंबेडकरी चळवळीतील सामाजिक, राजकीय कार्यकर्त्या, वक्त्या आणि लेखिका अशी त्यांची राज्यभर ओळख आहे.










