'चिंधी'ची सिंधुताई झाली अन् हजारो अनाथांना माय मिळाली; असा होता माईंचा संघर्ष

स्मशानभूमीत राहुटी... भीक मागून उदरनिर्वाह... पुण्यात आल्यानं आणि आयुष्यानं घेतली कलाटणी
सिंधुताई सपकाळ.
सिंधुताई सपकाळ.twitter

- सुरेंद्र रामटेके, वर्धा

अनाथांना मायेची उब देत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या सिंधुताई सपकाळ उपाख्य माई यांची प्राणज्योत मंगळवारी (4 जानेवारी) मालवली. त्यांच्या निधनाचं वृत्त वाऱ्यासारखं महाराष्ट्रभर पसरलं. सिंधुताईं सपकाळाच्या जाण्याने त्यांच्या संघर्षाच्या आठवणींना लोकांकडून उजाळा दिला जात आहे.

असा होता माईंचा संघर्ष

जन्म वर्धा जिल्ह्यातील पिंपरी मेघे या गावचा. जन्मतारीख १४ नोव्हेंबर १९४८. वडील अभिमानजी साठे यांचा गुरे राखण्याचा व्यवसाय. घरी मुलगी जन्माला आली म्हणून तिचे नाव 'चिंधी' ठेवलं, पण हीच 'चिंधी' पुढे शेकडो अनाथ बालकांना अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि स्वतंत्र ओळख मिळवून देणारी त्यांची 'माई' आणि समाजात 'सिंधूताई' म्हणून ख्यातनाम झाली.

सिंधुताई सपकाळ.
'....अनाथांची मातृदेवता हरपली'-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सिंधुताईंचे लग्न वयाच्या बाराव्या वर्षी 30 वर्षांच्या हरबाजी सपकाळ यांच्याशी झाले आणि अवघ्या विसाव्या वर्षी सिंधुताई 3 अपत्यांची आई झाल्या. पोरवयात मातृत्व वाट्याला आले असतानाही इतरांसाठी लढण्याचे धाडस गोपालकाची लेक असलेली सिंधुताई करीत होत्या. गावकऱ्यांनी कष्टाने गोळा केलेल्या शेणखताचा लिलाव करून मोठा मोबदला सावकार घेऊन जायचा. गावकऱ्यांची ही होणारी फसवणूक पाहून सिंधुताईंनी आवाज उठवला म्हणून सावकाराने हरबाजींना सिंधुताईंविरुद्ध भडकवले. राग अनावर झालेल्या हरबाजींनी सिंधुताईला मारहाण करून घराबाहेर काढले.

गरोदर असलेल्या सिंधुताईने गुरांच्या गोठ्यातच बाळाला जन्म दिला. बाळाची नाळही दगडानेच तोडली. वडिलांच्या मृत्यूनंतर माहेर कधीचेच सुटले होते. नंतर सासरही दुरावले. नवजात बाळाला घेऊन ओल्या बाळंतिणीने गाव सोडला. गावापेक्षा स्मशानभूमीच अधिक सुरक्षित आहे, याची जाणीव विशीतल्या सिंधुताईंना झाली आणि त्यांनी आपली राहुटी स्मशानात केली. गावातल्या मंदिरांजवळ किंवा रेल्वे स्टेशनवर भजने गाऊन दिवसभर भीक मागायची, पीठ-भाकरी असे काही मिळाले तर ते घेऊन यायचे, प्रसंगी स्मशानातल्या चितेवरच भाकरी भाजायच्या आणि आपले व चिलापिलांचे पोट भरायचे, असे रहाटगाडगे सुरू झाले.

सिंधुताई सपकाळ.
अनाथांची माय काळाच्या पडद्याड! सिंधुताई सपकाळ यांचं पुण्यात निधन

गोड गळा लाभलेल्या सिंधुताईंना मुबलक भीक मिळायची. मात्र ज्यांना गाता येत नाही किंवा पोट भरेल इतकीही भीक मिळत नाही, त्यांचे काय? या प्रश्नाने सिंधुताईंना अस्वस्थ केले. मग आपल्याला मिळालेली भाकरी आणि अन्नाचे घास त्या इतरांना वाटू लागल्या. कधीकाळी असह्य झालेलं जगणे सुसह्य करण्याची ही सुरुवात होती.

आपल्यासारखे दुःख अनेकांच्या वाट्याला येत असेल, भविष्यात येणार असेल तर त्यांनाही आता आपण सावरले पाहिजे, हा विचार सिंधुताईंच्या मनात डोकावू लागला. अनाथांची माय व्हायचे असेल तर आता पोटच्या गोळ्याला काही काळ दूर सारले पाहिजे, याची जाणीवही सिंधुताईंना झाली. दरम्यान काळात रेल्वेत भीक मागतानाच पुण्यात कधीतरी त्या दाखल झाल्या. भविष्यात आपले परके असा भेद होऊ नये म्हणून सिंधुताईंनी आपले जगलेले एकमेव अपत्य असलेल्या ममताला पुण्याच्या दगडूशेट हलवाई गणपती ट्रस्टच्या स्वाधीन केले. या निर्णयाने आयुष्याला नवे वळण दिले. त्यांच्या कामाची रीतसर सुरुवात झाली ती अमरावती जिल्ह्यातील अतिदुर्गम मेळघाटपासून. मेळघाटातील आदिवासींच्या हक्कासाठी लढा उभारताना उठलेला आवाज तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्यापर्यंत पोचला. आंदोलनाला दिशा मिळाली आणि यशही मिळाले. या दरम्यान अनाथांच्या संगोपनाचे काम सुरूच होते.

सिंधुताई सपकाळ.
अनाथांसाठी आभाळाएवढं कार्य करणाऱ्या सिंधुताई!

संस्था उभ्या करणे हा सिधुताईंचा उद्देशच नव्हता. आसरा हरविलेल्या मुलामुलींना जवळ करणे, त्यांना आधार देणे, स्वावलंबी करणे, या कामातून पाहता पाहता एक मोठे कुटुंब निर्माण झाले. नवजात बालकांपासून तर 80 वर्षांच्या वयोवृद्धांपर्यंत असंख्य जिवांची सिंधुताई आई झाल्या, माई झाल्या आणि एक विशाल कुटुंब जन्माला आले. त्यातूनच सप्तसिंधू महिला आधार बालसंगोपन व शिक्षण संस्था (पुणे), वनवासी गोपालकृष्ण बहुद्देशीय मंडळ (चिखलदरा, अमरावती), द मदर ग्लोबल फाउंडेशन (पुणे) अशा अनेक संस्था आणि उपसंस्था निर्माण होत गेल्या.

सिंधुताईंनी मागील 45 वर्षांच्या या अथक प्रवासात दीड हजारांहून अधिक अनाथांचा, आबालवृद्धांचा सांभाळ केला आहे. चिंधीनं खूप शिकावं, ही वडिलांची इच्छा होती. मात्र चिंधी त्यावेळी चौथ्या वर्गापर्यंतच शिकू शकली. याच चिंधीने पुढे सिंधुताई होत हजारो मुलामुलींना त्यांना हवे ते शिक्षण उपलब्ध करून दिले. अनाथ लेकरांना त्यांच्या पायावर समर्थपणे उभे केले आणि ती सक्षम झाल्यावर त्यांचे संसारही थाटून दिले. माईंनी सुमारे 300 मुलींची आणि पन्नासेक मुलांची लग्ने लावून दिली आहेत. अनेकांची कुटुंबे उभी करून एका महाकुटुंबाच्या सिंधुताई माई झाल्या आहेत.

सिंधुताई सपकाळ.
अनाथांची यशोदा सिंधुताई सपकाळ यांचं निधन, शरद पवार ते देवेंद्र फडणवीस सगळ्याच दिग्गजांची आदरांजली

वंचितांसाठी आजीवन वाहून घेतलेल्या सिंधुताईंना आजतागायत 800 हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेत. मात्र लेकरांच्या निरागस ओठांवर फुलून आलेले विश्वासाचे हसूच सिंधुताईंना सर्वात मोठा पुरस्कार वाटतो. आजतागायत सांभाळलेली ही मुले, कुणी उच्चपदस्थ नोकरीला लागली, तर कुणी शिक्षक, प्राध्यापक, वकील, डॉक्टर, इंजिनियर किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत झाली आहेत. यातल्याच श्याम नामक मुलाने नुकतीच सिंधुताईंवर पीएचडी केली आहे.

माईंच्या जीवनावर 'मी सिंधुताई सपकाळ' हा चित्रपटही प्रदर्शित झाला आहे. स्वतः सिंधुताईंचा सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रातला वावरही सर्वश्रुत आहे. भरकटलेल्या असंख्य प्रवाहांना महाप्रवाहात आणण्याचं, नाव नसलेल्यांना त्यांची ओळख मिळवून देण्याचे आणि अस्तित्वहीन झालेल्यांची अस्मिता जागृत करण्याचे सिंधुताईंचे हे कार्य आणि त्यांचे जीवन अद्भूत आणि अद्वितीय ठरलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in