शरद पवार आणि १९९३चा बॉम्बस्फोट; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं होतं?

शरद पवारांनी कोणत्या मुस्लीम भागात स्फोट झाल्याचं सांगितलं होतं?
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्रPhoto/india today

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ट्विट'हल्ला' चढवला. गंभीर आरोप करताना फडणवीसांनी शरद पवारांवर १९९३ च्या बॉम्बस्फोटात खोटं बोलल्याचाही आरोप केला. त्यामुळे पुन्हा एकदा हा मुद्द चर्चेत आला आहे. त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं?

वर्ष होतं १९९३! दिवस १२ मार्च. याच दिवशी मुंबईत तब्बल बारा बॉम्बस्फोटांनी हादरली. दुपारी १.३० वाजता बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या २८ मजली इमारतीत पहिला स्फोट झाला. त्यानंतर पुढच्या दोन तासांत एअर इंडिया बिल्डिंग, शिवसेना भवन, शेअर बाजार, सेंच्युरी बाजार, हॉटेल जुहू सेंटॉर, झवेरी बाजार, प्लाझा सिनेमा, पासपोर्ट ऑफिस, काथा बाजार, हॉटेल सी रॉक, मुंबई विमानतळ १२ ठिकाणी स्फोट घडवण्यात आले. याचवेळी पवारांनी १२ नव्हे, तर १३ स्फोट झाल्याचं सांगितलं होतं.

मुंबईत बॉम्बस्फोट झाले, त्याआधीच मुंबईत अशांतता होती. १९९२ मध्ये बाबरी मशिद पाडण्यात आली. त्यानंतर देशात उसळलेल्या दंगलीच्या झळा मुंबईला बसल्या होत्या. त्यानंतर महाराष्ट्राच्या नेतृत्वात काँग्रेसकडून बदल केले गेले. केंद्रात संरक्षणमंत्री असलेले पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. मुख्यमंत्रीपदाची सुत्रं स्वीकारल्यानंतर ६ दिवसानंतर म्हणजे १२ मार्च १९९३ रोजी मुंबई हादरली.

खोटं बोलण्यामागे पवारांनी काय दिलेलं आहे कारण?

मुंबईतील १९९३च्या बॉम्बस्फोटावेळी खोटं बोलल्याचं शरद पवारांनी त्यांच्या आत्मचरित्रातही मान्य केलेलं आहे. याबद्दलचा उल्लेख करताना आपण जाणीवपूर्वक खोटं बोलल्याचं स्पष्टीकरणही पवारांनी दिलेलं आहे. एअर इंडियाच्या बिल्डिंगमध्ये स्फोट झाला, त्यावेळी पवार मंत्रालयात होते.

'मुंबईत बॉम्बस्फोट झाल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळांची पाहणी केली. बॉम्बस्फोटासाठी वापरण्यात आलेलं आरडीएक्स पाकिस्तानातील कराचीतून आणण्यात आलं असल्याचं कळालं. मुंबईत ज्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाले ती ठिकाण हिंदुबहुल होते. त्यामुळे मुस्लीम सुमदायाविरोधात रोष उफाळण्याची शक्यता होती. ही परिस्थिती काळजीपूर्वक हाताळण्याची जबाबदारी होती,' असं पवारांनी त्यांच्या आत्मचरित्रात म्हटलेलं आहे.

'बॉम्बस्फोटानंतर आपण दूरदर्शन आणि आकाशवाणीवरून जनतेला माहिती दिली. ही माहिती देताना जाणीवपूर्वक बॉम्बस्फोट १३ ठिकाणी झाल्याचं सांगितलं. त्यात मस्जिद बंदर या मुस्लीम भागातही स्फोट झाल्याचं सांगितलं. विशेष म्हणजे ही घटना दोन धर्माविरूद्ध केलेला कट नसून भारताविरूद्धचा कट आहे', असंही पवार त्यावेळी म्हणाले होते.

मुंबईत झालेल्या या साखळी बॉम्बस्फोटात तब्बल २५७ लोकांचा मृत्यू झाला होता. तर ७१३ लोक जखमी झाले होते. जीवित हानीबरोबरच या स्फोटांमध्ये २७ कोटी रुपयांच्या संपत्तीचं नुकसान झालं होतं. या हल्ल्यांचा मास्टरमाईंड असलेल्या दाऊद इब्राहीमला अद्यापही अटक करण्यात आलेलं नाही.

फडणवीसांनी काय केला आहे आरोप?

१४ एप्रिल रोजी देवेंद्र फडणवीसांनी ट्विटरवरून अनेक आरोप पवारांवर केले. त्यात १९९३ वेळी पवार खोटं बोलल्याचाही आरोप आहे. "१९९३ चे बॉम्बस्फोट ही मुंबईची भळभळती जखम आहे. १२ बॉम्बस्फोटांनी मुंबई हादरली, तेव्हा शरद पवारांनी मुस्लिम वस्तीत झालेल्या १३ व्या बॉम्बस्फोटाचा शोध लावला. मुख्यमंत्री असूनही ते खोटं बोलले," असा आरोप फडणवीसांनी केलेला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in