उपमुख्यमंत्री केलं तेव्हा गृहखातं मागितलं, पण वरिष्ठांना वाटलं...; अजित पवारांचं विधान

पुण्यातील कार्यक्रमात अजित पवारांची गृहमंत्री पदावरून मिश्किल टोलेबाजी, कार्यकर्त्यांना म्हणाले राष्ट्रवादीचा चुकला असता तरी पोटात घेतला नसता...
ajit pawar, sharad pawar
ajit pawar, sharad pawar

विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांच्या पुण्यातील एका विधानाची जोरदार चर्चा सुरू झालीये. पुण्यातील एका कार्यक्रमात अजित पवारांनी आपल्याला गृहमंत्रीपद हवं होतं, पण वरिष्ठांनी दिलं नाही, असं म्हटलंय. अजित पवारांच्या या विधानाला कार्यकर्त्यांनी हसून दाद दिली, पण अजित पवारांची इच्छा नेतृत्वाकडून डावलली गेल्याचं मुद्दा चर्चिला जातोय.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुण्यात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहमंत्रीपद हवं होतं असं विधान केलं. पक्षाच्या वरिष्ठांकडे गृहमंत्री पद द्या. इतकंच नाही, तर अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतल्यानंतरही गृहमंत्री पद मागितलं, मात्र दिलीप वळसेंकडे दिलं, असं म्हणत अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे नाराजीच बोलून दाखवलीये.

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

"मला जेव्हा उपमुख्यमंत्री केलं तेव्हा मी वरिष्ठांना म्हणालो होतो की, माझ्याकडे गृहमंत्रीपद द्या. पण वरिष्ठांना वाटतं की याच्याकडे गृहखातं दिल्यावर आपलं पण ऐकायचा नाही. मला जे योग्य वाटतं, तेच करणार. एखादा राष्ट्रवादीचा जरी चुकला आणि दादा पोटात घ्या... पोटात घ्या म्हणाला, तरी पोटात नाही अन् ओठात नाही. सगळ्यांना नियम सारखाच. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतरही गृहखातं मागितलं मात्र दिलीप वळसे यांना देण्यात आलं", असं विधान अजित पवारांनी पुण्यातील कार्यक्रमात केलंय.

अजित पवारांची मागणी पक्षनेतृत्वाने फेटाळली?

महाविकास आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार यांना उपमुख्यमंत्री केलं. त्याचबरोबर त्यांना अर्थ खातंही दिलं. तर महत्त्वाचं मानलं जाणार गृहखातं मात्र, सध्या अटकेत असलेले नेते अनिल देशमुख यांच्याकडे दिलं होतं.

१०० कोटी वसुलीचा आरोप अनिल देशमुख यांच्यावर झाला. त्यानंतर त्यांना अटक झाली. अनिल देशमुखांच्या अटकेनंतर त्यांच्याकडून गृहमंत्रीपद काढून घेण्यात आलं होतं. त्यानंतर जयंत पाटलांकडे हे पद जाईल असंही बोललं गेलं, पण पक्षाने दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गृहमंत्री पद दिलं.

गृहमंत्रीपदावरून झालेल्या अडीच वर्षातील या सगळ्या घटनाक्रमाला अजित पवारांच्या विधानानं वेगळं वळण मिळालंय. उपमुख्यमंत्री पदाबरोबरच अजित पवारांनी गृहमंत्रीपद मागितलं होतं. इतकंच नाही, तर अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतरही त्यांनी गृहमंत्रीपद त्यांच्याकडे सोपवण्याची मागणी केली होती. मात्र, वरिष्ठांनी त्यांची मागणी मान्य केली नाही. हे आता अजित पवारांनीच सांगितलंय.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in