'ते भारत तोडण्याची योजना आखत होते आणि राहुल गांधी त्यांना रात्री भेटायचे'; अनुराग ठाकुरांचा गंभीर आरोप

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर टीका, कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघाचा आढावा
bharat jodo yatra : anurag thakur and rahul gandhi
bharat jodo yatra : anurag thakur and rahul gandhi

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. अनुराग ठाकूर तीन दिवस मतदारसंघात मुक्कामी असून, भाजप कार्यकर्ते आणि सर्वसामान्यांशी संवाद, चर्चा करणार आहे. दौऱ्यावर असतानाच अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर टीका केली. त्यांच्या यात्रेत तुकडे तुकडे गँगचे लोक आहेत, असं अनुराग ठाकूर म्हणाले.

अनुराग ठाकूर यांच्या दौऱ्याकडे भाजपचे मिशन २०२४ म्हणून पाहिलं जात आहे. ज्या जागांवर शिवसेना किंवा विरोधी पक्षाचे खासदार निवडून आलेले आहेत आणि भाजप उमेदवार दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर राहिले, अशा मतदारसंघावर भाजपनं लक्ष्य केंद्रीत केलं आहे. त्यानुषंगाने अनुराग ठाकूरांच्या दौऱ्याला महत्त्व आलं आहे.

दिवसभर डोंबिवली शहरातील कार्यकर्ते आणि सर्वसामान्यांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर सायंकाळी अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेतून संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींना लक्ष्य केलं.

भारत जोडो यात्रा : अनुराग ठाकूर काय म्हणाले?

"काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर बोलताना अनुराग ठाकूर म्हणाले, 'जे भारत सोडण्यावर जास्त विश्वास ठेवतात, ते भारत जोडण्यावरती का विश्वास ठेवतील. पक्ष त्यांना शोधत असतो. संसद अधिवेशनात ते सापडत नाही. त्यांची जी यात्रा आहे, ती दोन दिवसातच पडली. हे सर्वांनी पाहिलं आहे. भारत एक मजबूत राष्ट्र आहे. काही लोक आजही भारत जोडण्याची गोष्ट करतात, ते कुठल्या जगात राहतात माहिती नाही. त्यांना इतिहासाची थोडी माहिती असली पाहिजे. भारत पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली काय प्रगती करत आहे हे त्यांनी पाहिलं पाहिजे. पण काही काँग्रेसचे नेते हे आपले डोळे बंद करून बसले आहेत", अशी टीका त्यांनी केली.

भारत जोडो यात्रेत 'तुकडे तुकडे गँग'चे लोक; अनुराग ठाकूर यांची टीका

अनुराग ठाकूर म्हणाले, "माझा राहुल गांधी आणि सोनिया गांधींना एक प्रश्न आहे. राहुल गांधी भारत जोडो यात्रा करत आहेत. त्यात तुकडे तुकडे गॅंग सहभागी आहे. जेएनयू बाहेर जे लोक कधी पोस्टर लावत फिरायचे की, भारत तेरे तुकडे होंगे हजार, इन्शा अल्ला, इन्शा अल्लाची घोषणाबाजी करत होते. तेच लोक आज राहुल गांधींसोबत यात्रेचा भाग आहेत. हे तेच लोक आहेत, जे जेएनयूमध्ये भारत तोडण्याची योजना आखायचे आणि रात्री त्यांना भेटायला राहुल गांधी जात होते", असा आरोप अनुराग ठाकूर यांनी केला.

"मी त्यावेळी संसदेतही विचारणा केली होती की, राहुलजी, देशाचे तुकडे करणाऱ्या लोकांसोबत आहात की देश वाचवणाऱ्यांबरोबर? तो चेहरा समोर आला आहे. ते तुकडे तुकडे गँगचे लोक त्यांच्या यात्रेत सामील आहेत", असं अनुराग ठाकूर म्हणाले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in