बाळासाहेब ठाकरे यांच्या 'त्या' फॉर्म्युल्यावरच उद्धव ठाकरे पुन्हा करत आहेत शिवसेनेची उभारणी

बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेला हा फॉर्म्युला नेमका आहे तरी काय? वाचा सविस्तर बातमी
bala saheb thackeray 80 and 20 formula uddhav thackeray
bala saheb thackeray 80 and 20 formula uddhav thackeray Photo/IndiaToday

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या शिवसेना हा पक्ष चर्चेत आहे. हा पक्ष एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे दुभंगला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडावी लागली. आता एकनाथ शिंदे गट शिवसेनेवर दावा सांगतो आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे हे शिवसेना वाचवण्याची आणि पुनर्बांधणी करण्याची जोरदार तयारी करत आहेत. यासाठी उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या ८०-२० च्या फॉर्म्युलाचा आधार घेत आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना दुभंगली

शिवसेनेतून ४० आमदारांनी आणि १२ खासदारांनी बंड पुकारलं आहे. उद्धव ठाकरेंची साथ सोडून ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत उभे आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत दादा भुसे, उदय सामंत, अब्दुल सत्तार, शंभूराज देसाई असे दिग्गज नेते आहेत ज्या सगळ्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. या आमदार खासदारांमध्ये ठाणे, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातले नेते आहेत. अशात आता उद्धव ठाकरे यांच्यासमोर सर्वात मोठं आव्हान आहे ते पक्ष मजबूत करण्याचं.

शिवसेनेला शिंदे गटापासून वाचवण्यासाठी कायदेशीर लढाई तर लढली जातेच आहे, मात्र त्याचसोबत रस्त्यावर उतरूनही संघर्ष केला जातो आहे. ठाकरे गटाने त्यासाठी कंबर कसली आहे. मुंबईतून बाहेर पडून महाराष्ट्राचा दौरा करत आदित्य ठाकरे पुन्हा एकदा जोमाने शिवसेना उभी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आदित्य ठाकरे यांनी पहिल्या टप्प्यात भिवंडी ते शिर्डी पर्यंत शिवसंवाद यात्रा काढली. यामध्ये त्यांनी ठाणे, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये दौरा केला. आता त्यांच्या यात्रेचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे.

आदित्य ठाकरे हे मुंबईबाहेर पडून शिंदे गटाला आव्हान देत आहेत. अत्यंत आक्रमक होत आदित्य ठाकरे सध्या शिवसेना बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांच्या विरोधात आदित्य ठाकरे चांगलेच आक्रमक झालेले पाहण्यास मिळत आहेत. त्यांची भाषणं याचीच प्रचिती देत आहेत.

उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाणे जिल्ह्याची जबाबदारी केदार दिघे आणि उपनेते पद अनिता बिर्जे यांना दिलं आहे. केदार दिघे हे एकनाथ शिंदे यांचे राजकीय गुरू आनंद दिघे यांचे पुतणे आहेत. आनंद दिघे यांचा राजकीय वारसा केदार दिघे यांनी चालवावा यासाठी उद्धव ठाकरे यांनी ही खेळी खेळली आहे. अनिता बिर्जे यांनीही हेच म्हटलं आहे की शिवसैनिकांच्या भावनेशी कुणीही खेळ करू नये.

अनिता बिर्जे यांनी पक्षात जी फूट पडली आहे त्यावरून शिवसैनिक गोंधळले होते असं म्हटलं होतं. तसंच आता आम्ही ८०-२० या बाळासाहेब ठाकरेंच्या फॉर्म्युल्यावर पुढे जाणार आहोत असंही म्हटलं आहे.

काय आहे बाळासाहेब ठाकरे यांचा ८०-२० चा फॉर्म्युला

अनिता बिर्जेच नाही तर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे देखील हाच फॉर्म्युला अंमलात आणत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेला हा फॉर्म्युला म्हणजे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण असा आहे. उद्धव ठाकरे आता पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी याच फॉर्म्युलाचा आधार घेताना दिसत आहेत. जेव्हा पक्षात फूट पडली, पक्षाला तडे जातील असं वाटलं तेव्हा हा फॉर्म्युला घेऊन बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना उभी केली. आता याच फॉर्म्युलावर उद्धव ठाकरे पुढे जात आहेत हे दिसून येतं आहे.

बाळासाहेब ठाकरेंनी हा फॉर्म्युला कसा तयार केला होता?

बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा शिवसेना हा पक्ष स्थापन केला तेव्हा त्यांनी पक्षाशी अशी माणसं जोडली ज्यांना राजकारणाचा कुठलाच आधार नव्हता. ऑटो चालक, टॅक्सी चालक, सामान्य माणसं, मजूर वर्ग अशा सगळ्यांना बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेत घेतलं त्यांना मोठं केलं. आपल्या शिवसैनिकांना त्यांनी स्पष्ट संदेश दिला होता की ८० टक्के समाजकारण करा आणि २० टक्के राजकारण. आता शिवसेना पक्ष दुभंगलेला असताना उद्धव ठाकरे हाच फॉर्म्युला पुन्हा वापरताना दिसत आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in