एकनाथ खडसेंनी सर्वांसमोर 'दूध का दूध पानी का पानी' करावं : मंगेश चव्हाण यांचं आव्हान

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातील वाद सध्या चांगलाचं गाजतं आहे.
Eknath khadse - Mangesh Chavan
Eknath khadse - Mangesh ChavanMumbai Tak

जळगांव : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातील वाद सध्या चांगलाचं गाजतं आहे. संघातील दूध पदार्थांच्या चोरीच्या आरोपानंतरही गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी पोलीस ठाण्यातच रात्रभर ठिय्या मांडला. गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस स्टेशन मधून न हलण्याचा पवित्रा त्यांनी घेतला. खडसेंच्या आक्रमक बाण्यानंतर भाजप आमदार आणि जळगाव सहकारी दूध उत्पादक संघाचे प्रशासक मंगेश चव्हाण यांनी सभासदांसमोर काय ते 'दूध का दूध पानी का पानी' करावं, असं आव्हान एकनाथ खडसे यांना दिलं आहे.

शनिवारी जळगावमध्ये माध्यमांशी बोलताना आमदार चव्हाण म्हणाले, खडसे यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक जळगांव इथं यावं. सर्व दूध उत्पादक, दूध संघाचे सभासद सगळ्यांना बोलऊ. सगळे पुरावे मी त्यांना देतो. त्यांच्या काही शंका असतील तर त्यांनी मला विचाराव्यात. माझ्या काही शंका आहेत त्या मी विचारतो. त्यांनी सगळी समाधानकारक उत्तर दिली तर मी त्यांची जाहीर माफी मागतो. पण जर ते दोषी असतील तर त्यांनी तिथचं राजीनामा द्यावा. सर्व सभासदांसमोर काय ते 'दूध का दूध पानी का पानी' करावं, असं आव्हान त्यांनी दिलं.

यावेळी बोलताना आमदार मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांच्यावर अपहाराचा आरोप केला. ते म्हणाले, या सिंडिकेटचे धागेदोरे कुठे कुठे जातात, काय काय जातात, हे सगळ्यांना माहित आहे. या सगळ्याला चेअरमनच जबाबदार आहेत. ही चोरी होऊच शकत नाही, तो अपहार आहे आणि तो चेअरमन आणि एमडी यांनीच केला आहे. त्यामुळेच तुरुंगात जाण्यापूर्वी त्यांनी तुरुंगाच्या बाहेर राहून तुरुंगात गेल्यावर कसं वाटतं याची प्रॅक्टिस केली असल्याचही चव्हाण म्हणाले.

एकनाथ खडसेंचा रात्रभर पोलीस स्थानकाबाहेर ठिय्या :

जळगाव जिल्ह्यातील राजकारण सध्या जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातील वादानं चांगलचं गाजत आहे. संचालक मंडळ बरखास्तीचा वाद न्यायालयात प्रलंबित असताना आता संघातील चोरीचा मुद्दा समोर आला आहे. अधिकाऱ्यांच्या पातळीवर संघात काही दूध पदार्थांची मोठी चोरी झाल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्यानं खडसे यांनी स्वतः पोलीस ठाण्यातच रात्रभर ठिय्या मांडला. तसंच जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस स्टेशन मधून न हलण्याचा पवित्रा एकनाथ खडसेंनी घेतला.

काय म्हणाले जयंत पाटील?

याच आंदोलनस्थळी जयंत पाटील यांनी भेट देऊन खडसे आणि पोलिसांशी चर्चा केली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पाटील म्हणाले, एफ. आय. आर. दाखल न करता पोलीस चौकशी करण्याचे आश्वासन देत आहे, या हास्यास्पद आहे. पोलिसांचा हा द्राविडी प्राणायाम आहे. हे चुकीचं असून त्यांच्यावर कुणाचा तरी दबाव आहे. त्यामुळे पोलीस कर्तव्यापासून दूर पळत आहेत. त्यामुळे नवं सरकार कसं काम करत आहे त्याचं हे उदाहरणं आहे, असंही ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in