लोकसभेप्रमाणेच भाजपची विधानसभा निवडणुकीसाठी खास रणनीती! समोर आला प्लान

elections 2024 : लोकसभा मतदारसंघाबरोबरच भाजपनं विधानसभा मतदारसंघासाठी प्लान तयार केला आहे...
लोकसभेप्रमाणेच भाजपची विधानसभा निवडणुकीसाठी खास रणनीती! समोर आला प्लान

लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बराच अवधी असला, तरी भाजपनं कंबर कसलीये. केंद्रीय पातळीवर १४४ लोकसभा मतदारसंघांची यादी तयार करण्यात आल्यानंतर आता महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांसाठी नवी रणनीती आखण्यात आलीये. ज्या मतदारसंघात भाजपचा आमदार नाहीये, अशा मतदारसंघावर पक्षानं लक्ष्य केंद्रीत केलंय. यासाठी प्लान तयार करण्यात आलाय.

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात निवडणुका होणार आहेत. त्यामुळे भाजपनं विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केलीये. भाजपनं राज्यातील १६ लोकसभा मतदारसंघात भाजपनं काम सुरू केलं असून, आता अशाच विधानसभा मतदारसंघात उमेदवार निवडून आणण्यासाठी रणनीती तयार करण्यात आलीये.

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची रणनीती काय?

ज्या विधानसभा मतदारसंघात भाजपचा आमदार नाहीये. अशा मतदारसंघावर लक्ष्य दिलं जाणार आहे. जिथे भाजप आमदार नाही, अशा विधानसभा मतदारसंघात विधान परिषदेचे आमदार, राज्यसभा खासदार यांचा निधी खर्च करण्याचा प्लान तयार करण्यात आलाय.

त्यासाठी विधान परिषद आणि राज्यसभेच्या सर्व आमदार, खासदारांच्या निधीचं वितरण आता पक्षाच्या माध्यमातून केलं जाणार आहे. म्हणजेच भाजपचे राज्यसभेचे खासदार आणि विधान परिषदेतील आमदार यांना जो निधी मिळतो, तो आता पक्षाच्या माध्यमातून खर्च करण्यात येणार आहे.

हा निधी कसा आणि कुठे खर्च करायचा? याचा प्राधान्यक्रम पक्षाची तीन सदस्यीय समिती ठरवणार आहे. त्यासाठी श्रीकांत भारतीय, खासदार डॉ. अनिल बोंडे आणि प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर यांची समिती नियुक्त करण्यात आलीये.

विधानसभेच्या २०० पेक्षा जागा, तर लोकसभेच्या ४५ पेक्षा जास्त जागा जिंकण्यासाठी भाजपचं प्लानिंग

भाजपनं २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. भाजपच्या रणनीतीबद्दल बोलताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी माहिती दिलीये. "महाराष्ट्रात संघटनात्मक बांधणी सुरू केलीये. भाजपचे खासदार असलेले लोकसभा मतदारसंघ आणि भाजप उमेदवार पराभूत झालेले मतदारसंघ अशा १८ मतदारसंघासाठी लोकसभा प्रवास योजना सुरू आहे. राज्य नेतृत्वानंही १८ मतदारसंघांची निवड केलीये. महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्री हे लोकसभा मतदारसंघात जाणार आहे."

"उरलेले मतदारसंघ मजबूत आहेत. एकूण ४५ लोकसभा मतदारसंघात भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना असे आम्ही लढणार आहोत. लोकसभेच्या ४५ पेक्षा जास्त जागा आणि विधानसभेच्या २०० पेक्षा अधिक जागा जिंकण्यासाठी आम्ही संघटनात्मक कार्यक्रम आम्ही तयार केला आहे", असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेले आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in