संजय राऊत, चिथावणी देणे बंद करा; अन्यथा... : चंद्रशेखर बावनकुळेंनी काय दिला इशारा?

राज्याचं राजकीय वातावरण खराब करू नये...
Sanjay Raut - Chandrashekhar bawankule
Sanjay Raut - Chandrashekhar bawankuleMumbai Tak

मुंबई : संजय राऊत यांनी तुरुंगात शिकलेली षंढ, नामर्द अशी भाषा वापरून चिथावणी देणं आणि आव्हान देणं बंद केलं पाहिजं, अन्यथा संयम सुटेल आणि भाजप रस्त्यावर उतरेल, असा इशारा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. ते बुधवारी मुंबईत प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते.

बावनकुळे म्हणाले, संजय राऊत यांनी आव्हान देऊ नये, राज्याचं राजकीय वातावरण खराब करू नये आणि सामाजिक वातावरण बिघडवू नये, अन्यथा लोकांचा संयम सुटेल. यातून उद्या उद्रेक झाला तर थांबविता येणार नाही. कोणत्याही नेत्याचा व्यक्तिगत अपमान होईल, असं संजय राऊत यांनी बोलू नये.

मर्दानगी काढणे, नालायक म्हणणे हे महाराष्ट्र सहन करणार नाही. राऊत यांनी चिथावणी देणे बंद करावं. नाही तर त्यांच्या बोलण्याचा उलटा परिणाम होईल. महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यावर न्यायालयातच तोडगा निघेल. न्यायालयानं लवकरात लवकर सुनावणी घेऊन या प्रकरणी निर्णय द्यावा यासाठी राज्य सरकारनं प्रयत्न करावेत, असं आपलं आवाहन आहे, असंही ते म्हणाले.

या प्रश्नी सर्वोच्च न्यायालयातच तोडगा निघेल हे माहिती असूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण स्वतः सीमाभागात जाणार असल्याचं जाहीर करणं शोभत नाही. त्यांना सीमाभागात जायचं होतं तर ते आधी का गेले नाहीत, असा प्रश्न निर्माण होतो. जी २० संबंधी बैठकीस निमंत्रण असूनही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गैरहजर राहिले. त्यांनी महाराष्ट्राच्या हितापेक्षा अधिक महत्त्व स्वतःच्या राजकारणाला दिले व महाराष्ट्राचा अपमान केला, असाही आरोप बावनकुळे यांनी केला.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in