
मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचं एक वक्तव्य सध्या खूपच चर्चेत आहे. या वक्तव्याने त्यांनी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोंडी केली आहे. 2014 मध्ये फडणवीस सरकारच्या काळातच शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती करण्याचा प्रस्ताव दिला होता आणि तो एकनाथ शिंदेचे घेवून आले होते, असा गौप्यस्फोट चव्हाण यांनी केला. एकनाथ शिंदेंच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर लोकसत्ताशी बोलताना त्यांनी हा दावा केला.
दरम्यान, अशोक चव्हाण यांच्या या दाव्यावर आता शिवसेनेतूनही प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत. शिवसेनेच्या नेत्यांनी चव्हाण यांच्या गौप्यस्फोटात तथ्य असल्याचे सांगितले आहे. अशोक चव्हाण यांच्या गौप्यस्फोटानंतर माजी खासदार, शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंनी आणखी एक गौप्यस्फोट करत दावा केला की, एकनाथ शिंदे 15 आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये जाणार होते.
तर खासदार विनायक राऊत म्हणाले, अशोक चव्हाण बोलले ते खरे आहे. भाजपच्या अन्यायावर एकनाथ शिंदे यांनी आवाज उठवला होता. एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांनी समजूत काढली होती. एकनाथ शिंदे भाजपच्या जवळ कसे गेले हे ईडीचे डायरेक्टर सांगू शकतात, असाही खोचक टोला राऊत यांनी लगावला.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, आता हेच सांगतात आम्हाला राष्ट्रवादी नको, काँग्रेस नको. तेच त्यावेळी गेले. त्यावेळीस त्यांनी विरोध नोंदवला पाहिजे होता. त्यांचे खाण्याचे दात वेगळे आणि दाखवण्याचे वेगळे हे जनता बघत आहे.
2014 पासून शिवसेना-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात राज्यात युतीचे सरकार स्थापन झाले. परंतु 2014 मध्ये ज्यावेळी भाजप-शिवसेनेमध्ये वाद सुरु होते, त्यावेळीच शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती करण्याचा प्रस्ताव दिला होता. आणि त्या शिष्टमंडळात एकनाथ शिंदे यांचा समावेश होता.
चव्हाण पुढे म्हणाले, त्यावेळी आपण या प्रस्तावाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करण्यास सुचवले होते. त्यांची संमती असेल तर आमच्या पक्षातर्फे तुमच्या प्रस्तावाचा विचार करू, असे सांगितले होते. त्यावेळी माझ्या चर्चगेट येथील कार्यालयात शिवसेनेचं शिष्टमंडळ भेटल्याचेही चव्हाण म्हणाले.