Advertisement

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याआधी उद्धव ठाकरे यांनी केलेलं शेवटचं भाषण जसंच्या तसं..

जाणून घ्या उद्धव ठाकरे यांनी काय काय म्हटलं आहे आपल्या मुख्यमंत्री म्हणून केलेल्या शेवटच्या भाषणात?
 CM Uddhav Thackeray Last Speech Before his Resign As CM
CM Uddhav Thackeray Last Speech Before his Resign As CM

महाराष्ट्राच्या राजकारणात २१ जूनला एकनाथ शिंदे यांनी जेव्हा शिवसेनेविरोधात बंड पुकारलं होतं तेव्हाच मोठी उलथापालथ झाली होती. महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला यात काही शंकाच नाही. या भूकंपाचं केंद्र सुरूवातीला सुरत आणि त्यानंतर गुवाहाटीमध्ये गेलं. आठ दिवस आरोप-प्रत्यारोप, डाव प्रतिडाव चालले ते शिवसेना विरूद्ध बंडखोर आमदार यांच्यात. भाजप या सगळ्यात कुठेही नव्हते. मंगळवारी देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले होते. त्यानंतर जेव्हा ते मुंबईत परतले तेव्हा त्यानी राज्यपालांची भेट घेतली.

 CM Uddhav Thackeray Last Speech Before his Resign As CM
Uddhav Thackeray: "मी आज सगळ्या महाराष्ट्राच्या साक्षीने मुख्यमंत्रीपदाचा त्याग करतो आहे"

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातलं सरकार अस्थिर झालं आहे. बहुमत सिद्ध करायला सांगा या आशयाचं पत्र राज्यपालांना दिलं. त्यानंतर राज्यपालांनी ३० जूनला फ्लोअर टेस्ट ठेवली होती. या फ्लोअर टेस्टला स्थगिती द्यावी अशी मागणी करत सुप्रीम कोर्टात शिवसेना गेली होती. मात्र शिवसेनेची याचिका फेटाळून लावत सुप्रीम कोर्टाने ३० जूनलाच फ्लोअर टेस्ट घ्यावी हाच निर्णय दिला. यानंतर उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला आणि राजीनामा देत आहे हे जाहीर केलं. वाचा उद्धव ठाकरे यांनी केलेलं भाषण जसंच्या तसं.

 CM Uddhav Thackeray Last Speech Before his Resign As CM
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजकीय भूकंपानंतर दोनदा राजीनामा देणार होते पण पवारांनी थांबवलं

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

मी आश्वस्त केलं होतं जे सुरु केलंय ते सुरु राहिल. आता पर्यंतची वाटचाल तुमच्या मदतीने चांगली झाली. सरकार म्हणून अनेक कामं आपण केली. रायगडासह गड किल्ल्यांचं संवर्धनासाठीचा पहिलाच निर्णय आपलं सरकार आल्यानंतर मी घेतला. बळीराजाला कर्जमुक्त केलं. आपण मला विसरणार नाही याची मला खात्री आहे. मला या गोष्टीचं समाधान आहे की माझं आयुष्य सार्थकी लागलं. बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं की औरंगाबादचं नाव संभाजी नगर आणि उस्मानाबादचं नाव धाराशिव केलं जावं. हे नावही आपण बदललं. संभाजी नगर आणि धाराशिव ही नावंही आपण बदलली याचा मला अभिमान आहे.

सगळं काही चांगलं सुरू होतं. मात्र सगळं चांगलं सुरू असलं की दृष्ट लागते. तसंच काहीसं झालं. ज्यांना आपण सगळं दिलं ते नाराज झाले. तर ज्यांना आपण काहीही दिलं नाही तो सामान्य माणूस मागच्या पाच दिवसांपासून मातोश्रीवर येत सांगत होता साहेब आम्ही तुमच्यासोबत आहोत. या सगळ्या वाटचालीत पवारसाहेब, सोनियाजी यांचं सहकार्य लाभलं. त्या दोघांचेही मी मनापासून धन्यवाद देतो. आज कॅबिनेटची बैठक होती तेव्हा त्यात शिवसेनेचे चारच मंत्री होते. मला वाटलं होतं औरंगाबादच्या नामांतराला विरोध केला जाईल. मात्र तसं काहीही घडलं नाही. जे विरोध करतील असं वाटलं होतं ते आपल्या साथीला आले. बाकी सगळे नामारनिराळे राहिले.

अनेक सामान्य शिवसैनिकांना शिवसेनाप्रमुखांनी मोठं केलं आहे. त्यामध्ये रिक्षावाले असतील, हमाल असतील अगदी हातभट्टी चालवणारेही लोक होते. मात्र आज वेळ अशी आली आहे की ज्यांना शिवसेनेने आणि शिवसेना प्रमुखांनी मोठं केलं तेच आपल्याला विसरले. आपण जे काही देणं शक्य होतं ते सगळं दिलं. मात्र कसं असतं माणूस मोठा झाला की त्याच्या मागण्या अजून वाढत जातात. त्यातून नाराजी वाढते. यांना सगळं देऊन हे नाराज झाले आणि मातोश्रीवर येणारे सामान्य माणूस मला लढा सांगत आहेत. मला वाटतं आहे हे सामान्य शिवसैनिक हीच माझी ताकद आहे. ही शिवसेना सामान्यांच्याच साथीने मोठी झाली आहे.

आज न्याय देवतेने निकाल दिला आहे. आपण न्यायदेवता म्हणतो त्यामुळे या देवतेचा निकाल मान्यच आहे. कोर्टाने फ्लोअर टेस्ट करण्याचा निर्णय दिला आहे. राज्यपालांकडे काल कुणीतरी गेलं होतं. बहुमत चाचणीची मागणी त्यांनी केली त्यानंतर २४ तासात राज्यपालांनी निर्णय घेतला आणि ३० जूनला फ्लोअर टेस्ट घ्यायला सांगितलं. राज्यपालांचेही मी आभार मानतो त्यांनी अत्यंत तत्परतेने हा निर्णय घेतला. तेवढ्या तत्परतेने १२ विधान परिषद सदस्यांच्या बाबतीत निर्णय घेतला असता तर बरं झालं असतं.

आज मंत्रिमंडळ बैठकीत अशोकराव म्हणाले आम्ही बाहेर पडतो, तुम्हाला बाहेरू पाठिंबा देतो पण तुम्ही तुमच्या नाराज आमदारांना परत बोलावा. मी कालही आवाहन केलं आहे विचारलं की जे नाराज आहे असं सांगत आहेत त्यांची नाराजी नेमकी कुणावर आहे? जी नाराजी आहे ती सुरत आणि गुवाहाटीला जाऊन सांगण्यापेक्षा मातोश्रीवर येऊन बोला. जे काही वाटतं आहे समोरासमोर सांगा. मी काहीतरी असं तुमच्याशी बोलणार मग तुम्ही त्यावर अशी प्रतिक्रिया देणार. त्यापेक्षा वाद न घालता समोर येऊन बोला. मला तुमच्याशी वाद घालायचा नाही. जे काही बंड तुम्ही केलंत ती मला माझी चूक वाटते आहे.

मुंबई उद्या विजयाचा जल्लोष होणार आहे त्यामुळे बंदोबस्त वाढवण्यात आला आहे कदाचित चीनच्या सीमेवरचं सैन्यही इथे बोलवलं जाईल. अनेक शिवसैनिकांना स्थानबद्ध करून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मुंबईत जेव्हा ते आमदार येतील तेव्हा कुणीही शिवसैनिकांनी त्यांच्या वाटेत येऊ नये. मुंबईशी तुम्ही इतकं नातं तोडलं आहे का? नव्या लोकशाहीचा पाळणा हलणार आहे त्यांच्या मधे मुळीच येऊ नका. फ्लोअर टेस्टच्या खेळात मला पडायचं नाही. आमच्या बाजूने कोण? तुमच्या बाजूने कोण? लोकशाहीचं हे दुर्दैव आहे लोकशाहीचा उपयोग डोकी किती बाजूने आहेत हे मोजण्यासाठी होतो. त्यामुळेच मला उद्याचा फ्लोअर टेस्टचा खेळ खेळायचा नाही. शिवसेना प्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचण्याचं पुण्य त्यांच्या पदरी पडणार आहे ते पडू द्या ते हिरावून घेऊ नका. मला एकाही शिवसैनिकाचं रक्त मुंबईतल्या रस्त्यावर सांडायला नको आहे. शिवसेना प्रमुखांच्या मुलाला आम्ही मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचलं हे आनंदाने सगळ्यांना सांगा. तो आनंद मला तुमच्याकडून हिरावून घ्यायचा नाही.

शिवसेना ही मराठी माणूस आणि हिंदूंचे हक्क जपणारी संघटना आहे. आम्ही हपालेले नाही. मुंबईसाठी हिंदुत्वासाठी झटणारे आम्ही आहोत. ज्या लोकांना हे काही करायचं होतं ते करू द्या कुणीही त्यांच्या वाटेत येऊ नका आज मी महाराष्ट्राच्या साक्षीने माझ्या पदाचा त्याग करतो आहे. शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचल्याचा आनंद त्यांना खुशाल लुटू दे. मला तुमचे आशीर्वाद हवे आहेत. शिवसेना भवनात आता मी पुन्हा बसायला सुरूवात करणार आहे. माझ्या माता भगिनींना घेऊन शिवसेनेची वाटचाल नव्याने करणार आहे. मी महाराष्ट्रातच राहणार आहे. शिवसेना मोठी करणार आहे.

मी कुणालाही घाबरणारा नाही. शिवसेनेसाठी, शिवसेना संघटना नव्याने मोठी करण्यासाठी माझी वाटचाल सुरू राहणार आहे. त्यांना नव्या लोकशाहीत आनंद साजरा करायचा आहे तो करूद्या. पेढे वाटू द्या, एकमेकांना भरवू द्या. मला शिवसैनिकांच्या प्रेमाचा गोडवा हवा आहे. वारकरी मला म्हणाले होते यावर्षी मुख्यमंत्री म्हणून तुम्हीच आषाढीच्या पूजेला या. मात्र माऊलीलाच ते मान्य नसावं त्यामुळे हे सगळं झालं आहे. मी महाराष्ट्राच्या जनतेचा आभारी आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासोबतच मी विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा देतो आहे. मी पुन्हा येईन असं बोललो नव्हतो तरीही आलो. आता यापुढची वाटचाल शिवसेना मोठी करण्यासाठी करणार आहे. मला ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांचे आभार. जय हिंद जय महाराष्ट्र.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in