काँग्रेसला बिगर गांधी घराण्याचा अध्यक्ष मिळणार? अशोक गेहलोत यांची का होतेय चर्चा?

अशोक गेहलोत काँग्रेसचे अध्यक्ष होऊ शकतात अशा चर्चांना उधाण आलं आहे
congress presidential election gandhi family ashok gehlot frontrunner rahul sonia priyanka
congress presidential election gandhi family ashok gehlot frontrunner rahul sonia priyanka

काँग्रेस आणि गांधी नातं स्वातंत्र्य पूर्व काळापासूनच आहे हे आपल्याला माहित आहे. गांधी परिवार आणि काँग्रेस यांचं नातं म्हणजे पाण्यात विरघळलेल्या साखरेसारखं. इंदिरा गांधी या आपल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. त्यांच्या हत्येनंतर त्यांचे पुत्र राजीव गांधी हे देशाचे पंतप्रधान झाले. राजीव गांधी यांचीही हत्या करण्यात आली. या हत्येनंतर काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळली ती सोनिया गांधी यांनी. पण, आता काँग्रेस अध्यक्षपदासाठी अशोक गेहलोत यांचं नाव चर्चेत आलंय.

सोनिया गांधी विदेशी असल्याचा मुद्दाही चांगलाच गाजला होता. मात्र त्यांच्या कार्यकाळात दोनदा यूपीएची सत्ता आली. सोनिया गांधीनंतर हे पद आलं राहुल गांधी यांच्याकडे. राहुल गांधी यांच्याकडे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणूनही पाहिलं गेलं. पण राहुल गांधी हे सोनिया गांधी किंवा राजीव गांधी यांच्यासारखा करीश्मा दाखवू शकले नाहीत. आता अशोक गेहलोत हे काँग्रेसचे अध्यक्ष होतील अशा चर्चा आहेत. असं घडलं तर अनेक वर्षांनी पहिल्यांदाच काँग्रेसला बिगर गांधी घराण्याचा अध्यक्ष मिळू शकतो.

काँग्रेसचा अध्यक्ष बिगर गांधी घराण्याचा होणार?

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत सध्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. नुकतीच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्यामुळे अशोक गेहलोत यांच्या रूपाने काँग्रेसला बिगर गांधी घरण्याचा अध्यक्ष मिळणार ही चर्चा रंगली आहे. राहुल गांधी ही जबाबदारी पुन्हा एकदा आपल्या खांद्यावर घेण्यास तयार नाहीत. तर सोनिया गांधी यांनाही प्रकृतीच्या कारणामुळे ही जबाबदारी नको आहे. सोनिया गांधी बुधवारी उपचारांसाठी विदेशात जाणार आहेत. अशात त्याआधी त्यांनी अशोक गेहलोत यांची भेट घेणं सूचक मानलं जातं आहे.

अशोक गेहलोत यांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण

ऱाजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सोनिया गांधींची भेट घेतली त्यानंतर या चर्चा सुरू झाल्या आहेत. सोनिया गांधी आणि अशोक गेहलोत यांची भेट झाल्यानंतर या भेटीत अशोक गेहलोत यांनी काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारवं असा आग्रह धरल्याचं समजतं आहे. मात्र अशोक गेहलोत यांचं म्हणणं आहे की या सगळ्या चर्चा मला प्रसारमाध्यमांकडून समजत आहेत. पक्षाने मला गुजरात निवडणुकीच्या दृष्टीने प्रभारी नेमलं आहे मी ती जबाबदारी पार पाडतो आहे असंही त्यांचं म्हणणं आहे.

सोनिया गांधी आणि अशोक गेहलोत यांच्यात बैठक

सोनिय गांधी या काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्ष आहेत. त्या आता उपचारांसाठी परदेशात जात आहेत. त्याआधी अशोक गेहलोत यांच्याशी त्यांनी सविस्तर चर्चा केली. त्यामुळेच काँग्रेसचे पुढचे अध्यक्ष अशोक गेहलोत असतील अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. अशोक गेहलोत हे गांधी परिवाराच्या अत्यंत जवळचे मानले जातात. त्यांच्याकडे राजकीय आणि संघटन कौशल्याचा सर्वाधिक अनुभव आहे. काँग्रेसमधल्या जुन्या आणि नव्या नेत्यांकडून अध्यक्ष म्हणून त्यांना स्वीकारलं जाण्यात काहीही अडचण येणार नाही.

अशोक गेहलोत यांचं या सगळ्या चर्चांनंतर काय म्हणणं आहे?

अशोक गेहलोत यांनी पत्रकारांशी बोलताना हे म्हटलं आहे की सोनिया गांधी आणि माझी चर्चा झाली. मी त्यांना हेच सांगितलं की राहुल गांधी यांनीच काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली पाहिजे. कारण राहुल गांधी हेच आमचे नेते आहेत. देशातल्या कोट्यवधी काँग्रेस कार्यकर्त्यांनीही मनोमन हेच वाटतं की पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी असावेत. काँग्रेस अध्यक्षपद स्वीकारणं हे काटेरी मुकुट घालण्यासारखं आहे याची जाणीव अशोक गेहलोत यांना आहे त्यामुळेच ते ही जबाबदारी स्वीकारू इच्छित नाहीत असं सूत्रांचं म्हणणं आहे. अशोक गेहलोत यांना हे देखील व्यवस्थित माहित आहे की बिगर गांधी असल्याने काँग्रेसचं नेतृत्व करणं किती कठीण जाऊ शकतं.

अशोक गेहलोत यांना का वाटत नाही की अध्यक्ष व्हावं?

अशोक गेहलोत हे राजस्थानचे मुख्यमंत्री आहेत. हे पद ते काही केल्या सोडण्यास तयार नाहीत. २०२३ मध्ये राजस्थानात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यावेळीही राजस्थानमध्ये पक्षाचं नेतृत्व करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. एवढंच नाही तर राजस्थानची सत्ता ते सचिन पायलट यांच्या हाती देण्यासही तयार नाहीत. त्यामुळेच ते वारंवार सांगत आहेत की राहुल गांधींनीच अध्यक्षपद सांभाळलं पाहिजे.

प्रियंका गांधी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीतून बाहेर?

प्रियंका गांधी वाड्रा या देखील सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासोबत परदेशात जात आहेत. त्यांनी विदेशात जाण्याचा अर्थच हा आहे की काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेतून त्या बाहेर जात आहेत. पक्षाच्या नेत्यांनी हा पेच सोडवावा अशी त्यांची इच्छा आहे असंही कळतं आहे.

काँग्रेस अध्यक्षाची निवड होणार की निवडणूक?

काँग्रेस मध्ये या सगळ्या चर्चा सुरू असताना गांधी परिवार विदेशात रवाना होतो आहे. राहुल गांधी हे स्वतःला या सगळ्या प्रकियेपासून बाजूला ठेवत आहेत. प्रियंका गांधी यांचीही कृती तेच सांगते आहे. अशात प्रश्न हा निर्माण झाला आहे की काँग्रेसचा अध्यक्ष नेमला जाणार की निवडणूक होणार?

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in