राज ठाकरेंचा सल्ला ऐकला असता तर शिंदेंवर नामुष्की ओढावली नसती : प्रकाश महाजन

राज ठाकरेंचा सल्ला किती योग्य होता, हे आता ध्यानात आले असेल.
cm eknath shinde-mns chief raj thackeray
cm eknath shinde-mns chief raj thackerayMumbai Tak

मुंबई : शिवाजी पार्क दसरा मेळाव्यावरुन शिंदे विरुद्ध ठाकरे गटात सुरु झालेल्या राजकारणात अखेरीस ठाकरे गटाचा विजय झाला. त्यामुळे इथे ठाकरे गटाचा मेळावा पार पडणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मात्र याच शिवाजी पार्कबाबत कोणतेही राजकारण न करण्याचा सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला होता, असा मोठा गौप्यस्फोट मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केला.

प्रकाश महाजन ABP माझा वाहिनीशी बोलताना म्हणाले, राज ठाकरे यांनी दसरा मेळावा घ्यावा असे मनसेतील तरुण कार्यकर्त्यांचं म्हणणं होते. मी कार्यकर्त्यांची ही इच्छा राज ठाकरेंना बोलून दाखवली. त्यावर त्यांनी फार छान उत्तर दिले. वर्षानुवर्ष स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, शिवसेना, दसरा मेळावा आणि शिवाजी पार्क हे समीकरण घट्ट आहे. आपण त्यात जाणे हे कोतेपणाचे आहे. हे समीकरण तसेच राहिले पाहिजे. त्यामुळे मी दसरा मेळावा घेण्यास उत्सुक नाही.

तसेच राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांनाही शिवाजी पार्कबाबत राजकारण न करण्याचा सल्ला दिला होता असा गौप्यस्फोटही यावेळी महाजन यांनी केला. राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना सांगितले होते, की दसरा मेळाव्याबाबत शिवाजी पार्कवरुन राजकारण करु नये, ते कोतेपणाचे लक्षण दिसेल. राज ठाकरेंचा सल्ला किती योग्य होता, हे आता ध्यानात आले असेल. राज ठाकरे यांची बाळासाहेबांविषयी श्रद्धा यातून दिसते, असेही महाजन म्हणाले.

शिवाजी पार्कवरुन राजकारण :

मुंबई महापालिकेने शिवाजी पार्क मैदानावर सभा घेण्यास परवानगी नाकारल्यानंतर ठाकरे गटाने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. ठाकरे गटाने महापालिकेच्या निर्णयाला आव्हान दिल्यानंतर शिंदे गटाकडूनही आमदार सदा सरवणकर यांनी हस्तक्षेप याचिका दाखल केली. त्यानंतर शिवसेना, शिंदे गट आणि मुंबई महापालिका अशा तिन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत कोर्टाने ठाकरे गटाला परवानगी दिली.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in