गिरीश महाजनांच्या 'पीए'ने जिंकली लाखाची पैज, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा झाला 'कार्यक्रम'

Rajya sabha election Result 2022 : अरविंद देशमुखांनी लावली होती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासोबत पैज
गिरीश महाजनांच्या 'पीए'ने जिंकली लाखाची पैज, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा झाला 'कार्यक्रम'

निवडणुकीच्या निकालाकडे जितकं राजकीय पक्षांचं, नेत्यांचं लक्ष लागलेलं असतं. तितकंच लक्ष असतं कार्यकर्त्यांचं. त्यामुळे 'तुमच्यासाठी कायपण' असं म्हणणारे कार्यकर्ते काय करतील याचा नेम नाही. नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या निमित्ताने असाच किस्सा घडलाय. किस्सा आहे राज्यसभा निवडणुकीच्या निकालाची आणि ती जिंकलीये माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या 'पीए'ने!

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे खासमखास नेते असलेल्या गिरीश महाजन यांच्या 'पीए'ने तब्बल एक लाख रुपयाची पैज जिंकलीये. लाखाची पैज जिंकणाऱ्या महाजनांच्या पीएचं नाव आहे अरविंद देशमुख!

काय झालं?

राज्यात राज्यसभेची निवडणूक लागली. सहा जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत महाविकास आघाडीने चार उमेदवार दिले, तर भाजपने तीन. गिरीश महाजन यांचे पीए अरविंद देशमुख यांनी राज्यसभा निवडणुकीत भाजपचे तीनही उमेदवार जिंकतील असं आव्हान दिलं होतं.

अरविंद देशमुख यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून लाख रुपयाची पैज लावण्याचं आव्हान दिलं होतं. अरविंद देशमुख यांचं आव्हान स्वीकारलं ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलचे पदाधिकारी राहुल पाटील यांनी.

लाखाची पैज लागल्यानंतर प्रतिक्षा होती, ती निकालाची. शुक्रवारी सायंकाळी निकाल येईल असं वाटलं, मात्र रात्रभर चाललेल्या आक्षेप नाट्यानंतर शनिवारी (११ जून) निकालाचं चित्र स्पष्ट झालं आणि राष्ट्रवादीचे राहुल पाटील पैज हरले.

ठरल्याप्रमाणे राहुल पाटील एक लाख रुपयाचा धनादेश घेऊन अरविंद देशमुख यांच्या भेटीसाठी गेले. पण, अरविंद देशमुख यांनी खिलाडूवृत्तीचं दर्शन घडवत राहुल पाटील यांचा धनादेश परत केला. राज्यसभा निवडणुकीदरम्यान लागलेल्या या पैजेचा किस्सा आता राज्यभर चर्चिला जात आहे.

भाजपनं मारलं मैदान

राज्यसभेच्या सहा रिक्त जागांसाठी निवडणूक झाली. सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात असल्यानं राज्यसभेची निवडणूक चुरशीची ठरली. या निवडणुकीत भाजपनं मतांचं गणित जुळवत महाविकास आघाडीला झटका दिला. भाजपचे पीयूष गोयल, अनिल बोंडे, धनंजय महाडिक हे विजयी झाले, तर शिवसेनेच्या संजय पवारांना पराभव स्वीकारावा लागला.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in