Advertisement

बरं झालं महात्मा गांधींना मारलं, आज असते तर झुरून मेले असते -तुषार गांधी

तुषार गांधी हे सांगलीतील एका कार्यक्रमात बोलत होते.
Tushar Gandhi in sangali program
Tushar Gandhi in sangali program

'बर झालं गांधींना मारलं, कारण आज गांधी असते तर आजची परिस्थिती बघून गांधीजी रोज झुरून झुरून मेले असते,' अशी उद्विग्न प्रतिक्रिया महात्मा गांधी यांचे नातू तुषार गांधी यांनी दिली आहे. तुषार गांधी हे सांगलीतील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर देखील निशाणा साधला. सांगलीत क्रांती अग्रणी जी. डी. बापू लाड यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त 'स्वातंत्र्य लढ्यातील प्रति सरकारचे योगदान' या विषयावर व्याख्यान आणि मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी तुषार गांधी यांनी संवाद साधला.

लोकशाही वाचवण्यासाठी प्रति सरकारची गरज वाटत नाही का?, तुषार गांधींचा सवाल

75 वर्षात आदर्श पात्र लोकं इतिहासातच का राहिले? महाराष्ट्राची परिस्थिती आणि लोकशाही वाचवण्यासाठी प्रतिसरकारची गरज वाटत नाही का? असे सवाल त्यांनी उपस्थित केले. या राज्यात गद्दारांची संख्या आहे. स्वातंत्र्य संग्रामात बेमानी करणारे आणि आता ज्यांच्यामुळे नेतृत्व करण्याची संधी मिळाली त्यांच्या सोबतच गद्दारी करणारे, अशा दोन प्रकारच्या गद्दारांची मिळून सध्या राज्यात सत्ता आहे, अशी टीका तुषार गांधी यांनी केली. यादरम्यान त्यांनी एकनाथ शिंदे आणि फसनवीस सरकारवर घणाघाती टीका केली.

लोकशाही जिवंत आहे का?

सभोवताली अन्याय अत्याचार सुरू असताना, आपण गप्प बसलो आहोत, लोकशाही जिवंत आहे का ,असा उद्विग्न सवाल ही तुषार गांधी यांनी उपस्थित केला. लोक जबाबदारीने आपलं कर्तव्य निभावतात हा लोकशाहीचा अर्थ आहे. पण कुठले लोक आज संविधानात दिलेले कर्तव्य निभावत आहेत? सत्य ऐकायला शिका आणि सत्य आहे की, आम्ही सध्या नालायक लोकशाहीत आहोत, असं तुषार गांधी म्हणाले.

चांगलं झालं गांधींची हत्या झाली, आज असते तर झुरुन मेले असते

म्हणून चांगलं झालं गांधीजींची हत्या केली. कारण ते जिवंत असते तर आपल्यामुळे रोज तीळ- तीळ मेले असते. चांगलं झालं मारलं, कारण ज्यांनी मारलं त्यांचं जगणं अवघड केलं आहे त्यांच्या आत्म्याने. आज पण ते घाबरतात म्हणून गांधीजींच्या विरोधात असत्याचा प्रचार करतात, असं गांधीजींचे नातू तुषार गांधी म्हणाले. आज इतक्या वर्षानंतर गांधी, फुले, शाहू, आंबेडकर, शिवाजी महाराज यांच्या लायकीचे उरलो आहोत का? असा प्रश्न स्वतःला विचारायला पाहिजे, तुषार गांधी म्हणाले. एकूणच या कार्यक्रमात तुषार गांधी यांनी महात्मा गांधी, अन्य महात्मे आणि सध्या सुरु असलेली परिस्थिती यावर भाष्य केले. यासह लोकशाहीवर देखील त्यांनी प्रकाश टाकला. सध्या आपण जगत असलेली नालायक लोकशाही आहे , असं त्यांचं म्हणणं आहे. या कार्यक्रमाला अन्य मान्यवर देखील उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in