एकनाथ शिंदेंचं बंड! ठाकरे सरकार पडणार अल्पमतात?; पुढे काय होणार?

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केले आहे. काल रात्रीपासून एकनाथ शिंदे हे गुजरातमध्ये आहेत.
एकनाथ शिंदेंचं बंड! ठाकरे सरकार पडणार अल्पमतात?; पुढे काय होणार?
Sharad Pawar | Uddhav Thackeray@PTI

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करत काल रात्रीपासून गुजरातमध्ये तळ ठोकला आहे. त्यांच्याशी संपर्क होते नसल्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व करणाऱ्या शिवसेनेत फूट पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. शिवाय, शिंदे अनेक आमदार सोबत घेऊन गेले आहेत. अनेक दिवसांपासून एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा होती. आता एकनाथ शिंदेंनी जर खरंच शिवसेना (Shivsena) सोडली तर पक्षांसमोर काय पर्याय आहेत? पुढे काय होऊ शकते हे जाणून घेऊयात.

37 आमदार शिंदेंसोबत असले तर...

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जर 37 आमदार आपल्या बाजूने केले तर महाविकास आघाडी सरकार पडण्याची शक्यता आहे. पक्षांतर विरोधी कायद्यानुसार, ब्रेकवे गट तयार करण्यासाठी 2/3 सदस्यांचे समर्थन आवश्यक असते. एकनाथ शिंदेंकडे सध्या 26 आमदारांचे समर्थन असल्याची चर्चा आहे. शिंदेंसोबत सुरतमध्ये 26 आमदार असल्याची एक यादी व्हायरल झाली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंना नवा गट स्थापन करण्यासाठी 11 आमदारांची गरज लागू शकते.

जर महाविकास आघाडी सरकार पडले तर...

एकनाथ शिंदेनी जर आपल्या सोबत असलेल्या आमदारांसोबत शिवसेना सोडली तर महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) पडेल. सरकार पडले तर भाजप एकनाथ शिंदेंच्या गटासोबत सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करेल. यावेळी मात्र भाजप सतर्क असेल कारण मागच्या भाजपने अजित पवारांना सोबत घेऊन सरकार स्थापन केले होते, परंतु ते सरकार 70 तासात कोसळले होते. यांनतर महाविकास आघाडी तयार झाली आणि मागच्या अडीत वर्षांपासून भाजप राज्यात विरोधी पक्षात आहे.

महाविकास आघाडीला संघर्ष करावा लागणार

महाविकास आघाडीला आपले घर एकत्र ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागू शकतो कारण काँग्रेसमध्येही बंडखोरी होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे काही आमदार नाराज आहेत, पाच आमदार नॉट रिचेबल असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आपले सरकार टिकवण्यासाठी आघाडी सरकारला मोठा संघर्ष करावा लागणार आहे.

शिवसेना-भाजप एकत्र येण्याची शक्यता किती?

शिवसेना-भाजपमध्ये मागच्या अनेक दिवसांपासून संघर्ष सुरु आहे. शिवसेना नेते मागच्या काही काळापासून ईडीच्या रडारवर आहेत. आनंदराव अडसूळ, भावना गवळी, प्रताप सरनाईक, संजय राऊत, अनिल परब यांसारखे शिवसेनेचे महत्त्वाचे ईडीच्या रडारवर आहेत. भाजप सरकार केंद्रीय तपास यंत्रणांच्या मदतीने वार करत असल्याची टीका वारंवार शिवसेना नेत्यांनी केली आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपची युती सध्यातरी शक्य नाही.

मध्यावधी निवडणुका होतील का?

एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या गटाने जर सरकारसोबतचा पाठिंबा काढून घेतला आणि भाजपने जर त्यांच्यासोबत सरकार स्थापन करण्याचा दावा केला तर अविश्वास प्रस्ताव आणून नवे सरकार स्थापन करण्याचा दावा केला जाऊ शकतो. फडणवीसांनी सरकार स्थापन करण्यास नकार दिल्यावर राज्यपाल राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करतील आणि त्यानंतर मध्यावधी निवडणुका होतील. मध्यावधी निवडणुकांची प्रक्रिया सध्यातरी अवघड आहे.

महाराष्ट्रात 'ऑपरेशन लोटस' होणार?

काँग्रेसची सत्ता असलेल्या अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश आणि कर्नाटकात भाजपने सत्ता आपल्या बाजूने खेचून आणली होती. काँग्रेसकडे पुरेसे आमदार असतानाही भाजपने ऑपरेशन लोटस राबवत आपले सरकार स्थापन केले होते. आता पुन्हा महाराष्ट्रात त्याची प्रचिती येणार का? अशा चर्चा सुरु आहे. 'ऑपरेशन लोटस' म्हणजे स्वबळावर सरकार स्थापन करण्यासाठी पुरेशा जागा नसलेल्या राज्यांमध्ये सत्ता मिळवण्याच्या भाजपची कथित रणनीती.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in