'एकनाथ शिंदेंनी शिवसेना पक्षापर्यंत जायला नको होतं'; बंडावर बोलताना बच्चू कडूंचं मोठं विधान

bacchu kadu on Shiv Sena split : एकनाथ शिंदेंनी बंडानंतर शिवसेनेवरच दावा ठोकलाय, त्यांच्या या विधानावर बच्चू कडूंनी व्यक्त केली खंत
bacchu kadu and eknath shinde
bacchu kadu and eknath shinde

एकनाथ शिंदेंच्या बंडाने शिवसेनेत दोन गट पडले. दोन्ही गटातील वाद शिगेला गेला आणि शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदासाठी बंड केलं, अशीही चर्चा सातत्यानं राजकीय वर्तुळात आणि समाजमाध्यमांवर होत असते. शिवसेनेत झालेल्या फुटीवर बोलताना बच्चू कडूंनी मोठं विधान केलंय. त्यामुळे शिंदेंचं बंड खरंच मुख्यमंत्रीपदासाठी होतं का? या प्रश्नाने पुन्हा एकदा डोकं वर काढलंय.

एकनाथ शिंदेंसह चाळीस आमदारांनी बंड केलं. त्यानंतर शिवसेनेवरच शिंदे गटाने दावा ठोकला. या राजकीय घटनेवर आमदार बच्चू कडू 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात बोलताना भाष्य केलं. 'गेल्या शंभर दीडशे दिवसात शिवसेनेत जे झालं, त्याबद्दल तुमची काय भावना आहे?', असा प्रश्न बच्चू कडूंना विचारण्यात आला होता.

या प्रश्नाला उत्तर देताना बच्चू कडू म्हणाले, "वाईट आहे. एखादं संघटन एव्हढं कोसळतं, त्याचं वाईट वाटतं. मी जरी एकनाथ शिंदेंसोबत असलो, तरी मला मनात असं वाटतं होतं की, मुख्यमंत्र्यापर्यंत (मुख्यमंत्री पदापर्यंत) ही लढाई ठीक होती. त्या पक्षापर्यंत जायला नको होतं, असं मला वाटतं. कुठल्याही संघटनेचं इतकं पतन होणं फार काही चांगलं नाहीये."

bacchu kadu and eknath shinde
बच्चू कडू-रवी राणांचा वाद मिटणार?, राणा शिंदेंच्या भेटीसाठी मुंबईत, पडद्यामागं काय घडलं?

पतन या शब्दाबद्दलही बच्चू कडूंनी लागलीच खुलासा केला. ते म्हणाले, "पतन हा शब्द नकळत निघाला असेल. असं वाटतं की जे नुकसान झालं. म्हणजे ४० आमदार पक्षातून जाणं ही लहान गोष्ट नाहीये. ते त्यांना पुन्हा उभं करणं, याचं दुःख त्यांना आहे. ते कोणत्या कारणास्तव गेले, हे एकनाथ शिंदेंनी सांगितलं आहे. तो एक वेगळा भाग आहे. पण कुठल्याही पक्षाच... उद्या २०-२५ आमदार शिंदेंचे गेले, तर त्यांनाही दुःख होणारच आहे", असं बच्चू कडू यांनी म्हटलंय.

शिंदेंनी मुख्यमंत्रीपदासाठी बंड केलं?; बच्चू कडूंच्या विधानाचा अर्थ काय?

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेईपर्यंत एक मुद्दा सातत्यानं चर्चेत राहिला, तो म्हणजे शिंदेंचं बंड मुख्यमंत्री पदासाठी असल्याचा. या मुद्द्यावर शिंदे गटाकडून वेळोवेळी खुलासेही करण्यात आले. मात्र, बच्चू कडू यांनी मुख्यमंत्रीपदाचा उल्लेख करत शिवसेनेवर दावा ठोकण्याबद्दल केलेल्या विधानानं हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. मुख्यमंत्रीपदापर्यंत लढाई ठीक होती, असं आमदार कडू म्हणालेत. त्याचा अर्थ शिंदेंचं बंड मुख्यमंत्रीपदासाठी होतं, असा प्रश्न उपस्थित झालाय.

यापूर्वीही एकनाथ शिंदे, शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर आणि रामदास कदम यांनी मुख्यमंत्रीपदाबद्दल विधान केलेली आहेत. उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करणार होते, पण ऐनवेळी स्वतः झाले. त्याचबरोबर एकनाथ शिंदेंनीही उपमुख्यमंत्री पद आणि मुख्यमंत्री पदाबद्दलची मनातील खदखद व्यक्त केलेली आहे. त्यामुळे आता बच्चू कडूंच्या विधानावर शिंदे गटाकडून काय भूमिका मांडली जाणार हे पाहावं लागेल.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in