मुख्तार अब्बास नकवी मोदींच्या मंत्रिमंडळातून बाहेर, मंत्रिपदाचा दिला राजीनामा

Mukhtar Abbas Naqvi resign : मुख्तार अब्बास नकवी यांनी केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रिपदाचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केला
Mukhtar Abbas Naqvi resigns as union minister for minority affairs
Mukhtar Abbas Naqvi resigns as union minister for minority affairs

राज्यसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी दिली न गेल्यानं मुख्तार अब्बास नकवी यांना मंत्रिमंडळातून बाहेर पडावं लागेल, अशी चर्चा सुरू झाली होती. त्यावर आज शिक्कामोर्तब झालं असून, मुख्तार अब्बास नकवी यांनी आज केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रीपदाचा राजीनामा दिला.

मुख्तार अब्बास नकवी यांनी आज अल्पसंख्याक व्यवहार मंत्रीपदाचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केला. मुख्तार अब्बास नकवी राज्यसभेचे सदस्य होते. त्यांचा राज्यसभेतील कार्यकाळ संपला आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजपकडून मुख्तार अब्बास नकवी यांना उमेदवारी दिली जाईल, असं बोललं गेलं. मात्र भाजपनं त्यांना पुन्हा उमेदवारी दिली नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांचा राज्यसभेतील कार्यकाळ गुरुवारी संपत आहे. यात मुख्तार अब्बास नकवी यांच्याबरोबर जदयूच्या कोट्यातील आरसीपी सिंह यांचाही समावेश आहे. दोघेही ६ जुलैनंतर संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य असणार नाहीत.

८ वर्षांपासून होते मोदींच्या मंत्रिमंडळात

मुख्तार अब्बास नकवी हे २०१० पासून २०१६ पर्यंत उत्तर प्रदेशातून राज्यसभेचे सदस्य होते. २०१६ मध्ये त्यांना झारखंडमधून राज्यसभेवर पाठवण्यात आलं होतं. मुख्तार अब्बास नकवी यांनी १९९८ मध्ये पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवली होती. पहिल्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालं होतं.

अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात मुख्तार अब्बास नकवी हे माहिती व प्रसारण खात्याचे राज्यमंत्री होते. त्यानंतर २६ मे २०१४ रोजी मोदी सरकारमध्ये त्यांच्याकडे अल्पसंख्याक विभाग आणि संसदीय कामकाज खात्याची राज्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

१२ जुलै २०१६ मध्ये नजमा हेपतुल्ला यांच्या राजीनाम्यानंतर मुख्तार अब्बास नकवी यांना अल्पसंख्याक मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार देण्यात आला होता. त्यानंतर ३० मे २०१९ रोजी त्यांना पुन्हा मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं होतं.

मुख्तार अब्बास नकवी यांच्यावर कोणती जबाबदारी देणार?

मोदींच्या मंत्रिमंडळातून एक्झिट घेतल्यानंतर मुख्तार अब्बास नकवी यांच्यावर भाजप मोठी जबाबदारी सोपवण्याची शक्यता आहे. दिल्लीतील राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू असून, मुख्तार अब्बास नकवी यांचं नाव उपराष्ट्रपती पदासाठी भाजपकडून पुढे केलं जाऊ शकतं.

मुख्तार अब्बास नकवी यांना राज्यपाल बनवलं जाऊ शकतं, असंही बोललं जात आहे. मात्र याबाबत निश्चित अशी कोणतीही माहिती नाही. दुसरीकडे जदयूचे आरसीपी सिंह हे भाजपत प्रवेश करण्याची शक्यता आहे. सध्या राष्ट्रपतींच्या कोट्यातून राज्यसभेवर नियुक्त केल्या जाणाऱ्या खासदारांच्या सात जागा रिक्त आहेत. या सात जागांसाठी कुणाची निवड केली जाणार हेही महत्त्वाचं असणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in