मिलिंद नार्वेकरांची सुरक्षा शिंदे सरकारने वाढवली, अनेक बड्या नेत्यांची सुरक्षा काढली

शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय : जितेंद्र आव्हाडांची सुरक्षा कायम, छगन भुजबळांसह इतर काही नेत्यांची सुरक्षा हटवली...
CM Eknath Shinde and DCM Devendra Fadnavis
CM Eknath Shinde and DCM Devendra FadnavisMumbai Tak

राज्यातल्या सत्तांतरानंतर अनेक निर्णय शिंदे-फडणवीस सरकारकडून घेण्यात आलेत. महाविकास आघाडीच्या काळात घेण्यात आलेले निर्णय बदलत शिंदे-फडणवीसांनी महाविकास आघाडीला जोरदार धक्के दिले. त्यानंतर आता महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातील काही मोठ्या नेत्यांची सुरक्षा हटवण्यात आलीये. महत्त्वाचं म्हणजे मिलिंद नार्वेकरांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीये, तर दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षा कायम ठेवण्यात आलीये.

महाविकास आघाडीतील (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस) तिन्ही पक्षातील नेत्यांच्या सुरक्षेबद्दल महत्त्वाचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारकडून घेण्यात आलाय. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांची सुरक्षा हटवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

मिळालेल्या माहितीनुसार तुरूंगात असलेले खासदार संजय राऊत, आमदार नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सुरक्षा काढण्यात आली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांची सुरक्षाही हटवण्यात आलीये.

काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नितीन राऊत, युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री सतेज पाटील यांचीही सुरक्षा हटवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत वाढ

शिवसेनेतल्या फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्या जवळचे मानले गेलेले मिलिंद नार्वेकर सातत्यानं चर्चेत आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर अनेक नेत्यांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला. मिलिंद नार्वेकर कुणासोबत जाणार याकडे लक्ष होतं. मात्र, नार्वेकर ठाकरेंसोबत राहिले. औरंगाबाद दौऱ्यातही मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते. मात्र, मिलिंद नार्वेकरांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

जितेंद्र आव्हाडांची सुरक्षा कायम

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांची सुरक्षा काढून टाकण्यात आलीये, पण राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षा कायम ठेवण्यात आलीये. महाविकास आघाडीतील नेत्यांची सुरक्षा हटवण्याचा निर्णय घेण्यात आला असला, तरी ठाकरे आणि पवार कुटुंबियांची सुरक्षा कायम ठेवण्यात आली आहे.

महाविकास आघाडीतील या नेत्यांनी सुरक्षा काढली

छगन भुजबळ (राष्ट्रवादी काँग्रेस)

नाना पटोले (प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस)

जयंत पाटील (प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस)

वरुण सरदेसाई (सरचिटणीस, युवा सेना)

बाळासाहेब थोरात (काँग्रेसचे ज्येष्ठ नेते)

धनंजय मुंडे (राष्ट्रवादी काँग्रेस)

भास्कर जाधव (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे)

नवाब मलिक (राष्ट्रवादी काँग्रेस)

सतेज पाटील (काँग्रेस)

नरहरी झिरवळ (विधानसभा उपाध्यक्ष)

सुनील केदार (काँग्रेस)

नितीन राऊत (काँग्रेस)

विजय वडेट्टीवार (काँग्रेस)

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in