नाशिक विधान परिषद: सर्वात मोठी बातमी, सत्यजीत तांबेंनी भरला अपक्ष फॉर्म

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नाशिक: नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणुकीतील सर्वात मोठी बातमी आता समोर आली आहे. कारण अगदी शेवटच्या क्षणी काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. आता हा उमेदवारी अर्ज सत्यजीत तांबेंनी काँग्रेसच्या AB फॉर्मवर भरला की नाही याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. त्यामुळे या संपूर्ण निवडणुकी बाबत बराच सस्पेन्स कायम आहे.

महाविकास आघाडीत नाशिक पदवीधर मतदारसंघ हा काँग्रेसच्या वाटणीला आला होता. पण या मतदारसंघाबाबत काँग्रेसने अगदी शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारच जाहीर केला नव्हता. फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी आणि शेवटच्या तासाभरात काँग्रेसने अचानक डॉ. सुधीर तांबे यांनाच उमेदवारी जाहीर केली.

खरं तर या जागेवरुन निवडणूक लढविण्यासाठी सत्यजीत तांबे हे इच्छुक होते. पण काँग्रेसने सुधीर तांबेंना निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केल्याने मोठा पेच निर्माण झाला होता. पण या सगळ्या गोष्टींची आधीच जाणीव असल्याने सत्यजीत तांबे यांनी दोन फॉर्म तयार ठेवले होते. एक फॉर्म हा काँग्रेस पक्षाच्या वतीने भरलेला तर दुसरा फॉर्म हा अपक्ष म्हणून भरण्यात आला होता. पण काँग्रेसचा AB फॉर्म न मिळाल्याने आता सत्यजीत तांबे हे नाशिक पदवीधर निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष उमेदवार म्हणून दिसणार आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दुसरीकडे विद्यमान आमदार सुधीर तांबे यांनी आपल्या मुलासाठी काँग्रेस पक्षाने जाहीर केलेली उमेदवारी देखील नाकारली आहे. त्यांनी आपली सगळी ताकद मुलाच्या पाठिशी उभी केली आहे.

निवडणुकीचा अर्ज दाखल केल्यानंतर तांबे पिता-पुत्रांनी एकत्रच माध्यमांना प्रतिक्रिया दिली. पाहा यावेळी सुधीर तांबे आणि सत्यजीत तांबे नेमकं काय म्हणाले:

ADVERTISEMENT

समजून घ्या: शिक्षक-पदवीधर विधान परिषदेची निवडणूक का आणि कशी होते?

ADVERTISEMENT

…म्हणून मी निवडणूक फॉर्म भरला नाही: सुधीर तांबे

‘काँग्रेस पक्षातर्फे मी नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडून आलं आहे. पहिल्या वेळेस मी अपक्ष होतो. पदवीधर मतदारसंघ हा विधानपरिषदेचा वेगळा मतदारसंघ आहे. घटनेमध्ये आपल्या समाजातील जे पदवीधर आहेत त्यांना एक विशेष हक्क घटनेने प्रदान केला आहे. तेव्हा अशा बुद्धीवंत वर्गाचं.. ज्यामध्ये डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक आहेत याशिवाय वेगवेगळ्या क्षेत्रातील जे पदवीधर आहेत. अशा सुज्ञ लोकांचं प्रतिनिधित्व मला करण्यास मिळालं आहे 13 वर्ष. मी खूप काम केलं आहे या सर्व लोकांसाठी. पदवीधर मतदारसंघाला एक वेगळा आयाम देण्याचा मी प्रयत्न केला.’

‘हे सगळं करत असताना मला जाणवलं की, औद्योगिक क्षेत्र पण आहे ज्यामध्ये खूप वेगवेगळे विषय आहेत. तंत्रज्ञान बदलत चाललं आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटलं की, या ठिकाणी आता एक तरुण नेतृत्व देण्याची गरज आहे.’

‘आपल्याला माहिती आहे की, राज्यात आता तरुण मुलं ही नेतृत्व करतायेत. त्यामध्ये सत्यजीत तांबे हे व्हिजन आणि दृष्टीकोन असलेला एक चांगलं नेतृत्व आहे. वेगवेगळ्या विषयाचं त्यांना सखोल ज्ञान आहे. त्यामुळे असं एक नेतृत्व द्यावं असं आमचं ठरलं. म्हणून सत्यजीत तांबे यांचा अर्ज आम्ही त्याठिकाणी महाविकास आघाडी म्हणून भरला आहे.’

‘आम्ही फक्त सत्यजीत तांबे यांचाच अर्ज भरला आहे. असं नाही की, कोणी विरोध केला असेल मला वाटत नाही. कारण शेवटी आमच्या पक्षाचं देखील एक धोरण असतं की, तरुण व्यक्तिमत्व आली पाहिजेत. तरुणांना संधी देण्याचं काम काँग्रेसने नेहमीच केलं आहे.’

‘दोन अर्ज आम्ही भरले आहेत… थोडंसं काय झालं की, AB फॉर्म हा माझ्या नावाने आलेला होता. थोड्या तांत्रिक अडचणी आहेत. परंतु इथे काही चिन्ह नसतं.. या निवडणुकीत चिन्ह नसतं.. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून सत्यजीत तांबे निवडणूक लढवतील.’

‘कसं असतं की, चांगलं तरुण व्यक्तिमत्व आहे. इथे बऱ्याच गोष्टी अशा असतात की, पक्षाच्या पलीकडेही विचार करावा लागतो. त्यामुळे आमची अपेक्षा आहे की, सर्वच पक्ष हे सत्यजीत यांना मदत करतील.’

‘भाजपची भूमिका काय आहे ते मला माहित नाही. शेवटी त्यांचा पक्षही मोठा आहे. पण मला काही त्यांची ऑफर नव्हती.’ अशी प्रतिक्रिया सुधीर तांबे यांनी दिली आहे.

विधान परिषद निवडणूक 2023: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप?

ऐनवेळी सुधीर तांबेंच्या नावाची घोषणा झाली, पण…: सत्यजीत तांबे

‘असं आहे की, आम्ही काँग्रेस पक्षाकडे मागणी केली होती की, यावेळेस काँग्रेसमधील अनेक लोकांची मला उमेदवारी देण्याची इच्छा होती. काँग्रेस पक्षाने मात्र, निर्णय घेताना डॉ. सुधीर तांबे यांच्या उमेदवारीचा निर्णय घेतला आणि आज तो दुपारी त्यांनी तो जाहीर केला. त्यामुळे तांत्रिक अडचणीमुळे शेवटच्या क्षणी मी फॉर्म भरला. तरीपण मी फॉर्म भरताना दोन फॉर्म भरले आहेत. एक काँग्रेसचा आहे आणि एक अपक्ष आहे. परंतु माझ्या नावाचा AB फॉर्म हा वेळेवर येऊ न शकल्यामुळे मला आता अपक्ष म्हणूनच निवडणूक लढवावी लागेल.’

‘परंतु मी उमेदवार काँग्रेस पक्षाचा आहे. काँग्रेसच्या विचारावर आजपर्यंत काम केलं आहे. हे जरी खरं असलं तरी मी सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना आता भेटणार आहे. सगळ्यांना मी विनंती करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना देखील भेटणार आहे. मी शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या सर्व नेत्यांना भेटणार आहे. मी भाजपच्या सर्व नेत्यांना भेटून विनंती करणार आहे की, राजकीय पक्षाच्या विचारसरणी आणि सीमांच्या पलीकडे जाऊन या निवडणुकीत सर्वांनी माझ्या पाठिशी उभं राहावं. अशी माझी अपेक्षा आहे.’

‘मला सर्वांचा पाठिंबा मिळावा असा मी प्रयत्न करणार आहे. अद्यापपर्यंत मी भाजपच्या कोणत्याही नेत्याशी बोललेलो नाही. इथून पुढच्या काळात मी त्यांच्याशी बोलणार आहे आणि त्यांना विनंती करणार आहे.’

‘हे लक्षात घ्या की, काँग्रेस पक्षाच्या कोट्यात ही जागा आली होती. काँग्रेस पक्षाने निर्णय घ्यायचा होता की, कोण उमेदवार असणार आहे. काँग्रेस पक्षाने निर्णय घेतला की, सुधीर तांबे हे उमेदवार असतील. मात्र, आमच्या परिवारामध्ये, माझे हितचिंतक, मित्र, कार्यकर्ते आणि आमच्या पक्षातील वरिष्ठ नेते ज्यामध्ये आमचे एच के पाटील, थोरात साहेब असतील, नाना पटोले असतील या सगळ्यांशी आमची चर्चा झाली. सगळ्यांनी असं सांगितलं होतं की, सत्यजीत तुम्हीही या ठिकाणी लढू शकता. परंतु वेळेवर जाहीर होताना डॉ. सुधीर तांबेंचं नाव जाहीर झालं. त्यामुळे जो AB फॉर्म आहे तो मला मिळू शकला नाही 3 वाजेपर्यंत. त्यामुळे माझी उमेदवारी ही अपक्ष आहे.’

‘मी सर्व पक्षाच्या नेत्यांना अगदी मनसेपासून सर्वांना विनंती करणार आहे की, एका उदात्त हेतूने राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्वांनी माझ्या पाठिशी उभं राहावं मला मदत करावी असा प्रयत्न करणार आहे.’

‘मला असं वाटतं की, माझ्यासारखा कार्यकर्ता 22 वर्ष हा संघटनेमध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत काम करतोय. युवकांचे विविध प्रश्न मांडून आजपर्यंत मी राजकीय प्लॅटफॉर्मवर काम करतोय. आता हेच प्रश्न आता मोठा पटलावर घेऊन ज्यायचे असतील तर विधान परिषदेसारखा चांगला प्लॅटफॉर्म आहे. म्हणून मला जर सगळ्या राजकीय पक्षाने मदत केली तर हे प्रश्न मी अधिक ताकदीने मांडू शकतो.’

‘भाजप मला पाठिंबा देईल की नाही देईल हा त्यांच्या पक्षाच्या प्रश्न आहे. पण मी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना विनंत करणार आहे की, त्यांनी मला पाठिंबा द्यावा. कारण की, महाराष्ट्राच्या राजकारणाची परंपरा आहे की, एकमेकांना मदत करण्याची भूमिका ठेवली आहे. अनेक विधान परिषदेच्या निवडणुका या आपण बिनविरोध केल्या आहेत. अनेक विधानसभेच्या निवडणुका आपण बिनविरोध केल्या आहेत.’

‘यामुळेच मला असं वाटतं की, मोठ्या मनाने सर्व राजकीय पक्षाने त्यांनी मला पाठिंबा द्यावा.’

‘काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या आणि आमच्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होत्या. तसेच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचीच इच्छा होती की, मी निवडणूक लढवली पाहिजे. परंतु काही तांत्रिक कारणं किंवा विसंवादामुळे मला माहित नाही.. पण डॉ. सुधीर तांबे यांची उमेदवारी जाहीर झाली.पण माझी उमेदवारी ही काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आहे.’ अशी सविस्तर प्रतिक्रिया यावेळी सत्यजीत तांबे यांनी दिली आहे.

दरम्यान, या सगळ्या प्रकारातून पुन्हा एकदा काँग्रेस पक्षातील भोंगळ कारभार समोर आला आहे. अशावेळी आता सत्यजीत तांबे या निवडणुकीत कशा पद्धतीने विजय मिळविणार हे पाहणं अत्यंत रंजक ठरणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT