रायगड : राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षांची पंचायतीच्या आवारात महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

रायगड : थकीत वेतन आणि निवृत्ती वेतनाचे लाभ मागितले म्हणून रायगड जिल्ह्यातील तळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा आणि त्यांच्या पतीने निवृत्त ग्रंथपाल महिलेला लाथाबुक्कांंनी मारहाण केली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत नगराध्यक्षा अस्मिता भोरावकर आणि त्यांचे पती चंद्रकांत भोरावकर यांच्याविरुद्ध तळा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली अधिक माहिती अशी, मंगल पारखे या ६५ वर्षीय वृद्ध महिला तळा ग्रामपंचायतीच्या ग्रंथालयात मदतनीस म्हणून नोकरीला होत्या. तिथून २०११ साली त्या सेवानिवृत्त झाल्या. या दरम्यानच्या काळातील थकीत वेतन आणि इतर लाभ असे मिळून त्यांना २ लाख रुपये कार्यालयाकडून येणे बाकी आहे. याच वेतानासाठी त्या निवृत्तीनंतर सातत्याने पाठपुरावा करीत होत्या, मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला नाही.

काही दिवसात ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये झाले. आपलं वेतन मिळावं यासाठी पारखे वारंवार तळा नगरपालिकेच्या कार्यालयाच्या फेऱ्या मारत होत्या. मात्र त्यांना प्रतिसाद दिला जात नव्हता. अखेरीस आपल्या मागणीबाबत त्या नगराध्यक्ष अस्मिता भोरावकर यांना १८ ऑक्टोबरला भेटण्यासाठी गेल्या होत्या.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

त्यावेळी नगराध्यक्ष अस्मिता भोरावकर आणि त्यांचे पती चंद्रकांत भोरावकर यांनी पारखे यांना शिवीगाळ केली. तसंच “तु पुन्हा नगरपंचायत कार्यालयात आलीस तर तुला ठार मारू, अशी धमकी देत हाताने व लाथेने मारहाण केली”. भोरावकर यांचा रुद्रावतार पाहून पारखे तिथून निघून गेल्या. झाल्या प्रकारानंतर नगरपंचायतीमध्ये तणावाचं वातावरण होतं.

काही दिवसात तळा गावात हा प्रकार समजल्यानंतर ग्रामस्थांनी संबंधित महिलेला सोबत घेऊन पोलीस ठाण्यात धाव घेतली. यानंतर सोमवारी भोरवकर दाम्पत्याविरुद्ध विनयभंग, मारहणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याबाबत भोरावकर दाम्पत्याचं नेमकं म्हणणं अद्याप समोर आलेलं नसून ते येताच प्रसिद्ध करण्यात येईल.

ADVERTISEMENT

तळा नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता :

रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनिल तटकरे आणि आमदार आदिती तटकरे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य आहे. तळा नगरपंचायतीतही राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. इथे राष्ट्रवादी काँग्रेसला १० जागा, शिवसेनेला ४ आणि भाजपला ३ जागा आहेत. तर नगराध्यक्षपदी अस्मिता भोरावकर आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT