
गेल्या काही दिवसांपासून राज्यात महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप असा सामना पहायला मिळतो आहे. प्रत्येक दिवशी विविध मुद्द्यांवरुन हे दोन्ही गट समोरासमोर येत आहेत. आतापर्यंत या दोन्ही गटांमधला राजकीय वाद हा तीन वेळा कोर्टापर्यंतही गेला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं मुख्यमंत्र्यांविरुद्धचं विधान, एसटी कर्मचाऱ्यांचा शरद पवारांच्या घरावर हल्ला आणि राणा दाम्पत्याला हनुमान चालीसा वादात झालेली अटक या प्रकरणांत सरकारची बाजू विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी कोर्टासमोर मांडली.
भाजपने प्रदीप घरत यांच्यावर टीका करताना, घरत हे सरकारी वकील कमी आणि शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून जास्त काम करतात असं म्हटलं आहे. भाजपचे विधानपरिषद आमदार प्रसाद लाड यांनी रत्नागिरीत बोलत असताना ही टीका केली आहे.
"सरकारी वकील प्रदीप घरत हे सरकारी वकील कमी आणि शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून जास्त काम करत आहेत असं दिसतंय. आज ज्या पद्धतीमध्ये त्यांनी पंतप्रधानांबद्दल वक्तव्य केलं किंवा संविधानातील अधिकारांबद्दल जी वक्तव्य केली ती खेदजनक होती. कोर्टाने त्याच्यावर विचार करण्याजोगी वक्तव्य होती. मला वाटतं की न्यायालयाने दिलेल्या अधिकाराचं आणि सूचनेचं कुठेही उल्लंघन राणा दाम्पत्याने केलेलं नाही. राणा दाम्पत्याला दिलेल्या ऑर्डरमध्ये विशिष्ठ विषयावर मीडियात बोलायचं नाही असा आदेश होता असं मला वाटतं. राजकीय जीवनात काम करत असताना खासदार आणि आमदार म्हणून एखाद्या विषयावर वक्तव्य करण्याचं स्वातंत्र असतं...त्यापासून त्यांना कोणीही थांबवू शकत नाही."
हे सर्व ज्या पद्धतीने केलं जातंय, त्यामध्ये सरकारमधील काही मंत्री, नेते आणि सरकारी वकील एक यंत्रणा बनवून राणा दाम्पत्याला अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतंय. याचा आम्ही निषेध करतो असंही प्रसाद लाड म्हणाले.
राणा दाम्पत्याला अटक करुन सरकारने त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. परंतू कोर्टाने राणा दाम्पत्याला जामीन मंजूर करत त्यांना काही अटी घालून दिल्या होत्या. ज्यात प्रसारमाध्यमांशी न बोलण्याची अट घातली होती. परंतू जामीनावर बाहेर आल्यानंतर राणा दाम्पत्याने पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांना मुलाखती देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह शिवसेनेला टीकेचं लक्ष्य केलं. ज्यानंतर सरकारी वकील प्रदीप घरत यांनी कोर्टात धाव घेत राणा दाम्पत्याचा जामीन रद्द करण्याची मागणी केली आहे. ज्यावर आज झालेल्या सुनावणीदरम्यान कोर्टाने राणा दाम्पत्याला नोटीस बजावत 18 मे ला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
नवनीत राणा यांच्या MRI चाचणीचे फोटो काढल्यावरुन शिवसेना आमदार मनिषा कायंदे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनीही आज लिलावती रुग्णालयात जाऊन प्रशासनाला जाब विचारला. या मुद्द्यावर बोलत असताना प्रसाद लाड यांनी बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे.
"चमचेगिरी किती करावी आणि किती वेळ करावी याला काही मर्यादा असतात. हीच चौकशी कोरोना काळात केली असती तर महाराष्ट्राला ते आवडलं असतं. महापालिकेच्या दवाखान्यात किती भष्ट्राचार झाला हे जाहीर करावे आणि हे थोतांड बंद करावं", अशी टीका लाड यांनी यावेळी केली.