तुझा मुलगा असल्याचा अभिमान! राहुल गांधी यांची सोनिया गांधींसाठीची पोस्ट चर्चेत

जाणून घ्या राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये आई सोनिया गांधी यांच्यासाठी काय म्हटलं आहे?
Rahul Gandhi and Priyanka Gandhi Emotional Post For Mother Sonia gandhi
Rahul Gandhi and Priyanka Gandhi Emotional Post For Mother Sonia gandhi फोटो सौजन्य-राहुल गांधी फेसबुक पेज

काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतली आहेत. त्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोनिया गांधी यांच्यासाठी एक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये तुझा मुलगा असल्याचा अभिमान आहे असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

सोनिया गांधी आता अध्यक्षपदातून मुक्त

मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर तब्बल २३ वर्षांनी काँग्रेसला बिगर गांधी घराण्याचा अध्यक्ष मिळाला आहे. सोनिया गांधी यांच्याकडे २ दशकांहून अधिक काळ अध्यक्षपदाची धुरा होती. आता राहुल गांधी यांनी आई सोनिया गांधींबाबत एक भावनिक पोस्ट केली आहे ज्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.

काय म्हटलं आहे राहुल गांधी यांनी?

राहुल गांधी यांनी आई सोनिया गांधी यांच्या विषयी एक भाविनक पोस्ट केली आहे. यामध्ये राहुल गांधी यांनी आपले आई वडील म्हणजेच राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांचा फोटो पोस्ट केला आहे. पोस्ट मध्ये राहुल गांधी म्हणतात, "आई, आजीने (इंदिरा गांधी) एकदा मला सांगितलं होतं की तिला तुझ्यासारखी मुलगी कधी मिळणार नाही. ती किती योग्य बोलली होती. मला तुझा मुलगा असल्याचा अभिमान वाटतो" असं म्हणत राहुल गांधी यांनी या आशयाची पोस्ट आई सोनिया गांधी यांच्यासाठी केली आहे.

सोनिया गांधींसाठी प्रियंका गांधींनीही केली पोस्ट

सोनिया गांधी यांना काँग्रेस अध्यक्षपदावरुन मुक्त केल्यानंतर त्यांची मुलगी प्रियांका गांधी यांनीही इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट केली आहे. ...जग काहीही म्हणो किंवा विचार करो, मला माहित आहे, तू हे सर्व प्रेमासाठी केलं आहेस. प्रियंका गांधी यांनी देखील सोनिया गांधींचा एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये सोनिया गांधी यांच्या हातात दिवंगत राजीव गांधी यांचा एक फोटो आहे. हा फोटो त्यांनी पक्षाचे नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना भेट दिला आहे.

सोनिया गांधी यांच्याकडे नाट्यमय पद्धतीने अध्यक्षपदाची सूत्रं आली होती. त्यानंतर दोन दशकांहून अधिक काळ सोनिया गांधी काँग्रेस अध्यक्ष होत्या. सुरूवातीला त्यांच्या विदेशी असण्याच्या मुद्द्यावर शरद पवार यांनी आक्षेप घेतला होता तेव्हा त्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली होती. आता सोनिया गांधी या अध्यक्ष नाहीत. कारण काँग्रेसमध्ये अध्यक्षपदासाठी निवडणूक होऊन मल्लिकार्जुन खर्गे यांची निवड अध्यक्षपदी झाली आहे. यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या दोघांनीही आई सोनिया गांधी यांच्यासाठी लिहिलेल्या पोस्ट चर्चेत आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in