Athawale: शिंदे-कवाडेंची युती आठवलेंना आवडली नाही, म्हणाले; मी...

Ramdas Athawale: मी सोबत असताना CM शिंदेंनी जोगेंद्र कवाडेंना सोबत घ्यायची गरज नव्हती. असं म्हणत केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
रामदास आठवले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर नाराज
रामदास आठवले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर नाराज(फाइल फोटो, सौजन्य: Facebook)

Ramdas Athawale unwilling with CM Eknath Shinde: मुंबई: राज्यात सत्ताबदल झाल्यापासून वेगवेगळी राजकीय समीकरणं पाहायला मिळत आहेत. त्यातच आता राज्यातील प्रत्येक महत्त्वाचा राजकीय पक्ष दलित मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातच मुंबई महापालिकेच्या निवडणुका देखील तोंडावर आल्या आहेत. अशावेळी दलित मतदार हे निर्णायक ठरु शकतात. यासाठीच शिवसेना (ठाकरे गट) आणि बाळासाहेबांची शिवसेना (ठाकरे गट) यांनी आपआपल्या पक्षासोबत भीमशक्ती घेण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) तर पीपल्स रिपब्लिकन पक्ष म्हणजेच जोगेंद्र कवाडे (Jogendra Kawade) यांच्याशी युती देखील केली आहे. पण यावरुन रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) मात्र प्रचंड नाराज झाले आहेत. (Ramdas Athawale did not like Shinde-Kawade alliance at all)

उद्धव ठाकरे हे मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन नवी मोट बांधण्याचा विचार करत असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे हे जोगेंद्र कवाडेंच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षासोबत युती करुन मोकळेही झाले. पण त्यामुळे भाजपचा मित्र पक्ष असलेल्या रामदास आठवलेंना फारच राग आला आहे.

रामदास आठवलेंचा रिपाइं हा पक्ष सध्या भाजपसोबत सत्तेत आहे. केंद्रात 2014 पासून रामदास आठवले हे मंत्री आहेत. त्यातच आता शिंदे गटही भाजपसोबत आला आहे. असं असताना जोगेंद्र कवाडेंना शिंदेंनी आपल्यासोबत घेणं हे आठवलेंना रुचलं नाही आणि याबाबत ते म्हणाले की, 'जोगेंद्र कवाडेंना सोबत घेताना एकनाथ शिंदे यांनी माझ्यासोबत चर्चा करायला हवी. त्यांच्यासोबत युती करण्याची गरज नव्हती.' असं म्हणत आठवलेंनी आपली नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, याआधी देखील भाजप-मनसेच्या युतीच्या चर्चांना उधाण येतं त्या-त्या वेळीही रामदास आठवले हे अशाप्रकारच्या युतीला विरोध करताना दिसतात. मुंबईत रिपाइं सोबत असताना भाजपला मनसेची गरजच नाही असं रामदास आठवले वारंवार बोलताना दिसतात. तशाच स्वरुपाची भूमिका आता शिंदे गटाने केलेल्या युतीबाबत आठवलेंनी घेतली आहे.

पाहा रामदास आठवले नेमकं काय म्हणाले:

'जर जोगेंद्र कवाडेजी आमच्या महायुतीमध्ये येत आहेत तर त्यांचं स्वागत आहे. मी निर्णय घेतला त्यावेळेला हे लोकं कोणी आले नाही. पण आता उशिरा का असेना परंतु ते एकनाथ शिंदेच्या मार्फत महायुतीत आलेले आहेत. त्यांचं स्वागतच आहे. पण त्यांची काही तशी आवश्यकतता नव्हती.'

'खरं म्हणजे कुठल्या एखाद्या दलित नेत्याला सोबत घेताना त्यांनी माझ्याशी चर्चा करणं आवश्यक आहे. परंतु असं न होता थेट अशा पद्धतीचे निर्णय होतात ते बरोबर नाही. तरी पण ठीक आहे. आमच्या समाजाचा एक नेता जो आहे हा नेता आमच्यासोबत आलेला आहे. त्याबद्दल त्यांचं स्वागत.'

'मतांवर काही परिणाम तर होणार नाही. मी इथे असताना तशी आवश्यकता तर नव्हती. ज्या-ज्या वेळेला मी काँग्रेससोबत राहिलो आहे त्या-त्या वेळेला काँग्रेसला सत्ता मिळाली आहे. मी शिवसेना-भाजपसोबत आल्यानंतर भाजपला देखील सत्ता मिळाली. यामुळे तशी कोणाची आवश्यकता नव्हती आणि नाही. पण एकनाथ शिंदेंनी असा निर्णय का घेतला ते माहीत नाही. कारण असा राजकीय निर्णय घेताना माझ्याशी अत्यंत आवश्यक होतं. पण असं काही त्यांनी केलं नाही.'

'शिवसेनेत कोणाला घ्यायचं असेल तर तो त्यांचा निर्णय आहे. पण युतीबाबत जर निर्णय असेल तर आपल्याशी चर्चा करणं आवश्यक होतं, देवेंद्रजींशी चर्चा केलेली आहे की नाही मला माहीत नाही. परंतु असा एकतर्फी निर्णय घेणं योग्य नाही असं मला वाटतं.' असं म्हणत रामदास आठवलेंनी आपली स्पष्ट नाराजीच व्यक्त केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in