शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

संभाजी भिडे यांनी ही सदिच्छा भेट असल्याचं म्हटलं आहे, राजकीय वर्तुळात या भेटीची चर्चा सुरू झाली आहे
Sambhaji Bhide of Shiv Pratishthan met Chief Minister Eknath Shinde
Sambhaji Bhide of Shiv Pratishthan met Chief Minister Eknath Shinde

शिवप्रतिष्ठान या संस्थेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे हे त्यांच्या हिंदुत्ववादी धोरणांसाठी तसंच विविध प्रकारच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. अशात आज त्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर ते मुख्यमंत्री झाले. भाजपने त्यांच्या गटाला पाठिंबा दिला आहे. या सगळ्या राजकीय घडामोडींच्या नंतर संभाजी भिडे यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीवरून चर्चा होत आहेत.

संभाजी भिडे यांनी काय म्हटलं आहे?

या भेटीबाबत चर्चा होत असतानाच संभाजी भिडे यांनी मात्र आपण मुख्यमंत्र्यांची घेतलेली भेट ही सदिच्छा भेट आहे असं सांगितलं आहे. तसंच संभाजी भिडे यांनी मंत्रिमंडळाच्या कामकाजाचंही कौतुक केलं आहे. तूर्तास या भेटीमागचं कारण काय हे समजू शकलेलं नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही काही स्पष्ट केलेलं नाही. मात्र ही भेट राजकीय वर्तुळात चर्चेत आली आहे.

कोण आहेत संभाजी भिडे?

संभाजी भिडे हे सांगलीत राहतात. त्यांचं वय ८० आहे. त्यांचं मूळ नाव मनोहर भिडे असं आहे. त्यांना भिडे गुरूजी किंवा संभाजी भिडे म्हणून ओळखलं जातं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्काली प्रमुख कार्यकर्ते बाबाराव भिडे हे त्यांचे काका होते. संभाजी भिडे १९८० च्या दशकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यकरत होते.

भीमा कोरेगाव प्रकरणात नाव आलं होतं समोर

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ही संस्था संभाजी भिडे यांनी स्थापन केली आहे. २०१८ मध्ये जेव्हा भीमा कोरेगाव प्रकरण घडलं त्यावेळी संभाजी भिडे यांचं नाव समोर आलं होतं. तसंच त्यांनी आत्तापर्यंत अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते अनेकदा टीकेचे धनीही ठरले आहेत. मात्र त्यांच्यावर कारवाई झालेली नाही.

२००९ मध्ये संभाजी भिडे यांनी जोधा अकबर या सिनेमालाही विरोध केला होता. त्यावेळी कोल्हापूर, सातारा आणि सांगली भागात बराच हिंसाचार झाला होता. संभाजी भिडे यांचे सरसंघचालक मोहन भागवत, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट संभाजी भिडेंनी घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in