गजानन किर्तीकरांच्या विरोधातील आंदोलनापूर्वी संजय निरुपम पोलिसांच्या ताब्यात

गजानन किर्तीकर यांच्या राजीनाम्याची मागणी करत ते बाईक रॅली काढणार होते.
Sanjay Nirupam - Gajanan Kirtikar
Sanjay Nirupam - Gajanan KirtikarMumbai Tak

मुंबई : काँग्रेस नेते संजय निरुपम यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केलेले ठाकरे गटाचे खासदार गजानन किर्तीकर यांच्या राजीनाम्याची मागणी करत ते बाईक रॅली काढणार होते. मात्र त्यापूर्वीच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी वर्सोवा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. याशिवाय निरुपम यांच्या समर्थनार्थ आलेल्या कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे.

बुधवारी दुपारी दोन वाजता संजय निरुपम आपल्या बाईक रॅलीला सुरुवात करणार होते. मात्र त्यापूर्वीच दुपारी एक वाजता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं असून ३ तासांपासून त्यांना वर्सोवा पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आलं आहे. तसंच जोपर्यंत वातावरण शांत होत नाही तोपर्यंत त्यांना ठाण्यातच ठेवणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

संजय निरुपम गजानन किर्तीकरांविरोधात आक्रमक :

खासदार गजानन किर्तीकर यांनी नुकताच बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटात प्रवेश केला आहे. पण किर्तीकर यांचा हा पक्षप्रवेश म्हणजे उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील मतदारांना दिलेला धोका आहे. त्यामुळे त्यांनी आधी राजीनामा द्यावा, अशी मागणी नुकतीच एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून निरुपम यांनी केली आहे. तसंच जोपर्यंत ते राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नसल्याचाही इशारा त्यांनी दिला आहे.

निरुपम म्हणाले होते की, शिवसेना - भाजप युतीचे उमेदवार म्हणून किर्तीकर यांनी निवडणूक लढवली होती, धनुष्य-बाण चिन्हावर ते निवडून आले होते. आता तुम्ही पक्ष सोडला आहे, त्यामुळे तुम्हाला आता संसद सदस्य म्हणूनही राजीनामा द्यायला हवा. ही गद्दारी आहे. ज्या पक्षाने तुम्हाला सगळं काही दिलं, ज्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, मतदारांनी तुम्हाला जास्तीत जास्त मत देऊन निवडून आणलं त्यांच्याशी केलेला विश्वासघात आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा लागेल, अशी मागणी निरुपम यांनी केली.

सोबतच किर्तीकर राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलनाची सुरुवात करत आहोत. बाईक रॅलीपासून या आंदोलनाची सुरुवात होईल. त्यानंतर वेगवेगळ्या स्वरुपात हे आंदोलन होईल. जर किर्तीकर यांच्यात थोडी तरी नैतिकता शिल्लक असेल, तर त्यांनी हे आंदोलन सुरु करण्यापूर्वी राजीनामा द्यावा आणि पुण्यामध्ये आरामात उर्वरित आयुष्य घालवावं, अशी आक्रमक भूमिका निरुपम यांनी मांडली होती.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in