तुरूंगाची कल्पना नसलेले सावरकरांच्या सुटकेवर बोलतात तेव्हा…, संजय राऊतांनी राहुल गांधींना सुनावलं
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान वीर सावरकरांबद्दल विधान केलं. राहुल गांधींच्या विधानावरून महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून निघालं. भाजप, मनसेनं निषेध नोंदवला. शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भूमिकेपासून अंतर राखलं. आता वादावर खासदार संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून भाष्य करताना राहुल गांधी, भाजपला खडेबोल सुनावलेत. संजय राऊत ‘रोखठोक’मध्ये लिहितात, “वीर सावरकरांवर नाहक टीका करून राहुल […]
ADVERTISEMENT

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान वीर सावरकरांबद्दल विधान केलं. राहुल गांधींच्या विधानावरून महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून निघालं. भाजप, मनसेनं निषेध नोंदवला. शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भूमिकेपासून अंतर राखलं. आता वादावर खासदार संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून भाष्य करताना राहुल गांधी, भाजपला खडेबोल सुनावलेत.
संजय राऊत ‘रोखठोक’मध्ये लिहितात, “वीर सावरकरांवर नाहक टीका करून राहुल गांधी यांनी वादळ ओढवून घेतले. ‘भारत जोडो’ यात्रेचा तो अजेंडा नव्हता. भाजप सावरकरांच्या अपमानाविरुद्ध रस्त्यावर उतरला. सावरकरप्रेमाचे हे ढोंगच म्हणावे लागेल. संघ सावरकरांचा कठोर टीकाकार राहिला, पण आज राजकीय स्वार्थासाठी भाजप सावरकरवादी झाला. सावरकरांनी 10 वर्षे अंदमानच्या काळ्या पाण्यावर नरकयातना भोगल्या. त्या देशासाठीच होत्या याचा विसर पडू नये!”
पुढे संजय राऊतांनी म्हटलंय की, “राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेनं महाराष्ट्राचं वातावरण ढवळून निघालं. त्या यात्रेस वीर सावरकरांवरील नाहक टीकेने गालबोट लागले. अंदमानच्या तुरुंगात सावरकरांनी 10 वर्षांपेक्षा जास्त काळ नरकयातना भोगल्या त्या देशाच्या स्वातंत्र्यासाठीच, हे राहुल गांधी यांना कोणीतरी समजावून सांगायला हवं”, अशा शब्दात संजय राऊतांनी राहुल गांधींना खडेबोल सुनावलेत.
“सावरकरांनी सुटकेसाठी ब्रिटिशांना माफीनामा लिहून दिला हा काही राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा अजेंडा नव्हता आणि महाराष्ट्रात तर हा अजेंडा असताच कामा नये. महाराष्ट्रात येऊन श्री. राहुल गांधी यांनी प्रश्न केला, ‘भाजपवाले बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या अशा प्रश्नांवर का बोलत नाहीत.’ गांधी यांचा प्रश्न योग्य आहे, पण त्यांनी सावरकरांची माफी हा विषय काढला आणि गोंधळ झाला. मात्र दुसऱ्या दिवशी शेगावच्या जाहीर सभेत त्यांनी सावरकरांबद्दल मौन बाळगले, हे एका अर्थाने योग्यच झाले. तरीही त्यांना सांगावेसे वाटते की, तुम्ही वारंवार लोकांच्या श्रद्धांना असे का डिवचता व भाजपला विषयांतर करण्यासाठी हत्यार का देता?”, असा सवाल संजय राऊतांनी राहुल गांधींना केलाय.