विधान परिषद : भाचा की पक्ष? बाळासाहेब थोरांतांची काँग्रेसकडूनच कोंडी!

satyajeet tambe यांच्याविरोधात बाळासाहेब थोरात हे देखील शुभांगी पाटलांच्या प्रचाराला दिसतील, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
Congress rebel leader satyajeet tambe | balasaheb Thorat
Congress rebel leader satyajeet tambe | balasaheb ThoratMumbai Tak

अहमदनगर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची पक्षाकडूनच कोंडी करण्यात आल्याचं दिसून येत आहे. विधान परिषद निवडणुकीत थोरातांचे भाचे सत्यजीत तांबे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यानंतर काँग्रेसने तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. तसंच तांबे यांच्याविरोधात शुभांगी पाटील यांना काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडून अधिकृत पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.

अशातच आता बाळासाहेब थोरातही शुभांगी पाटील यांच्या प्रचारात दिसतील असं विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. महाविकास आघाडीच्या एकत्रित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पटोले यांच्या याच विधानामुळे थोरात यांची कोंडी झाल्याचं बोललं जातं आहे. पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करायचा की मामा-भाच्याच नातं संभाळायचं असा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा असल्याच्या चर्चा आहेत.

काय म्हणाले नाना पटोले?

महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, 'जगातील सगळ्यात मोठा पक्ष असल्याचा गवगवा करणाऱ्या भाजपकडे नाशिक मतदारसंघात स्वत:चा उमेदवार मिळालेला नाही. सध्या पाचही ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकतील असं सगळीकडे वातावरण आहे.'

आजच सत्यजीत तांबे यांच्यावर आजच निलंबनाची कारवाई केली जाईल. सत्यजीत तांबे हे अपक्ष उमेदवार आहेत त्यांनी कोणाचा पाठिंबा मागायचा कोणाचा नाही हे आता त्यांनी ठरवावं. नाशिक विभाग हा काँग्रेस विचाराचा आहे. आतापर्यंत तीन टर्म हे सातत्याने सुधीर तांबे काँग्रेस विचारधारेने निवडून आलेले होते. त्यामुळे तिथे महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल.

बाळासाहेब थोरात हे देखील शुभांगी पाटलांच्या प्रचाराला दिसतील. सध्या ते आजारी असून ते रुग्णालयात आहेत. मी आजही त्यांना सकाळी संपर्क केला. आमचा संपर्क त्यांच्यासोबत आहे. मविआच्या उमेदवाराच्या प्रचाराला त्यांनी सोबत राहावं अशी विनंती त्यांना करणार आहोत आणि ते सोबत राहतील.'

'नाशिकमध्ये भाजपला उमेदवार मिळाला नाही. त्यामुळे आता नेमकी स्पष्टता येणार आहे. ही जी काही मागून वार करण्याची पद्धत भाजपने महाराष्ट्रात आणली आहे दुसऱ्यांची घरं फोडण्याचा प्लॅन भाजप करतं आहे. हे आता स्पष्ट झालं आहे. आता तांबे कुटुंबीयांचं काय झालं ते आम्हाला माहित नाही. त्यांना आम्ही पक्षातून निलंबित केलं आहे, असही ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in