
Sanjay Raut Vs Sanjay Gaikwad: मुंबई: शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटातील (Shinde Group) आमदारांना गद्दार म्हटल्यानंतर शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) हे चवताळून उठले आणि त्यांनी संजय राऊतांना अश्लाघ्य भाषेत आईवरुन शिवीगाळ केली. त्यानंतर संजय राऊत हे गायकवाडांचा खरपूस समाचार घेतील असाच सगळ्यांचा अंदाज होता. मात्र, यावेळी संजय राऊतांनी एक वेगळीच खेळी करुन या संपूर्ण टीकेचा रोखच भाजपच्या (BJP) दिशेने बदलून टाकला आहे. (shinde group mla sanjay gaikwad curse sanjay raut gave a befitting reply)
संजय गायकवाडांनी राऊतांना शिवीगाळ केल्यानंतर एका पत्रकार परिषदेत राऊतांना याबाबत त्यांची जेव्हा प्रतिक्रिया विचारण्यात आली तेव्हा राऊत म्हणाले की, 'संजय गायकवाड वेडा झालाय... त्याने मला शिव्या देण्याऐवजी शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल, मंत्री आणि प्रवक्त्यांना शिव्या द्यावा. तसं केलं तर आम्ही त्यांच्यावर फुलू उधळू.' असं म्हणत राऊतांनी आता या सगळ्या टीका-टिप्पणीचा रोख भाजपच्या दिशेने बदलला आहे.
'जर हे गद्दार आमच्यासारख्या निष्ठावंतांना शिव्या देत असतील तर हा आमच्या निष्ठेचा विजय आहे. दुसरं असं आहे की, त्यांना शिव्या द्यायची एवढी हौस असेल तर महाराष्ट्रामध्ये अशी अनेक प्रकरणं घडतात की, त्यांनी रस्त्यावर येऊन शिव्या दिल्या पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सुरु असताना यांनी किती लोकांना शिव्या दिल्या? द्या ना शिव्या.. शिवरायांचा अपमान सुरु आहे. इतकी संधी तुम्हाला मिळाली आहे. तुम्ही शिव्या द्या राजभवनाच्या बाहेर उभं राहून. देताय का?'
'राष्ट्रीय प्रवक्ते भाजपचे.. द्या शिवी त्यांना.. हिंमत आहे? महाराष्ट्रात कर्नाटकचे मुख्यमंत्री घुसतायेत. रोज आमच्यावर हल्ला करतात. बोम्मईला शिवी देताय? नाही..'
'शिवी कोणाला देताय शिवसैनिकांना.. निष्ठावंतांना.. तर जरुर शिव्या द्या. तुमच्या शिव्या ऐकण्यासाठी महाराष्ट्र सुद्धा तयार आहे. महाराष्ट्राला कळतंय की, काय चाललंय नक्की.. इथे तुम्ही शेपटा घालताय नेभळटासारख्या.. त्यामुळे त्यांच्या शिव्यांचा काही परिणाम होत नाही. हे वेडे झाले आहेत. वेडा माणूस शिव्या घालतो.' असं म्हणत राऊतांनी गायकवाडांना घेरण्याचा प्रयत्न केला.
दोन दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, 'बघा यांच्या कपाळावर गद्दारीचा शिक्का बसला आहे. जसं दिवार सिनेमात अमिताभच्या हातावर होतं नाही का.. मेरा बाप चोर है... तसं यांचे नातेवाईक, यांची पोरं, यांच्या बायका.. उद्या लोकं म्हणतील हे सगळे गद्दार आहेत. यांच्यावर गद्दारीचा शिक्का बसलाय. यांच्या पिढ्यांना ही गद्दारी शांतपणे जगू देणार नाही.' राऊतांची हीच टीका शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना प्रचंड झोंबली.
दरम्यान, राऊतांच्या या टीकेला उत्तर देताना संजय गायकवाड यांची जीभ घसरली आणि त्यांनी राऊतांना चक्क आईवरुन शिवीगाळ केली. 'आमच्यावर गद्दारीचा आरोप नाही लागणार तर आमच्यावर उठावाची क्रांती केल्याचा अभिमान आमच्या पुढच्या पिढीला असणार आहे. त्यामुळे माxxxx संजय राऊत तू याच्या नंतर अशी भाषा वापरु नको. आम्ही पडायचं की लढायचं.. जनतेला आमचा निर्णय मान्य आहे.'
'तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जी हातमिळवणी केली ती जनतेला मान्य नाही. आम्हाला शिवसेना-भाजप म्हणून निवडून दिलं होतं. यामुळे अमिताभच्या पिक्चरचा डायलॉग मारुन.. तो पिक्चर पुरता ठीक आहे. प्रॅक्टिकल जीवनात आम्ही दाखवू आमच्या महाराष्ट्रात किती जागा येतात आणि तू तुझ्या पक्षाला किती भुईसपाट केला.' असं संजय गायकवाड यावेळी म्हणाले.