उद्धव ठाकरे अजून किती गद्दारी करणार? AIMIM चा उल्लेख करत भाजपचा सवाल
शिवसेना फुटली. 40 आमदार आणि 13 खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंसोबत गेले. त्यामुळे ठाकरेंना महाराष्ट्रभर मोठा धक्का बसला. शिंदे गट आणि भाजपशी लढा देण्यासाठी आधीच महाविकास आघाडीत असलेल्या उद्धव ठाकरेंनी वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचे संकेत दिलेत. तशी चर्चाही सुरू असून, भाजपनं यावरून उद्धव ठाकरेंना सवाल केलाय.
प्रबोधनकार डॉट कॉम कार्यक्रमावेळी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकाच व्यासपीठावर आले. या कार्यक्रमात दोघांनीही एकत्र येण्याचे संकेत दिले. प्रकाश आंबेडकरांनी याच कार्यक्रमानंतर आगामी निवडणुकीत एकत्र येऊ, असंही म्हटलं. त्यामुळे संभाजी ब्रिगेडनंतर प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडीही उद्धव ठाकरेंसोबत येणार असल्याची शक्यता राज्याच्या राजकारणात सुरूये.
प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आगामी निवडणुका एकत्र लढताना दिसली, असं म्हटलं जात आहे. त्याचे संकेतही दोन्ही बाजूंनी दिले जात आहे. या आघाडीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधून प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यात भाजपनंही भूमिका मांडताना ठाकरेंना सवाल केलाय.
उद्धव ठाकरेंकडून बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना तिलांजली -भाजप
महाराष्ट्र भाजपच्या ट्विटर हॅण्डलवरून एक ट्विट करण्यात आलंय. या ट्विटमध्ये प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरेंचा फोटो पोस्ट करण्यात आलाय. ट्विटमध्ये म्हटलंय की, 'हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना तिलांजली देऊन भाजपाला विरोध करणाऱ्या कोणत्याही पक्षासोबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आघाडी करण्यास तयार! ही लाचारी नाही तर दुसरे काय?", असा सवाल भाजपनं केलाय.
'उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना दगा देणार', भाजपचा आरोप काय?
भाजपकडून ट्विट करण्यात आलेल्या कार्डवर म्हटलं आहे की, 'वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र येणार? व्होट बँकसाठी प्रकाश आंबेडकर-उद्धव ठाकरेंच्या युतीची चर्चा. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना दगा देऊन AIMIM पक्षासोबत युती केलेल्या प्रकाश आंबेडकरांचा हात धरणार? सत्तेसाठी हपापलेले उद्धव ठाकरे अजून किती गद्दारी करणार?', असा प्रश्न भाजपने उद्धव ठाकरेंना केलाय.