शिंदे-ठाकरे 'शिवसेने'साठी आता अधिवेशनात भिडणार! पूर्वसंध्येलाच पडली पहिली ठिणगी

सुप्रीम कोर्ट, आयोगानंतर शिंदे-ठाकरे गट अधिवेशनात येणार आमने-सामने
Eknath shinde-uddhav thackeray
Eknath shinde-uddhav thackerayMumbai Tak

नागपूर : सोमवार (दि. १९ डिसेंबर) पासून नागपूरमध्ये राज्याच्या हिवाळी अधिवेशनाची सुरुवात होणार आहे. राज्याबाहेर गेलेले प्रकल्प, शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत, महाराष्ट्र-कर्नाटकमधील सीमावाद, महापुरुषांच्या अपमानाचा आरोप अशा विविध मुद्द्यांवरुन सत्ताधारी-विरोधक आमने सामने येण्याची शक्यता आहे. याच मुद्द्यांवरुन आज विरोधकांनी चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.

सत्ताधारी-विरोधकांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि बाळासाहेबांची शिवसेना हे दोन्ही पक्षही या अधिवेशनात आमनेसामने येणार हे जवळपास निश्चित आहे. याचीच पहिली ठिणगी आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पडली.

राज्यातील अभूतपूर्व सत्तासंघर्ष आणि शिवसेना फुटीनंतर नागपूरमध्ये विधिमंडळ अधिवेशन होतं आहे. शिवसेना कोणाची हा वाद अद्याप सर्वोच्च न्यायालयात असल्याने या अधिवेशनामध्ये शिवसेनेचे विधिमंडळ पक्ष कार्यालय नेमकं कोणत्या गटाचां हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शिवसेनेच्या परंपरागत पक्ष कार्यालयाचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कर्मचाऱ्यांनी ताबा घेतला आहे. मात्र कार्यालयाच्या बाहेरील फलकावर शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह झाकून ठेवण्यात आलं आहे.

तर दुसरीकडे विधिमंडळाच्या रेकॉर्डनुसार शिवसेना पक्षाचे गटनेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचा या विधिमंडळ कार्यालयावर तांत्रिकदृष्ट्या अधिकार सांगण्यात येत आहे. त्यानुसार शिंदे गटाकडून फलकही तयार करुन घेण्यात येत आहेत. यात 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गटनेता शिवसेना पक्ष' असा उल्लेख दिसून येत आहे. त्यासोबत प्रताप सरनाईक, अनिल बाबर, संजय शिरसाट, संजय रायमुलकर या आमदारांचे प्रतोद पदाचे फलक तयार करुन घेण्याचं काम सुरु आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शिवसेना नेमकी कोणाची या वादाची पहिली ठिणगी पडली आहे. या वादात आता हे पक्ष कार्यालय नेमकं कोणाला मिळतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मुंबईतील कार्यालय कोणाकडे?

दुसरीकडे मुंबईतील शिवसेनेच्या विधिमंडळ कार्यालयावरुनही सुरुवातीला दोन्ही गटांमध्ये वाद झाला होता. त्यामुळे कार्यालय सील करण्यात आलं होतं. पण नंतर वाद टाळण्यासाठी शिंदे गटाकडून दावा केला गेला नाही. त्यामुळे सध्या ते कार्यालय ठाकरे गटाकडेच आहे.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in