NCP: अजितदादांचं बंड, पवारांसोबत सावली सारखे राहणाऱ्या रोहित पवारांची स्फोटक मुलाखत जशीच्या तशी!

मुंबई तक

ADVERTISEMENT

ajit pawar rebellion ncp mla rohit pawar secret revelations exclusive interview mumbai tak
ajit pawar rebellion ncp mla rohit pawar secret revelations exclusive interview mumbai tak
social share
google news

अभिजीत करंडे, मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) अजित पवारांनी (Ajit Pawar) बंड केल्याने पक्षासोबतचं त्यांचं पवार कुटुंब देखील फुटलं. अशा अडचणीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे आपले आजोबा शरद पवारांसोबत (Sharad Pawar) सावलीसारखे वावरताना दिसत आहेत. त्याच रोहित पवारांशी मुंबई Tak ने Exclusive बातचीत केली. ज्यामध्ये त्यांनी अतिशय संयमाने पण तितक्याच निर्धाराने अजित पवारांन खडे बोल सुनावले आहेत. वाचा रोहित पवारांची स्फोटक मुलाखत जशीच्या तशी (ajit pawar rebellion ncp mla rohit pawar secret revelations exclusive interview mumbai tak sharad pawar supriya sule bjp)

प्रश्न: तुम्हाला कधी कळलं की, अशा पद्धतीचं काही तरी घडतंय?

रोहित पवार: एक कसं आहे की, उद्धव ठाकरेंची जी पार्टी होती ती जेव्हा फुटली तेव्हा एक अंदाज होता की, तसाच भाजपकडून प्रयत्न हा राष्ट्रवादीकडून होऊ शकतो. राष्ट्रवादीला कुठे तरी अडचणीत आणून येणाऱ्या ज्या काही लोकसभा-विधानसभा निवडणुका आहेत त्या एकहाती सत्ता महाराष्ट्रात भाजपला घ्यायची आहे. असा काही प्रमाणात अंदाज लोकांशी बोलून असे ना का थोडं फार जे काही राजकारण आम्हाला कळतं त्यावरुन वाटत होतं. फक्त मनात एक गोष्ट ठामपणे वाटत होती की, आमचे जे काही नेते आहेत ते प्रतिसाद देणार नाहीत. अनेक अडचणी असू शकतात त्यांच्या तरी सुद्धा जो विचार 30-35 वर्ष.. हे सर्व नेते जे पलीकडे गेले आहेत जपत आहेत आणि पवार साहेब 55 वर्ष तो विचार जपत आहेत.

त्या विचारावर हे सगळे राहतील असं वाटत होतं. पण जेव्हा शपथविधी होत होता टीव्हीवर बघितला पुण्यात. पवार साहेबांसोबत बघितला. तेव्हा पहिली बाजू खरी घडली पण दुसरी बाजू वाटत होती ती सुद्धा घडली हे बघून थोडसं वाईट वाटलं.

 

प्रश्न: तुम्हाला थेट शपथविधी पाहून कळलं की, तुम्हाला आधी निरोप आले होते?

रोहित पवार: कसं असतं तिथे गेल्यावर अनेक आमदार होते. त्यांना सांगण्यात आलं होतं की, प्रदेश अध्यक्षाच्या बाबतची बैठक जी सहा तारखेला बोलावली होती. त्या बैठकीच्या आधी साहेबांचं असं मत आहे की, आमदारांचं मतही जाणून घ्या.. म्हणून आपण बैठक घेत आहोत. दिशाभूल म्हणा किंवा काही.. तिथे आमदार गेले.. आणि ज्या पद्धतीने सह्या घेतल्या. वरचा भाग वाचून दिला नाही. फक्त सह्या करा एवढंच सांगितलं. काही लोकांना अंदाज आला.. आम्हाला फोन आले, साहेबांना फोन आले.

सह्या करायला कदाचित 40 आमदार असतील. पण शपथविधीला 40 आमदार नव्हते. मधूनच काही आमदार निघून आले. मग हे जेव्हा फोन यायला लागले तेव्हा अंदाज आला की, काही तरी होणार आहे आणि टीव्हीवर आम्ही बघतच होतो.

पण हे सगळं होत असताना पवार साहेबांचा अनुभव आणि इतके चढउतार त्यांनी आयुष्यात पाहिले आहेत आणि सामान्य लोकांवर त्यांचा एवढा विश्वास आहे. त्यांच्या चेहऱ्यावर कुठेही टेन्शन दिसत नव्हतं. अतिशय शांत होते, शेवट एवढंच म्हणाले की, आता लोकांमध्ये जायचं आणि लढायचं.

प्रश्न: टीव्हीवर शपथविधी सुरू असताना पवार साहेबांना धक्का वैगरे असा काहीच बसला नाही?

रोहित पवार: मी जेवढं त्यांना ओळखतो त्यांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर फार मोठा विश्वास आहे. त्यानंतर लोकांवर खूप विश्वास आहे. मला असं कुठेतरी वाटतं की, त्यांना जर कोणी चॅलेंज केलं तर साहेब शांत बसत नाही. तुम्ही जर पाहिलं तर 2019 च्या आधी एका भाजपच्या मोठ्या नेत्याने असं म्हटलं होतं की, पवार साहेबांचं राजकारण संपलं.. म्हणजे कुठे तरी पवार साहेबांना चॅलेंज केलं. आता परत एकदा अप्रत्यक्षपणे भाजप पवार साहेबांना टार्गेट केलं, चॅलेंज केलं कुटुंब फोडून आणि पक्ष फोडून. त्यामुळे बघा आता पुढे जाऊन होतंय काय.

एक सांगतो, महाराष्ट्रात जेव्हा एका व्यक्तीवर अन्याय होतो, कुटुंब फुटतं फक्त सत्तेत येण्यासाठी जर ते फोडलं जात असेल तर ही संतांची भूमी इथली लोकं म्हणजे आपण, मराठी जनता कधीही सहन करणार नाही.

प्रश्न: राष्ट्रवादी का फुटली.. काय अडचण होती अशी की हा निर्णय घ्यावा लागला

रोहित पवार: मला वाटतं की, हाच प्रश्न सामान्य लोकांना विचारला पाहिजे की, तुम्हाला काय वाटतं. ते जे उत्तर देतील ते खरं उत्तर असू शकतं.

प्रश्न: अनेक जण म्हणतात की, ईडी आणि सीबीआयच्या दबावामुळे हे झालं.

रोहित पवार: आता याची दुसरी बाजू पाहूया.. प्रफुल पटेल साहेबांचं मत वळसे-पाटील साहेबांचं, भुजबळ साहेबांचं मत, असं आहे की, त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे अन्याय झाला. आता तुम्ही जर या सगळ्यांची आकेडवारी काढली.. की, किती वेळा मंत्रिपद भूषवलं. प्रफुल पटेलांच्या बाबतीत तर म्हणजे लोकांमध्ये न जाता अनेक वेळा ते खासदार झाले. म्हणजे त्यांचं विमान जे टेक ऑफ झालंय.. ते कधीही उतरलं नाही. तर त्या व्यक्तीला. लोकांच्या मताची किंमत लोकनेत्याची किंमत आणि वडिलांची किंमत कधी कळणार? वळसे-पाटलांचं काय झालं?

अन्याय तर काही झाला नाही.. भाषण करायला ते काही बोलतील. चार महिन्यापूर्वी भाजपविरोधात बोलत होते आणि आज अचानक भाजपच्या बाजूने बोलायला लागले. महाराष्ट्रातील वातावरण आज हे भाजप आणि शिंदे गटाच्या विरोधात आहे. अजून 9 महिने फक्त प्रयत्न आणि कष्ट करायचे होते. त्यानंतर पुढचे पाच वर्ष राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री राहू शकला असता.

साहजिकच आहे.. मी सुद्धा सही केली होती की, विरोधी पक्ष नेता कोणाला बनवायचं तर अजितदादांना.. आपल्या सर्वांना माहीत आहे की, आजचा विरोधी पक्ष नेता हा उद्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो. अशा परिस्थितीत 9 महिन्यांसाठी 30-35 वर्षांचा विचार जो जपला तो सोडून तुम्ही भाजपसोबत गेलात. तुम्हाला माहीत असताना की, उद्या पाच वर्ष मुख्यमंत्री पद तुमच्याकडे येऊ शकतं. असं असतानाही का गेलात? काही व्यक्तिगत कारणं असू शकतात.

हे ही वाचा >> NCP पक्ष मिळविण्यासाठी अजित पवारांची नवी चाल, पडद्यामागे छगन भुजबळांची खेळी!

 

प्रश्न: म्हणजे ते दबाव झेलू शकले नाहीत?

रोहित पवार: कसं असतं की, विचार जपणं हे सगळ्यात अवघड आहे. शॉर्टकट घेणं आजचा विचार करणं हे फार सोपं आहे. पण संघर्ष करणं हे फार सोपं नाही.. एका मोठ्या पक्षाच्या विरोधात ज्यांच्याकडे आर्थिक ताकद आहे, ज्यांच्या ईडी-सीबीआय आहेत. त्यांच्याविरोधात तसं लढणं सोपं नसतं. पण लढलं तरच लोकं तुम्हाला विश्वासात घेणार आहेत. त्यामुळे या सगळ्यातून पवार साहेबांचं मत आहे की, 60 वर्ष मी हा विचार जपला. त्या विचारासोबत मी राहिलं पाहिजे. कारण की, शेवटी विचार जपत असतानाच लोकांनी मला मतदान केलं आहे. कुठेही घड्याळ हे चिन्ह असलं तरीही नेता कोण पवार साहेब… पवार साहेबांकडे बघून लोकांनी मतदान केलं आहे. कुठल्याही नेत्याचं भाषण पाहिलं तर 40 टक्के.. 50 टक्के हे पवार साहेबांचं नाव घ्यावंच लागत होतं.

त्यामुळे मतदान आपण पवार साहेबांच्या नावावर मागितली.. या सगळ्या गोष्टी सोडून तुम्ही तात्पुरत्या स्वरुपात तिकडे जात असाल तर कुठला तरी दबाव असल्याशिवाय जाणार नाही. असं सगळ्यांचंच मत हळूहळू होत आहे.

प्रश्न: तुम्हालाही ईडीची नोटीस होती मधल्या काळात… तुम्हाला भीती नाही वाटली?

रोहित पवार: मी व्यावसायिक क्षेत्रात वयाच्या 21 व्या वर्षापासून काम करतोय. मी राजकारणात येण्याचा विचार केला तो माझा विचार होता. माझ्या इच्छेनुसार होता. त्यामुळे काही तात्पुरत्या गोष्टी लक्षात घेऊन तर मी राजकारणात आलेलो नाही. टीकायचंय, राहायचंय.. लोकांची सेवा करायचीय. अशा परिस्थितीत मी सुरुवातीलाच विचार सोडले, सुरुवातीलाच माझ्या नेत्याला सोडलं.. माझ्या हितासाठी आजोबाला सोडलं.. तर हे माझ्या मनालाच आधी पटणार नाही. माझ्या मतदारांना, महाराष्ट्रातील लोकांना हे कसं पटणार?

त्यामुळे तात्पुरता फायदा घेण्यासाठी जो विचार आपण मनात ठेवून राजकारणात आलो तो विचार जपण्यासाठी संघर्ष असला तरीही संघर्ष स्वीकारावा लागणार हे माझ्या मनात होतं. जर मी घाबरून दुसरीकडे गेलो असतो तर मी मला युवा कसं म्हणणार?

प्रश्न: बारामतीमध्येच.. पवारांच्या घरातच फूट पडली… घर फुटलं याची वेदना झाली?

रोहित पवार: मी माणूस आहे.. वेदना होणारच, भारतात आणि महाराष्ट्रात आपल्याला कुटुंब फार महत्त्वाचं असतं. भारतीय संस्कृती बघितली तर आपल्या कुटुंबाच्या अवतीभवती फिरत असते. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. की, कराडला जात असताना मी पवार साहेबांसोबत होतो. मधे बऱ्याच ठिकाणी लोकांना मध्ये थांबवलं.. आम्ही तुमच्यासोबत आहोत हे सांगत होते. तिथे एक महिला आली. 50-52 वर्षांची महिला असेल.

ठीक आहे.. तिथे त्या गोंधळात साहेबांनी ते ऐकलं नाही ऐकलं ते माहीत नाही. पण मी ते नक्कीच ऐकलं.. तिथे असणाऱ्या त्या महिलेने साहेबांना सांगितलं की, साहेब राजकारणाचं आणि माझा दूरदरपर्यंत काही संबंध नाही.. पण तुमच्याकडे जेव्हा आम्ही बघतो तेव्हा मला माझं कुटुंब दिसतं. माझ्या कुटुंबात जर कोणी वाद लावण्याचा प्रयत्न करत असेल बाहेरुन येऊन त्यांच्या स्वार्थासाठी.. तर मी खपवून घेणार नाही. असं ती महिला पवार साहेबांना सांगत होती. ही भावना अख्ख्या महाराष्ट्रात आहे.

मी तर कुटुंबाचाच एक भाग आहे. तर कुठे ना कुठे मलाही ते वाईट वाटलेलं आहे. दादा एक मोठे नेते आहेत. व्यक्तिगत जीवनात आणि राजकीय जीवनात दादांनी मला खूप मदत केली आहे. मी ते कधीही विसरणार नाही. कुटुंब हे कुटुंबाच्या जागी.. राजकारण, समाजकारण आणि विचार हे मोठ्या लेव्हलवर. तिथे तडजोड करून मला असं वाटतं की, योग्य नाही.

शेवटी आपण जी भूमिका घेत असतो.. आपल्यावर अवलंबून असणारे कार्यकर्ते ते सुद्धा त्या भूमिकेला जोडून असतात. अचानक भूमिका बदलली तर व्यक्तिगत आपला फायदा होऊ शकतो. पण जे आपल्यावर किंवा पक्षावर अवलंबून असणारे सर्व आमदार, कार्यकर्ते, पदाधिकारी यांची फार मोठी अडचण होते.

पवार साहेबांची भूमिका हीच होती की, समजा घटकाभर धरा की.. आपण आपला विचार सोडून दुसरीकडे गेलो असतो. त्यामध्ये कदाचित आपल्या लोकांचा फायदाही होईल. पण कार्यकर्त्यांच्या आमदारांच्या आणि पदाधिकाऱ्यांचा भविष्याबद्दल आपण जे खेळत आहोत त्याला जबाबादार कोण?

या हेतूतून पवार साहेबांची ती भूमिका होती आणि इतरांची थोडी वेगळी भूमिका होती. जी आता स्पष्ट होताना दिसते आहे.

प्रश्न: शपथविधीनंतर तुमचं दादांशी काही बोलणं झालं?

रोहित पवार: नाही.. तसं काही बोलणं झालं नाही.. पण ते काय बोलतील याचा अंदाज त्यांनाही आहे आणि मलाही आहे. त्यांनाही माहिती आहे की, माझा स्वभाव, माझी स्टाइल फार पारदर्शक ठेवली आहे. त्यामुळे कदाचित माझ्याकडे बघत असताना माझ्या भूमिकेबद्दल कोणालाही कुठेही संशय नसतो. जसं लोकांना संशय नाही.. तसं काकांनी मला ओळखलंय. म्हणून या सगळ्या गोष्टी होत असताना त्यांनी मला संपर्कही केला नाही. यापुढे समजा पुतण्या म्हणून व्यक्तिगत जीवनात कुठली अडचण असेल तर त्याला ते मदत करतील पण राजकीय दृष्टीकोनातून आम्ही सगळे जण पवार साहेबांसोबत आहोत.

प्रश्न: कालच्या भाषणात पवार साहेबांवर टीकाही झाली. त्यांच्या वयावरुन देखील बोललं गेलं.

रोहित पवार: 2019 ला जेव्हा विधानसभेची निवडणूक होण्याआधी भाजपच्या एका नेत्याने असं सांगितलं की, पवार साहेबांची राजकारणाची पद्धत जुनी झाली. अनेक लोकांनी सांगितलं की, पवार साहेब वयस्कर झाले आहेत. फिरता येणार नाही, कुठे जाता येणार नाही… पण 2019 ला निवडणुकीच्या काळात सोलापूरपासून साहेबांना प्रचाराला सुरुवात केली.

सोलापूर करत ते साताऱ्याला लोकसभेचं त्या वेळेस पोटनिवडणूक होती आणि तिथे ते त्यांचं पावसातलं भाषण तो व्हीडिओ व्हायरल झाला.

सगळ्या मीडिया आणि अभ्यासक जे होते त्यांचं मत होतं की, राष्ट्रवादीला 15 आणि काँग्रेसला 15 जागा मिळतील. भाजपला एक हाती सत्ता मिळेल. काय झालं.. 15 वरुन आम्ही 55 वर गेलो. काँग्रेसही 15 वरुन 45 वर गेलं. आता त्यावेळेसच पण त्यांचं वय जास्तच होतं ना.. वयाकडे काय बघता डोकं तेच आहे.. अनुभव उलट आता तर चार वर्षांनी वाढला आहे. या चार वर्षात इतक्या घडामोडी झाल्या आहेत की, त्या अनुभवामुळे आता ते कसे वागतील. कसे रणनिती आखतील याचा अंदाज कोणालाही नाही.

पूर्वी एक पुस्तक लिहलं होतं. ते पुस्तक कदाचित पु. ल. देशपांडे यांनी अनुवादीत केलं आहे. एक कोळी असतो. वयस्कर असतो सगळे लोकं त्याच्या विरोधात.. तो म्हातारा आहे, काय करु शकत नाही. पण एकदा तो बोट घेऊन समुद्रात जातो आणि एक शार्क मासा आहे त्यासोबतची ती लढाई दाखवून दिली आहे. त्या व्यक्तीला दाखवायचं असतं की, जे जग बोलतं ना तसं नाहीए. मी फार वेगळा आहे.

जेव्हा ती वृत्ती एखाद्या व्यक्तीच्या मनात येते ना.. तुम्ही केलेलं चुकलं आहे आणि तुम्ही केलं आहे त्याचं उत्तर आम्ही वेगळ्या पद्धतीने देऊ शकतो.. तेव्हा ती ताकद वयाच्या आणि सगळ्यापेक्षा मोठी असते.

आता लोकं साहेबांहबरोबर आहेत. आता साहेब शांत बसणार नाही..

प्रश्न: अजितदादांनी आणखी एक वक्तव्य केलं की, आम्ही कोणाच्या पोटी जन्माला आलो नाही.. हा काय गुन्हा झाला का? सुप्रिया ताईंकडे पक्ष सोपावल्याने ते दुखावले गेले होते का?

रोहित पवार: खरं तर कधी संधी मिळाली तर प्रतिभा आजींना हा प्रश्न कोणी तरी विचारला पाहिजे.. असं मला वाटतं.. दादा असे म्हणाले तुम्हाला काय वाटतं.. राहिला प्रश्न कुठे जन्मायचा.. माझे आई-वडील राजकारणात नाही. माझे आजोबा राजकारणात नाहीत. मी काय करायचं. कसं असतं… दादांमध्ये खूप मोठी क्षमता आहे पण विचार बदलल्यामुळे येत्या काळात भीती एवढीच वाटते की, पुतण्या म्हणून.. भाजपला कधीही लोकनेते चालत नाहीत. एकनाथ शिंदे साहेबांचं वर्षातच काही तरी गेम होईल असं वाटायला लागलं आहे.

भाजपला त्यांच्याही पार्टीतील लोकनेते आवडत नाही आणि बाहेरच्या पार्टीतील लोकनेते आवडत नाहीत. कुठे ना कुठे ताकद कमी करण्याचा प्रयत्न भाजपकडून होतोच. त्यामध्ये कुठे तरी वाटतं मधल्या पीढीतील एक लोकनेता घडत होता तो भाजपमुळे कुठे तरी संपेल की काय?

राहिला प्रश्न सुप्रिया ताईंबाबतचा.. तुम्ही जर बघितली आणि कालही त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं ते खरं की खोटं ते पवार साहेबच बोलतील. पण अजितदादांचं भाषण ऐकलं की, ते म्हणत होते. आम्ही गेली तीन वर्ष भाजपशी बोलतोय, चार वर्ष भाजपशी बोलतोय. म्हणजे बोलणं हे चार वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे भाजपसोबत जाणं हे अनेक वर्ष या लोकांच्या मनात होतं. सुप्रिया ताईंना तर आता कार्याध्यक्ष बनविण्यात आलं आहे. त्यामुळे ताई हे कारण होऊ शकत नाही.

कदाचित साहेबांचं मत आहे की, कार्यकर्ते एक विचार जो 60 वर्ष जपला आहे त्याच्या बरोबर राहणं हे महत्त्वाचं आहे. काय खरं, काय खोटं आपल्याला माहिती नाही. पण तुम्ही एक बघा ना.. पवार साहेबांची राजकीय ताकद.. 4 वर्ष काय म्हणतं भाजप राष्ट्रवादीला साडेतीन जिल्ह्याचा पक्ष.

चार वर्ष भाजपच्या केंद्रीय नेत्यांना, राज्यातील नेत्याला पवार साहेबांनी खेळत ठेवणं असाही अर्थ होतो. त्यामुळे कसं आहे कोण काय बोलतं त्याचे कार अर्थ निघतात हे लोकं पाहत असतात. लोकांनी काल झालेल्या गोष्टीचा अर्थ अतिशय पर्सनली घेतलेला आहे. लोकांना हे आवडलेलं नाही. लोकंच याबाबतीतील उत्तर लोकशाहीच्या माध्यमातून देतील.

प्रश्न: अजितदादा म्हणाले की, शरद पवारांनी अनेकदा भूमिका बदलल्या, भाजपशी तीनदा चर्चा केली आणि मला तोंडावर पाडलं.

रोहित पवार: त्या पातळीवर काय चर्चा होते मला माहीत नाही. ते त्या-त्या पातळीवरच्या नेत्यांनाच माहिती. राहिला प्रश्न काँग्रेससोबत जाण्याचा एका मुद्दावर वाद असू शकतो. पण विचारावर वाद नव्हता. पुलोदच्या बाबतीत आपण पाहिलं तर कुटुंब फोडलं नव्हतं. आमचं एकच मत आहे भाजपने पक्ष फोडला, कुटुंब फोडलं.. बाळासाहेब ठाकरेंनी जो पक्ष सुरू केला होता मराठी अस्मितेसाठी तो पक्ष भाजपने संपवला. महाराष्ट्रातील दुसरा मोठा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांनाही संपवलं आणि भाजप काय समाजकारण करण्यासाठी या गोष्टी करतेय असं नाही.

त्यांना कुठे तरी चिन्ह गोठवायचं आहे. त्यात धनुष्यबाण, घड्याळ ही चिन्ह गोठवायची आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीत त्यांना असं वाटतं की, या गोष्टींमुळे गोंधळ वाढवून कमळ म्हणजे भाजप एक हाती सत्ता महाराष्ट्रात आणेल. हे चुकतंय.. त्यांनी कदाचित महाराष्ट्रातील जनतेला ओळखलेलं नाही. अनेक मोठ्या भाजपच्या नेत्यांचं मत आहे की, महाराष्ट्राच्या राजकारणात काही लोकांनी मिळून अतिशय चिखल केला आहे राजकारणाचा.

राज ठाकरेंच्या अनेक भूमिका या भाजपला सुसंगत असतात. पण तुम्ही त्यांचं पहिलं ट्वीटमधील शेवटचा भाग जर बघितला तर चिखल झालाय.. आता कोणी केला? भाजपनेच फोडला ना सगळा.. मग अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंच्या मनात देखील राग आहे. पण ते कधी असे व्यक्त होतात कधी तसे व्यक्त होतात.

हे ही वाचा >> ‘आव्हाडांसह 2-3 जण प्रफुल्ल पटेलांवर तुटून पडले’,छगन भुजबळांनी सांगितली इनसाईड स्टोरी

 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

प्रश्न: पहिल्याच भाषणात शरद पवारांवर वैयक्तिक हल्ले चढविण्यात आले. हे अपेक्षित होतं?

रोहित पवार:  नव्हतं ना.. शिंदे गट फुटला तेव्हा त्यांना भाजपकडून स्क्रिप्ट लिहून दिली होती. सुरुवात तुम्ही असं करा की, राऊतांच्या विरोधात बोला.. मग आदित्य ठाकरेंपर्यंत पोहचा. मग उद्धव ठाकरेंना तुम्ही धरा.. हे करत असताना टप्प्याटप्प्याने करा.. पाच महिने जाऊ द्या.. सहा महिने जाऊ द्या.

आता इथे जर आपण पाहिलं तर त्याच गोष्टी होत आहेत. पण त्याचा वेग एवढा वाढला आहे.. चार दिवसात हे लगेच साहेबांपर्यंत पोहचले. आता तुम्ही साहेबांपर्यंत पोहचलेला आहात, तुम्ही बोलाल.. पण त्याचा अर्थ आम्ही सगळे शांत बसणार असा नाही ना.. तुम्ही पुस्तक लिहलं.. म्हणजे प्रफुल पटेल साहेबांचं.. पवार साहेब वगळता काय कर्तृत्व आहे? काय केलं.. वळसे-पाटील साहेब काय होते? त्यांना कोणी ताकद दिली?

आज तुम्ही म्हणताय की, पवार साहेबांचं कर्तृत्व काय.. अरे पवार साहेबांमुळेच तुम्ही निवडून येत होता ना.. पवार साहेबांमुळेच तुम्ही मंत्री झालात. कदाचित तुम्हाला मंत्रिपद देत असताना काही जणांना नाराज करावं लागलं. मंत्रिपदं वळसे-पाटलांसारख्या व्यक्तीने कशी मिळवली हे पवार साहेबांना एकदा विचारा.. सगळ्यांचीच कुंडली सगळ्यांनी काढली तर यात भाजपचा फायदा होईल. आज भाजप सगळ्यात मोठी राजकारण बिघडणवणारी पार्टी आहे. पण जे गेले त्यांच्यामुळे फार फरक पडेल असं काही वाटत नाही.

प्रश्न: शरद पवारांना अध्यक्ष पदावरुन बाजूला केलं आहे आणि अजित पवार स्वत: अध्यक्ष झाले आहेत. त्यांनी चिन्ह आणि पक्षावरही दावा केलाय, त्यांच्याशी कसे लढणार आहात तुम्ही?

रोहित पवार: त्यांचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत तटकरे.. ह्यांनी कदाचित कुठलं तरी अॅफिडेव्हिड लिहलं असावं की, अध्यक्ष बदलावेत.. मला एक हे कळत नाही. की, तुम्ही तीन-चार दिवसांपूर्वी केलं. त्यात तुमची एक पत्रकार परिषद झाली. तिथे तुम्ही म्हणता की, साहेब आमचे अध्यक्ष आहेत. काल तुमच्या स्टेजवर सगळीकडे पवार साहेबांचे फोटो.. फोटो दाखवताय ते खरं.. पण भाषण करताय वेगळं. तीन-चार दिवसांपूर्वी आधीच साहेबांना बाहेर काढण्यासाठी कागदपत्रं द्यावे लागतात ते तुम्ही केलं. मग हे नाटक चाललंय का? की, लोकं आपल्या विरोधात जातील म्हणून कुठे तरी तात्पुरता साहेबांचा फोटो वापरायचा आणि हळूहळू कमी करायचा.. लोकं एवढी तर खुळी नाहीत ना.. त्यांना माहिती आहे ना तुम्ही काय करताय.

तुम्ही बघा आता लोकं येत्या काळात… सोशल मीडिया बघा आता महिन्यापूर्वी साहेबांबाबत काही तरी कमेटं करत असतील. ती लोकं सुद्धा साहेबांच्या बाजूने लिहायला लागली आहेत. मराठी माणसांना असं वागणं आवडत नाही. ठीक आहे सत्ता आहे.. एवढी ताकद उभी राहिल्यावर असं वाटतं की, तुम्ही खूप मोठे झाले आहात. पण ती सत्ता, पैसा यापेक्षा अजूनही मोठी पॉवर आहे ती लोकांची. ती पवार साहेबांसोबत आहे.

प्रश्न: लोकसभेची बारामतीची सीट धोक्यात आली आहे. पवारांना बारामतीत पराभव पाहावा लागेल अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

रोहित पवार: अशी चर्चा होणार ना.. जर ते त्या बाजूला गेले असतील तर इथे मोठ्या प्रमाणात ताकद ही सुप्रिया ताईंच्या विरोधात लावावी लागणार ना. ते ताकद लावतीलच ना.. पण नेत्यांच्या हातात सगळ्या गोष्टी असतात असं नाही. या गोष्टी मतदारांच्या हातात असतात. मतदारांना तो निर्णय घेऊया. भरणे तिकडे गेले असतील तरी भरणेंना 100 टक्के मतदान कुठे झालं आहे.

तुम्हाला एक सांगतो की, मार्च 2024 पर्यंत थांबायची गरज पण नाही. ऑक्टोबर 2024 पर्यंत विधानसभेसाठी देखील थांबायची गरज नाही. डिसेंबर 2023 लोकसभा आणि विधानसभा एकत्रित लागतील. हा जो काही वेग वाढलाय ना भाषणाचा सुद्धा, फोडाफोडीचा सुद्धा.. आणि आता हॉटेलला घेऊन गेले आहेत सगळ्या आमदारांना.. आता कुठे सत्ता स्थापन करायची आहे. आता काय तुम्हाला सत्ता स्थापन करायची आहे? मग या सगळ्या गोष्टी का केल्या जातात? कारण डिसेंबरला निवडणुका होणार आहेत.

कारण कर्नाटकात जे घडलं त्यामुळे भाजपचे आकडे कमी होऊ शकतात. तेलंगणामध्ये कोणाला वाटलं का.. ते बीआरएस येतायेत महाराष्ट्रात आणि त्यांच्या घराला लागलीय आग तिकडे.. तिकडे पाच-पाच लाखांच्या सभा होत आहेत राहुल गांधींच्या.. वातावरण बदलतंय आणि हे भाजपला कळलंय. त्यामुळे कोणत्या पातळीला जाऊन आपला आकडा कमी नको व्हायला यासाठी हे सुरू आहे.

आता डिसेंबरमध्ये चार राज्याच्या निवडणुका आहे त्यासोबत लोकसभा निवडणुका लावल्या जातील. कुठे तरी फटका बसण्यापेक्षा वाचणं.. डिसेंबरसाठी या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. भाजपला असं वाटतं की, सहजपणे ते निघून जातील. पण महाराष्ट्रातील जनता आहे.. सोप्पी समजू नका..

प्रश्न: मोठं भाकीत आहे तुमचं की, डिसेंबरमध्ये निवडणुका होणार

रोहित पवार:  आता निवडणुकाला ईव्हीएम लागतात.. जेव्हापासून ईव्हीएम आलंय तेव्हापासून लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक यांच्या पाच महिने आधी एक रिपोर्ट असतो. असं महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं जातं. आज संपूर्ण देशात सांगितलं गेलं. तुम्ही अधिकाऱ्यांशी बोला, पण खासगीत बोला.. ऑन कॅमेरा कोणी नाही बोलणार. त्याच ईव्हीएमविषयी सहा दिवसांपूर्वी सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात आता लगेच विधानसभा तर नाही.. आसपासच्या राज्यात पण तसंच सुरू झालं आहे. कर्नाटकात पण सुरू झालं आहे. याचं काय समजायचं की, तयारी का करताय?

सगळी गडबड जी केलीय.. जो काही अर्थ व्यवहार झाला असेल, दबाव तंत्र असेल हे सगळं निवडणुकीसाठी केलेलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT