ड्रग्स प्रकरणातील आरोपीसाठी मंत्री बावनकुळे का म्हणाले 'वाजवा टाळ्या'?
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी हा भाजपच्या व्यासपीठावर दिसल्याने पुन्हा एकदा नवा वाद सुरू झाला आहे. जाणून घ्या हे संपूर्ण प्रकरण आहे तरी काय.
ADVERTISEMENT

लखन आदाटे, तुळजापूर: तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरुन धाराशिवमध्ये चांगलाच राजकीय वाद पेटला आहे. खासदार आणि आमदार पुन्हा एकदा भिडले आहे. त्यातच ड्रग्ज प्रकरणातील आरोपी हा मंत्री बावनकुळे आणि आमदार राणा पाटलांसोबत भर व्यासपीठावर दिसत असल्यानं वातावरण चांगलंच तापलं. पण या सगळ्यात ड्रग्ज प्रकरणातील अनेक प्रश्नांची उत्तर अजूनही मिळालेली नाहीत. यातला प्रमुख आरोपी कोण आहे? या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आलाय? बावनकुळेंना आरोपी गंगणेचं कौतुक का करावं लागलं? असे अनेक सवाल आता उपस्थित केले जात आहेत.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे गुरुवारी तुळजापूर दौऱ्यावर होते. निमित्त होतं आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्या नागरी सत्कार सोहळ्याचं. तुळजापूरच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी मंजूर झालेल्या 1866 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यानिमित्त नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता आणि कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं विनोद उर्फ पिंटू गंगणेनं..
हे ही वाचा>> ड्रग्स तस्कर ललित पाटीलच्या कशा आवळल्या मुसक्या?, पोलिसांनी सांगितली Inside Story
ड्रग्ज तस्करी प्रकरणातील सशर्त जामिनावर असलेल्या आरोपी विनोद उर्फ पिंटू गंगणे मंत्री आणि आमदारांसोबत व्यासपीठावर रुबाबात मिरवत होता.. आरोपी महसूल मंत्र्यांचा जाहीर सत्कार करत होता आणि स्वत: मंत्री बावनकुळे या गंगणेच्या पाठीवर कौतुकाची थाप देत उपस्थितांना टाळ्या वाजवायला सांगत होते.
भाजप नेत्यांसोबत जामिनावर असलेल्या आरोपीचा हा व्हिडीओ हा हा म्हणता धाराशिवसह राज्यभरात पसरला. त्यानंतर सुरु झाला धाराशिवमध्ये पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये थेट सामना. खासदार ओमराजे निंबाळकरांनी थेट राणा पाटलांवर निशाणा साधला.










