जनतेने नाकारले म्हणून मंत्रिपद नाकारणारा नेता काळाच्या पडद्याआड, पन्नालाल सुराणा यांचे निधन, देहदान करण्याचा निर्णय
Pannalal Surana Passed Away : जनतेने नाकारले म्हणून मंत्रिपद नाकारणारे समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले. मृत्यूनंतर देहदान केले जावे, असा निर्णय त्यांनी घेतला होता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
जनतेने नाकारले म्हणून मंत्रिपद नाकारणारा नेता काळाच्या पडद्याआड
पन्नालाल सुराणा यांचे निधन, देहदान करण्याचा निर्णय
सोलापूर : समाजवादी विचारसरणीचे नेते आणि विचारवंत पन्नालाल सुराणा (वय 93) यांचे मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास नळदुर्ग येथील ‘आपले घर’ येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा प्रभास आणि कन्या आरती असा परिवार आहे. सुराणा हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे होते. महाविद्यालयीन शिक्षणानंतर त्यांनी पत्रकारितेत प्रवेश केला आणि मराठवाडा दैनिकाचे संपादक म्हणून कार्यभार सांभाळला.
पन्नालाल सुराणा यांचा जन्म 9 जुलै 1933 रोजी बार्शी (जि. सोलापूर) येथे झाला. बार्शीत शिक्षण घेत असतानाच ते राष्ट्रसेवा दलाशी जोडले गेले. पुढे तरुण वयात ते बिहारमधील सोखादेवरा येथील जयप्रकाश नारायण यांच्या सर्वोदय आश्रमात वास्तव्यास होते आणि भूदान आंदोलनात सक्रिय सहभागी झाले.समाज-राजकारण, शिक्षण, शेती आणि बेरोजगारी यांसारख्या विषयांवर त्यांनी मोठ्या प्रमाणात लेखन केले. बिहारमध्ये जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातून त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील प्रवासाची सुरूवात झाली. पत्नी डॉ. वीणा यांच्यासह ते बराच काळ बिहारमध्येच राहत होते. आणीबाणीच्या काळात त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. पुढे त्यांनी समाजवादी पक्षात सक्रिय काम पाहिले आणि नंतर जनता पक्षाचे प्रदेश सचिव म्हणूनही जबाबदारी स्वीकारली.
पन्नालाल सुराणा यांनी बार्शीतून विधानसभेची तसेच सोलापूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. बार्शीच्या माजी आमदार प्रभाताई झाडबुके यांच्याविरुद्ध त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला होता. तरीही, राजकारणात त्यांना मोठ्या संधी असतानाही केवळ जनतेने आपल्याला नाकारले म्हणत त्यांनी मंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिला होता.










