फॅक्ट चेक: मराठ्यांचं साम्राज्य राजस्थानात! पुस्तकात 'तो' नकाशा, तिकडचे राजे चिडले अन्..
पाठ्यपुस्तकांमध्ये इतिहासावरुन आपण याआधीही वाद झाल्याचं पाहिलेलं आहे, आता एक नवा वाद पुन्हा समोर आला आहे आणि याचा संबंध मराठा साम्राज्याशी आहे.

नवी दिल्ली: NCERT च्या आठवीच्या सामाजिक शास्त्र पुस्तकात मराठा साम्राज्यासंदर्भात दाखवलेल्या नकाशावर जैसलमेरचे माजी महारावल चैतन्यराज सिंह यांनी आक्षेप घेतला आहे. सामाजिक शास्त्र पुस्तकाच्या तिसऱ्या खंडातील पृष्ठ 71 वर छापलेल्या नकाशात जैसलमेरला मराठा साम्राज्याचा भाग म्हणून दाखवणे चुकीचे आणि दिशाभूल करणारे असल्याचे माजी महारावल यांनी म्हटले आहे. त्यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे यामध्ये तात्काळ सुधारणा करण्याची मागणी केली आहे.
जैसलमेरचे माजी महारावल चैतन्यराज सिंह यांनी सोशल मीडियावर नकाशा शेअर केला आणि लिहिले की, आठवीच्या NCERT च्या सामाजिक शास्त्र पुस्तकात (पृष्ठ क्रमांक 71 वर युनिट 3 मध्ये) दाखवलेल्या नकाशात जैसलमेर तत्कालीन मराठा साम्राज्याचा भाग म्हणून दाखवण्यात आला आहे, जो ऐतिहासिकदृष्ट्या दिशाभूल करणारा, तथ्यहीन आणि आक्षेपार्ह आहे.
हे ही वाचा>> 6 महिन्यात 7 वेळा शिक्षण विभाग तोंडघशी कसा पडलाय, शिक्षण विभागात खेळखंडोबा का?
या प्रकारची पुष्टी न करता आणि ऐतिहासिक पुराव्याशिवाय माहिती केवळ NCERT सारख्या संस्थांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाही तर आपल्या गौरवशाली इतिहासाला आणि सार्वजनिक भावनांनाही दुखावते. हा विषय केवळ पाठ्यपुस्तकातील चूक नाही, तर आपल्या पूर्वजांच्या त्याग, सार्वभौमत्व आणि शौर्याला कलंकित करण्याचा प्रयत्न असल्याचे दिसते.
मराठ्यांनी जैसलमेरमध्ये कधीही हस्तक्षेप केला नाही
चैतन्यराज सिंह पुढे लिहितात, "जैसलमेर संस्थानाच्या संदर्भात उपलब्ध असलेल्या प्रामाणिक ऐतिहासिक स्त्रोतांमध्ये कुठेही मराठ्यांचे वर्चस्व, आक्रमण, कर आकारणी किंवा वर्चस्वाचा उल्लेख नाही. उलट, आपल्या राज्याच्या पुस्तकांमध्ये असेही स्पष्टपणे नमूद केले आहे की मराठ्यांनी जैसलमेर संस्थानात कधीही हस्तक्षेप केला नाही."
हे ही वाचा>> "मुंबई मराठी माणसांची नाही इथं...' भाजप नेते नारायण राणेंचं वदग्रस्त वक्तव्य, नेमका रोष कोणावर?
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही चूक त्वरित दुरुस्त करण्याची मागणी करत माजी महारावल म्हणाले की, NCERT ने केलेल्या या प्रकारच्या चुकीच्या, दुर्भावनापूर्ण आणि अजेंडावर आधारित सादरीकरणाला गांभीर्याने घेतले पाहिजे आणि त्वरित सुधारणा केल्या पाहिजेत. ही केवळ तथ्य दुरुस्ती नाही तर आपल्या ऐतिहासिक प्रतिष्ठेशी, स्वाभिमानाशी आणि राष्ट्रीय अभ्यासक्रमाच्या अखंडतेशी संबंधित बाब आहे.
यावर आम्ही इतिहास तज्ञ इंद्रजित सावंत यांच्याशी संवाद साधला. त्यांनी मात्र NCERT नं दिलेला नकाशा योग्य असल्याचं म्हटलं आहे आणि केले गेलेले आरोपही फेटाळले आहेत. मराठा साम्राज्याच्या सत्तेची लाट पेशावरपासून अनेक भागांमध्ये होती, हे तथ्य आहे जे नाकारता येत नाही.