अजितदादा भाजपसोबतची सत्ता सोडणार होते?, मुंबई Tak चावडीवर रोहित पवारांच्या विधानाने मोठी खळबळ
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत बोलताना NCP-SP चे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार हे भाजपसोबतची सत्ता सोडून शरद पवारांसोबत येण्याबाबतची चर्चा करत असावे असं मोठं विधान केलं आहे. पाहा ते नेमकं काय म्हणाले.
ADVERTISEMENT

मुंबई: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवारांच्या पक्षासोबत विलिनीकरणाबाबत सकारात्मक होते. असं सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून सांगितलं जात आहे. पण याच विलिनीकरणासंबंधी बोलताना आमदार रोहित पवार यांनी आज (7 एप्रिल) अत्यंत मोठं आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारं विधान केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मुंबई Tak चावडीवर बोलताना असं म्हटलं की, 'आम्ही जिथे आहोत तिथे आहोत. त्यामुळे विलिनीकरणाचा निर्णय घेतला जात असेल तर तो तिकडून इकडे येण्यासाठी घेतला जात असू शकतो.'
रोहित पवारांच्या याच विधानाचा अर्थ आता असा लावला जात आहे की, अजित पवार जर शरद पवारांसोबत विलिनिकरणाची चर्चा करत होते तर त्याचवेळी ते भाजपसोबतची सत्ता सोडून येण्याचाही चर्चा नेत्यांसोबत करत होते.
रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
रोहित पवार: 'शरद पवारांचं कालचं स्टेटमेंट जे होतं ते कुठल्या बाबतीत होतं ते होतं बारामती पोटनिवडणुकीच्या बाबतीत. त्यात त्यांनी काय सांगितलं की, साहेबांनंतर दादाच एक मोठे नेते होते. आता अजितदादा त्या ठिकाणी नाहीत.. तिथे आम्ही सुद्धा उमेदवार देऊ शकतो. काँग्रेसपेक्षा आमचा जो पक्ष आहे आणि त्याचं जे चिन्ह आहे ते जास्त प्रसिद्ध आहे किंवा लोकांच्या मनामध्ये आहे. आम्ही देऊ शकलो असतो उमेदवार. पण कुटुंबप्रमुख म्हणून आज एक मोठा नेता आणि तो देखील कुटुंबातील एक व्यक्ती.. ज्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला असेल तिथे त्याच जागेवर पोटनिवडणूक होत असेल तर कुटुंबप्रमुख म्हणून आमची सुद्धा काही तरी जबाबदारी आहे. हे पवार साहेबांचं विधान होतं. ते इतर गोष्टीसाठी नव्हतं..'









