‘जय बजरंगबली’! उद्धव ठाकरेंचा नरेंद्र मोदींना टोला, सीमावासीयांना म्हणाले…
मतदान करताना जय बजरंगबली म्हणा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. त्यांच्या याच विधानावरून उद्धव ठाकरेंनी त्यांना टोला लगावला आहे.
ADVERTISEMENT

Uddhav Thackeray Vs Narendra modi : मतदान करताना जय बजरंगबली म्हणून काँग्रेसला धडा शिकवा, असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील एका प्रचार रॅलीत केलं. त्यांच्या याच विधानावर बोट ठेवत उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत घडलेली घटना सांगत ठाकरेंनी सीमा भागातील मराठी मतदारांना आवाहन केलं आहे.
मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “आपल्या सर्वांना कल्पना असेल की, बऱ्याच वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुखांचा (बाळासाहेब ठाकरे) मतदानाचा अधिकार काढला गेला होता, कारण त्यांनी हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून.”
हेही वाचा >> ‘माझा सल्ला शरद पवारांना पचनी नाही पडला तर..,’ उद्धव ठाकरे असं का म्हणाले?
“आता कारण नसताना कर्नाटक निवडणुकीत मग तो बजरंग दलाच्या निमित्ताने असेल किंवा आणखी कोणत्या निमित्ताने असेल… मोदीजी जे म्हणाले की, मतदान करताना तुम्ही बजरंग बली की जय असं म्हणा. पंतप्रधान जर असे बोलले असतील, याचा अर्थ निवडणूक कायद्यात बदल झाला असेल, धार्मिक प्रचाराबाबत असं मी मानतो. कारण त्यावेळी हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून हिंदूह्रदयसम्राटांचा मतदानाचा अधिकार काढला होता. ते निवडणूक कधी लढले नव्हते, लढणार नव्हते. पण, त्यांना निवडणूक लढायलाही बंदी केली होती.”
सीमावासीयांना उद्धव ठाकरेंचं आवाहन
ठाकरे म्हणाले, “आता ज्या अर्थी पंतप्रधान मोदी तिथल्या मतदारांना बजरंगबली की जय बोलून मतदान करा असं सांगत असतील, तर मग मी तिथला कर्नाटकव्याप्त जो महाराष्ट्र आहे आणि तिथल्या माताभगिनींना सांगतोय की, तिथं कोणतंही सरकार आलं. कोणत्याही पक्षाचं सरकार आलं तरी भाषिक अत्याचार होतोय.”