ठाकरेंचा 'गर्जना मोर्चा' सुरू होण्याआधीच सगळ्यात मोठी आणि इंटरेस्टिंग बातमी, महाराष्ट्राच्या राजकारणात असं कधीच नाही घडलं!
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबईत होणाऱ्या निवडणूक आयोगविरोधी मोर्चात काँग्रेस नेते सहभागी होणार आहेत. राजकीय मतभेद बाजूला ठेवून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ठाकरे बंधूंच्या आंदोलनाला साथ दिल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात विरोधकांच्या एकजुटीची नवी चर्चा सुरू झाली आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात आज (4 ऑक्टोबर) मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना UBT चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महामोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चाला आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचीही साथ मिळणार असल्याने विरोधकांच्या एकजुटीला मोठं राजकीय बळ मिळालं आहे. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात मोर्चात सहभागी होणार असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेही मोर्चात सहभागी होण्यासोबतच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत.
राज-उद्धव यांनी स्वतः फोन करून दिलं निमंत्रण
या मोर्चासाठी ठाकरे बंधूंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना स्वतः फोन करून सहभागी होण्याचं निमंत्रण दिल्याची माहिती आहे. त्यामुळे सुरुवातीला असलेली राजकीय मतभिन्नता बाजूला ठेवून विरोधक एकाच व्यासपीठावर येताना दिसणार आहेत.
हे ही वाचा>> 'आम्ही ग्यानेश कुमारांना सवाल विचारतोय, भाजप का उत्तर देतोय?', शिवसेना नेत्याचा BJP ला बोचरा सवाल
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी ४ ऑक्टोबरच्या मोर्चाची घोषणा करताना इतर राजकीय पक्ष आणि नागरिकांनाही सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं. मोर्चामध्ये पक्षीय झेंडे न वापरता केवळ तिरंगा ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
काँग्रेस राज ठाकरेंसोबत व्यासपीठ शेअर करणार?
या मोर्चाच्या आधी काँग्रेसच्या भूमिकेबाबत मोठी चर्चा सुरू होती. विशेषतः राज ठाकरे यांनी उत्तर भारतीय आणि यूपी-बिहारी नागरिकांच्या मुद्द्यावर यापूर्वी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे काँग्रेस राज ठाकरेंसोबत एकाच व्यासपीठावर येणार का, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता होती.
