फडणवीस सरकारनेही अशोक खरातच्या ईशानेश्वर मंदिराला दिला होता निधी; किती कोटी मोजले? 2018 चा शासन निर्णय
Devendra Fadnavis government also gave funds to Ashok Kharat Ishaneshwar temple : फडणवीस सरकारने 2018 साली अशोक खरातच्या ईशानेश्वर मंदिराला भरघोस निधी दिला होता. याबाबतची माहिती समोर आलीये.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
फडणवीस सरकारनेही अशोक खरातच्या ईशानेश्वर मंदिराला दिला होता निधी
दीड कोटी मोजले; पाहा 2018 चा शासन निर्णय
Devendra Fadnavis government also gave funds to Ashok Kharat Ishaneshwar temple : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याचे काळे कारनामे समोर आल्यानंतर त्याला राजकीय मंडळींनी दिलेल्या पाठबळाचीही जोरदार चर्चा सुरु झालीये. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्याच्याकडून पूजा करुन घेण्यासाठी तसेच हात पाहाण्यासाठी नाशकात देखील गेले होते. दरम्यान, त्यानंतर ठाकरे सरकारने मराठवाड्याचं पाणी त्याच्या शिवनिका ट्रस्टला दिल्याची माहिती समोर आली होती. ठाकरे सरकारच्या या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने देखील 2018 साली खरातच्या मंदिराला दीड कोटींचा निधी दिल्याची माहिती समोर आलीये. याबाबत शासन निर्णय देखील समोर आला असून या GR मध्ये नेमकं काय आहे? सविस्तर जाणून घेऊयात..
सिन्नरमधील श्री सिद्धक्षेत्र ईशान्येश्वर देवस्थानच्या विकासासाठी दिलेल्या निधीचा GR
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील प्रसिद्ध श्री सिद्धक्षेत्र ईशान्येश्वर देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या देवस्थानच्या परिसरात विविध विकासकामे राबवली जाणार असून, त्यासाठी एकूण 105.83 लक्ष रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी मिळाली आहे. या नियोजित आराखड्यातील कामांसाठी प्राथमिक स्वरूपात 25 लक्ष रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून, यामुळे मंदिर परिसराचा कायापालट होण्यास मदत होणार आहे.
या विकास आराखड्यात भाविकांच्या सोयीसुविधांसाठी विविध महत्त्वपूर्ण कामांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने मंदिर परिसरात भव्य सभामंडपाचे बांधकाम केले जाणार असून त्यासाठी 36.20 लक्ष रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तसेच मंदिर परिसरात पेव्हींग ब्लॉक बसवणे, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र प्रसाधन गृहांची उभारणी, भाविकांसाठी चेंजिंग रूम आणि सुसज्ज भक्त निवासाचे बांधकाम यांसारखी कामे प्राधान्याने हाती घेण्यात येणार आहेत. परिसराच्या सौंदर्यीकरणासाठी लँडस्केपिंग आणि गार्डनिंगवरही विशेष भर देण्यात आला असून त्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात आली आहे.









