लालबागचा राजाच्या मंडपातील कार्यकर्ता ते ठाकरेंचा विश्वासू शिलेदार.. कोण आहेत सुधीर साळवी?
Who is Sudhir Salvi: लालबागच्या राजाचे मानद सचिव सुधीर साळवी यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जाणून घ्या सुधीर साळवी यांच्याविषयी सविस्तर.
ADVERTISEMENT

मुंबई: लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांची आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नवे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सुधीर साळवींची पक्षाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या घोषणेनंतर सुधीर साळवींच्या समर्थकांनी जल्लोष केला आहे. सुधीर साळवी यांची शिवसेना (UBT) पक्षाविषयी कायमच निष्ठा असल्याचं पाहायला मिळालं आहे. त्याचीच पोचपावती म्हणून आता त्यांची पक्षाकडून सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वीच नव्या नियुक्त्या या करण्यात आल्या. ज्यामध्ये प्रवक्त्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती. त्यात मुख्य प्रवक्ते म्हणून खासदार संजय राऊत आणि खासदार अरविंद सावंत यांची निवड झालेली. दरम्यान, आता सचिवपदी सुधीर साळवींच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, या मोठ्या पदावर नियुक्ती करण्यात आल्यामुळे साळवींवर मुंबईतील लालबाग आणि परिसरात शिवसेना (UBT) पक्षाची पाळमुळं घट्ट करण्याची जबाबदारी आली आहे.
हे ही वाचा>> Uddhav Thackeray: "गद्दारांनो 'छावा' बघा..", उद्धव ठाकरेंनी शिंदेंवर डागली तोफ, अबू आझमी, नीलम गोऱ्हेंनाही सुनावलं
2024 विधानसभा निवडणुकीत सुधीर साळवी आणि त्यांचे समर्थक हे शिवडी मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी प्रचंड आग्रह होते. मात्र, त्यावेळी उद्धव ठाकरेंनी विद्यमान आमदार अजय चौधरी यांना तिकीट देऊ केलं होतं. ज्यामुळे साळवी यांचे समर्थक नाराज झालेले. मात्र, त्या परिस्थितीत देखील सुधीर साळवींनी आपण पक्षासोबतच असू आणि यापुढे पक्षाचं काम प्रामाणिकपणे करू असं जाहीरपणे म्हटलं. जे त्यांनी निवडणुकीत देखील केलं. कारण या मतदारसंघातून अजय चौधरी हे मोठ्या मताधिक्याने जिंकून आले. या गोष्टीचं फळ म्हणून आता पक्षाच्या सचिवपदी साळवींची नियुक्ती करण्यात आली आहे.
कोण आहेत सुधीर साळवी?
मुंबईतील सुप्रसिद्ध लालबागचा राजा या गणेशोत्सव मंडळाचे ते मानद सचिव आहे. त्यामुळे त्यांचा या परिसरावर चांगलीच पकड असून त्यांचा दबदबा आहे. ते मागील 35 वर्षांपासून लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात सक्रिय असून अनेक वर्षांपासून त्यांच्यावर मानद सचिव पदाची जबाबदारी आहे.










