अजित पवार यांच्या NCP मधील इनसाईड स्टोरी, नेमकं काय घडतंय?
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील सध्याची परिस्थिती नेमकी काय आहे? दादांच्या अनुपस्थितीत पक्षातील राजकीय घडामोडी, नेत्यांची भूमिका आणि पक्षासमोरील प्रश्न काय आहेत?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये काय घडतंय?
पक्षातील नेत्यांमध्ये असंतोष?
NCP Inside Story : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( NCP ) एका अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण वळणावर उभा आहे. पक्षाचे सर्वेसर्वा अजित पवार यांच्या अनुपस्थितीत पक्षात पडलेली पोकळी, अंतर्गत मतभेद, नेतृत्वाची नवी समीकरणे आणि नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या निकालांनंतर समोर आलेली पक्षांतर्गत अस्वस्थता या सर्व विषयांवर मुंबई तकच्या विशेष विश्लेषणात महत्त्वपूर्ण प्रकाश टाकण्यात आला आहे.
काय करणार, आता दादा नाहीत ना!
काही दिवसांपूर्वी मुंबईत राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याच्या बंगल्यावर झालेल्या भेटीत एक महत्त्वाची आणि गंभीर बाब समोर आली. पुण्याच्या इकॉनॉमिक ऑफेन्सस विंगने (EOW) मुळशी लँड प्रकरणासंदर्भात पक्षाशी संबंधित दोन व्यक्तींना नोटिसा पाठवल्या आहेत. या सर्व घडामोडींवर चर्चा सुरू असताना संबंधित नेत्याने एका वाक्यात संपूर्ण परिस्थितीची जाणीव करून दिली; ते म्हणाले, "आता काय करणार, आता दादा नाहीत ना!" अजित पवार यांच्या हयातीत किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा कारभार ज्या शिस्तीत आणि एकाच आदेशावर चालायचा, ती पकड आता सैल होत चालल्याचे चित्र यावरून स्पष्ट दिसते. दादांच्या जाण्यानंतर पक्षात निर्माण झालेली ही मोठी पोकळी भरून काढताना त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि पक्षातील इतर वरिष्ठ नेत्यांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
हे ही वाचा : कराळे मास्तर, रविराज साबळेंनी प्रस्थापितांची गणितं कशी बिघडवली?
प्रफुल पटेल यांचे ट्विट अन्...
विधान परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी सोशल मीडियावर एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि थेट संदेश देणारे ट्वीट केले. त्यांनी स्पष्टपणे नमूद केले की, विधान परिषदेचे निकाल हा एक स्पष्ट आणि महत्त्वाचा इशारा आहे. लोकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी, पक्षाचे प्राधान्यक्रम नव्याने ठरवण्यासाठी आणि संघटनेत सुधारणा करण्यासाठी तातडीने 'कठोर आत्मपरीक्षण' करण्याची गरज आहे. प्रफुल पटेल हे थेट पक्षनेतृत्वाशी किंवा सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याशी खाजगीत चर्चा करू शकले असते, परंतु त्यांनी सार्वजनिकरीत्या हे ट्वीट करून पक्षात सुसंवादाचा अभाव असल्याचा आणि पक्षाच्या सध्याच्या निर्णय प्रक्रियेवर वरिष्ठ नेत्यांची नाराजी असल्याचा उघड मेसेज दिला आहे. जे लोक विश्वासाने, निष्ठेने किंवा आशेने पक्षात आले आहेत, त्यांच्या आशा-आकांक्षा जपत हा राजकीय डोलारा पुढे नेण्यात अडचणी येत असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे.
हे ही वाचा : मुंबईत अवकाळी पावसाच्या सरी! नागरिकांची तारांबळ, थंडी कधी येणार?
रेजिम चेंज
पक्षांतर्गत बदलांबद्दल बोलायचे तर, नुकतीच मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी झीशान सिद्दीकी यांची वर्णी लावण्यात आली असून, त्यांच्यासोबत उमेश पाटील यांना मुख्य प्रवक्तेपद देण्यात आले आहे. मुंबईत याआधी नवाब मलिक यांच्याकडे मोठी कमान होती आणि अल्पसंख्याक चेहरा म्हणून त्यांचीच लेक किंवा स्वतः नवाब मलिक यांना पुन्हा सक्रिय केले जाईल अशी दाट शक्यता वर्तवली जात होती. मात्र, पक्षाने झीशान सिद्दीकी यांच्या रूपात एक तरुण चेहरा पुढे आणला. या निर्णयामागे पक्षात एक अंतर्गत 'रेजिम चेंज' (नेतृत्व बदल) घडताना दिसत आहे.
एकीकडे पार्थ पवार यांना पक्षात फ्रेश टीम आणून नवीन अजेंडे राबवायचे आहेत, तर दुसरीकडे पक्षाची जुनी जाणती मंडळी आधीच्याच कार्यपद्धतीने पक्ष चालवण्याच्या बाजूने आहेत. या दोन भिन्न विचारांमुळे पक्षात अंतर्गत विरोध वाढला आहे. या ताज्या बदलांनंतर मुंबईचे कार्याध्यक्ष सिद्धेश कांबळे यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यांनी दादांच्या विचारांशी निष्ठा कायम ठेवणार असल्याचे स्पष्ट केले तरी, नवीन नेतृत्वाला नवे प्लॅन्स हवे असणे आणि जुन्या कार्यकर्त्यांची उपेक्षा होणे या द्वंद्वामुळे पक्षात अस्वस्थता स्पष्ट दिसत आहे. सुनेत्रा पवार यांनी मध्यस्थी करून हा रोष शमवण्याचा प्रयत्न केला असला तरी त्याला अजून पूर्ण यश आलेले नाही.
हे ही वाचा : महाराष्ट्रात दररोज सरासरी 8 शेतकऱ्यांची आत्महत्या, RTI मधून धक्कादायक माहिती समोर, 2022 पासून काय घडलं?
पुणे पदवीधरवरुन नाराजी
इतकेच नव्हे तर, नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या हक्काची पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा महायुतीमधील अलायन्सच्या बैठकीत सोडली, ज्यावर स्थानिक नेत्यांचा व कार्यकर्त्यांचा शेवटपर्यंत तीव्र आक्षेप होता. शरद पवारांच्या पक्षाने आपल्या वाट्याला आलेल्या दोन्ही जागा ताकदीने जिंकून आणल्या, पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेली संभाजीनगरची जागा पराभवाच्या छायेत गेली आणि स्वतःची हक्काची पुण्यातील जागा सोडून द्यावी लागली. यामुळे पक्षातील नेत्यांमध्ये असंतोष अधिकच वाढला आहे.
हे ही वाचा : अर्णब चक्रीवादळानंतर नवी प्रणाली सक्रिय, राज्यात कुठे पावसाचा इशारा?
नेतृत्त्वापुढील सर्वात मोठे आवाहन
पूर्वी जेव्हा अजित पवार सक्रिय होते, तेव्हा पक्षातील सर्व नेते एकाच दिशेने पाहत असत आणि त्यांच्या एका हाकेवर निर्णय घेतले जात असत. मात्र, आता ते नसल्यामुळे पक्षातील प्रत्येक नेता वेगवेगळ्या दिशेने विचार करत आहे, प्रत्येकाचे राजकारणाचे समीकरण वेगळे आहे. अशा स्थितीत विखुरलेल्या नेत्यांना एकाच छत्राखाली आणून पक्षाची मोट बांधणे आणि प्रफुल पटेलांनी सुचवलेले 'कठोर आत्मपरीक्षण' अमलात आणून पक्ष संघटना बळकट करणे, हे सध्याच्या नेतृत्वापुढील सर्वात मोठे आणि कठीण आव्हान ठरले आहे.
