Raj Thackeray Maratha Morcha : ‘अरे व्वा! तुम्ही काय केलं असतं?’, राज ठाकरे फडणवीसांवर भडकले
Raj Thackeray maratha morcha : अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षण आंदोलकांवर झालेल्या लाठीमारावरून राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली. राज ठाकरेंनी आंदोलकांशी संवाद साधताना काही मुद्दे मांडले.
ADVERTISEMENT

Maratha Reservation lathi charge Raj Thackeray news : मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटला. आंतरवला सराटी गावात पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. या प्रकरणाने राजकारण तापले असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावरच हल्ला चढवला. यावेळी राज ठाकरेंनी आंदोलकांना एक सल्लाही दिला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी (4 सप्टेंबर) आंतरवली सराटी गावात जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. चर्चा केल्यानंतर राज ठाकरे म्हणाले, “मी आता मनोज जरांगे यांना सांगत होतो की, ज्या ज्या वेळी मी काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या, त्या त्या वेळी तुमच्यापर्यंत त्या चुकीच्या पद्धतीने पोहोचवल्या गेल्या. मोर्चे निघत होते, त्यावेळीच मी म्हणालो होतो की, मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. हे सगळे राजकारणी तुमचा वापर करून घेतील. मत पाडून घेतील आणि तुमच्याकडे दुर्लक्ष करतील. हा सुप्रीम कोर्टामधील तिढा आहे.”
हेही वाचा >> Maratha Morcha : “हा जनरल डायर कोण?”, शिवसेनेचं (UBT) शिंदेंना चॅलेंज
आंदोलकांशी संवाद करताना राज ठाकरेंनी असंही सांगितलं की, “आपण काही गोष्टी कायद्याने समजून घ्या. परंतु हे सतत तुम्हाला आरक्षणाचं आमिष दाखवून कधीही हे सत्तेमध्ये, कधी ते विरोधी पक्षामध्ये. विरोधी पक्षात असताना मोर्चे काढणार आणि सत्तेत आले की, गोळ्या झाडणार. सत्तेत आल्यावर तुम्हाला तुडवणार. हेच जेव्हा विरोधी पक्षात असतात तेव्हा यांना तुमच्याबद्दल प्रेम आलेलं असतं. सत्तेत गेल्यानंतर हे सगळे मारायला उठतात.”
पोलिसांना लाठीमाराचे आदेश कुणी दिलेत?
“मी मनोज जरांगेंना तेच सांगत होतो की, पोलिसांना दोष देऊ नका. आदेश कुणी दिलेत? ज्यांनी पोलिसांना आदेश दिलेत, त्यांना दोष द्या. पोलीस काय करणार, ते तुमच्या आमच्यातीलच आहेत. जे वरून सांगितलं गेलं, ती गोष्ट त्यांना करावीच लागणार”, असे म्हणत राज ठाकरेंनी गृहमंत्र्यालयाला यासाठी जबाबदार धरलं आहे.