भाजप आमदार नरेंद्र मेहतांच्या शाळेत कांदा लसूण बंदी, मात्र हॉटेलात चना गार्लिक, फ्रेंच फ्राईडची विक्री.. मनसे आक्रमक!
मीरारोडच्या शाळेतील कांदा, लसूण, बटाटा आणि बीट टाळण्याच्या परिपत्रकावरून वाद पेटला आहे. मनसेने नरेंद्र मेहतांच्या हॉटेलमधील ‘चना गार्लिक’ आणि फ्रेंच फ्रायवर सवाल उपस्थित केला असून काँग्रेसनेही टीका केली आहे.
ADVERTISEMENT

प्रविण नलावडे, मीरारोड: मीरारोडच्या सेवन स्क्वेअर अकॅडमीच्या परिपत्रकावरून सुरू झालेला वाद आता आमदार नरेंद्र मेहता यांच्या हॉटेलमधील खाद्यपदार्थांच्या मेनूपर्यंत पोहोचला आहे. पर्युषण काळात विद्यार्थ्यांनी कांदा, लसूण, बटाटा, बीट यांसारखे पदार्थ टाळावेत, अशा सूचनांवरून मनसेने आक्षेप घेत आंदोलन केलं होतं. त्यानंतर शाळेने हे परिपत्रक मागे घेतल्याचा दावा मनसेकडून करण्यात आला.
आता मनसे पदाधिकाऱ्यांनी थेट आमदार नरेंद्र मेहता यांच्या सेवन इलेव्हन क्लब आणि फाउंटन परिसरातील सीएन रॉक हॉटेलमधील खाद्यपदार्थांवर सवाल उपस्थित केला आहे.
‘हॉटेलमध्ये पदार्थ विकता, मग विद्यार्थ्यांवरच नियम का?’
मनसे विधानसभा अध्यक्ष सचिन पोपळे आणि शहर सचिव सचिन साळुंखे यांनी सेवन इलेव्हन क्लबमध्ये जाऊन चना गार्लिक, सलाड आणि फ्रेंच फ्राय ऑर्डर केल्याचा दावा केला आहे. या पदार्थांमध्ये कांदा, लसूण आणि बटाट्याचा वापर होत असल्याचं मनसेचं म्हणणं आहे.
